• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कृष्णाकांठ१२४

वालचंद गांधींनी रविवार चौकात सभेची व्यवस्था करून ठेवली होती. त्यांना तेथे अटक होणार, म्हणून त्यांना निरोप देण्याकरता त्यांची मित्रमंडळी, कुटुंबीय आणि बराचसा व्यापारी समाज जमला होता. समारंभाला सुरुवात झाली. मला भाषण करण्यासंबंधी सुचविले. मी युद्ध झाल्यापासून काँग्रेसने कशा कशा भूमिका घेतल्या आणि या युद्धामध्ये कमीत कमी भाषण-स्वातंत्र्याचा हक्क असावा, ही महात्मा गांधींनी केलेली मागणी ब्रिटिश सत्तेने कशी नाकारली, याची सर्व हकीकत सांगितली; आणि आम्हाला आमचे मन बोलून दाखविण्याचा जेथे अधिकार नाही, तेथे आमच्याकडे युद्धास सहकार्य मागण्याचा ब्रिटिश सरकारला काय अधिकार आहे, असा प्रश्न मी उपस्थित केला. हा भाषण करण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि हिंदुस्थानातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिक तो बजावल्याशिवाय सोडणार नाही, असे मी स्पष्टपणे सांगितले आणि माझे भाषण संपविले.

मला वाटत होते, की पोलीस मला म्हणतील, की 'तुम्हांला अटक केली आहे;' पण तसे काही घडले नाही. माझ्या भाषणानंतर श्री. वालचंदशेठजी उठले आणि त्यांनी युद्धविरोधी घोषणा दिल्या. ताबडतोब पोलीस आले आणि त्यांनी त्यांना अटक केली. मला हा सर्व प्रकार विनोदी आहे, असे वाटले. मी तेथे आलेल्या पोलीस अधिका-याला विचारले, ''माझ्या भाषणात आणि त्यांच्या घोषणांत तुम्हांला काय फरक वाटला?'' त्यांनी सांगितले, ''इतक्या बारकाव्यात कोण जातो? तुम्ही फक्त भाषण केले, पण त्यांनी तर तेथे घोषणा केल्या, म्हणून आम्ही त्यांना पकडत आहोत. तुम्ही तुमच्या घरी जा.''

हा एक मजेदार अनुभव पुष्कळ सांगून जातो. वैयक्तिक सत्याग्रहाच्या प्रतीकात्मक स्वरूपाने त्याला एक तांत्रिक, औपचारिक स्वरूप आले होते.

एक-दोन महिन्यांनंतर माझ्या परीक्षेचा निकाल आला आणि मी उत्तीर्ण झालो. माझ्या आईला अतिशय आनंद झाला. मी योजले होते, त्याप्रमाणे माझे शिक्षण मी पुरे केले. माझ्या राजकीय नादामुळे माझी तीन-चार वर्षे फुकट गेली होती. त्यामुळे थोड्याशा वाढत्या वयात वकिलीचा अभ्यास मी पुरा केला होता. याची मलाही जाणीव होती.

आता माझी आई माझ्या मागे लागली. ''बाबा आता लग्न करून घे.'' मी म्हटले, ''आतां, ठीक आहे. चांगली मुलगी आली, तर मी जरूर लग्न करीन.''

- आणि मग ती मुली पाहण्याच्या उद्योगाला लागली. तिने ते काम गणपतरावांच्यावर सोपविले आणि सांगितले, की- ''आता धाकट्या भावाची काळजी घे.''

मला काही मुली सांगून आल्या होत्या; पण मला त्यांमध्ये फारसे आकर्षण न वाटल्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केले.

दिवस असेच चालले होते.

युद्धाने तोपर्यंत फारच गती घेतली होती. जर्मनीच्या सैन्याने आता आपला मोर्चा पूर्वेकडे वळविला होता. फ्रान्सची सर्व भूमी त्यांच्या आधिपत्याखाली आली होती. त्यामुळे त्यांना पश्चिमेकडून कसलेही तातडीचे लष्करी संकट दिसत नव्हते, आणि ही वेळ पाहून त्यांना जे शेवटी साध्य साधावयाचे होते, ते म्हणजे युरोपमधील कम्युनिझमचे वर्चस्व दूर करावयाचे. त्यासाठी हिटलरने आपली सर्व शक्ती एकवटून रशियावर हल्ला चढविला. रशियाचा नेता स्टॅलिन यांना हे आक्रमण काहीसे अनपेक्षित होते, असे लक्षात आले. त्यांनी संकटकाळी उपयोगी पडावा, म्हणून पोलंडचा काही भाग आपल्या ताब्यात घेऊन ठेवला होता. कधी काळी हिटलरने आक्रमण केले, तर बचावाची तयारी म्हणून त्याचा उपयोग व्हावा, हा त्याच्या पाठीमागे लष्करी उद्देश असावा. परंतु हिटलरचे आक्रमण इतके शक्तिशाली आणि वेगवान होते, की पहिल्या दोन आठवड्यांतच जर्मनीच्या सैन्याने रशियाचा फार मोठा प्रदेश पादाक्रांत केला. हिंदुस्थानमध्ये या गोष्टीच्या प्रतिक्रिया झाल्या. साम्राज्यशाही युद्ध म्हणून आरडाओरडा करणारे कम्युनिस्ट आता हे लोकशाहीवादी युद्ध झाले, म्हणून सांगू लागले. त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टीने तत्त्वत: हे कदाचित बरोबरही असेल, परंतु भारतीय नागरिकांना आतापर्यंत हे युद्ध मोडून काढले पाहिजे, असे जे सांगत होते, तेच आता या युद्धाला मदत केली पाहिजे; असे सांगू लागले. तेव्हा लोकांमधील त्यांची प्रतिष्ठा गेली. हिंदुस्थानमधल्या कम्युनिस्ट पक्षाला हिंदुस्थानच्या जनमताची नाडी केव्हाच समजली नव्हती. त्यांनी ज्या अनेक चुका केल्या, त्यांमध्ये दुस-या महायुद्धाच्या वेळची त्यांची ही चूक त्यांना फार महाग पडली. पुढच्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकारणात त्यांना ही गोष्ट सारखी नडत राहिली.