मी त्यांना एक प्रश्न विचारला, ''या व्याख्येत बसत नाहीत, अशी कोट्यवधी माणसे जर या देशात असतील, तर त्यांचे काय करायचे?''
हेडगवारांनी सांगितले, की तो प्रश्न जेव्हा उभा राहील, तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली, की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो, की यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आर्. एस्. एस्. म्हटले, की चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणा-या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
'अध्यात्म भवनाची' वरील आठवण लिहीत असताना, सहज ओघात आले, म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्याशी आलेल्या या अनपेक्षित संपर्काची स्मृती ताजी होऊन मनाशी आलेली एक घडलेली हकीकत म्हणून ती नोंदणे माझे कर्तव्य आहे.
'अध्यात्म भवन' मधील हे सोबती थोडे दिवस तेथे राहिले आणि नंतर ते गेले. माझ्या चाललेल्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या कामात त्यांची सहानुभूती होती, असे मला दिसले.
''या खाकसाराबरोबर तुम्ही येथे राहता कसे?'' असे मला एकदा बिडेश कुलकर्णी यांनी विचारले.
तेव्हा मी त्यांना म्हटले,
''ते चांगले गृहस्थ आहेत. त्यांच्या मताचा माझ्या येथे राहण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये व्यत्यय येत नाही आणि ते नानासाहेब अयाचित यांचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आमचे जमून जाते.''
थोड्याच दिवसांचा हा अर्थपूण सहवास म्हणून माझ्या लक्षात राहिला आहे.
१९४० चे वर्ष संपत आले आणि मग मात्र मी अगदी खोली बदलून कायद्याच्या दुस-या वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. माझ्या आईचे मला सारखे निरोप येत होते. 'आता तुझी परीक्षा होईपर्यंत कृपा करून निदान तुरुंगात जाऊ नकोस. परीक्षा झाल्यावर तुला काय करावयाचे, ते तू जरूर कर.' यावेळी आईचे मानण्याचे मी ठरविले आणि बाकीची इतर सर्व कामे सोडून देऊन तीन महिने मी माझी परीक्षेची तयारी करण्यात गुंतलो. अभ्यास करू लागल्यानंतर विषयामध्ये रस निर्माण होतो आणि मग त्यातील सौंदर्यस्थळे लक्षात यायला लागतात. मी 'एव्हिडन्स ऍक्ट'चा पुरावा कायद्याचा अभ्यास करीत असताना मला त्या कायद्याची रचना ज्या पद्धतीने केली आहे, त्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले. शेवटी कायद्याच्या कक्षेत पुरावा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पुराव्याच्या अभावी काहीही घडले, तरी ते सिद्ध करता येत नाही. तेव्हा पुरावा या संकल्पनेचे जे विश्लेषण वेगवेगळ्या व्याख्यांद्वारे या कायद्यामध्ये केले आहे, त्या गोष्टी पाहून मला अचंबा वाटे.
या तीन महिन्यांत मी कायद्याच्या अभ्यासात रमून गेलो. एप्रिलमध्ये परीक्षा झाली आणि मी पुणे सोडून कराडला परत आलो. माझ्यावर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्या निमित्ताने मी जिल्ह्यांत वारंवार हिंडत होतो. परीक्षेचा निकाल लागणार होता. त्यामुळे पाठीमागे काही निकडीचे घरचे काम नव्हते.
त्या सुमारास मला कराडमध्ये एक मजेदार अनुभव आला. आमच्या कराडमधील खादीभंडार चालविणारे श्री. वालचंद गांधी नावाचे एक काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांचे नाव वैयक्तिक सत्याग्रहासाठी मंजूर होऊन आले होते. एका जाहीर सभेमध्ये युद्धविरोधी घोषणा देऊन जेलमध्ये जाण्याचा त्यांनी संकल्प सोडला. माझी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी मला विचारले,
''मी ज्या सभेत युद्ध-विरोधी घोषणा करून जेलमध्ये जाणार आहे, त्या सभेमध्ये या 'वैयक्तिक सत्याग्रहाची' सगळी पार्श्वभूमी सांगणारे भाषण करायला याल का?''
मी सहज हो म्हणून गेलो आणि जेव्हा प्रत्यक्ष सत्याग्रहाचा दिवस उजाडला, त्या दिवशी माझ्या ध्यानात आले, की मी जे भाषण करणार आहे, तेही सत्याग्रहात बसू शकते. जर पोलिसांनी मलाही अटक करायचे ठरविले, तर त्यांना नाही म्हणता येणार नाही. आता मी आईच्या शब्दांतून मोकळा झालो होतो. तेव्हा मला त्याची फिकीर नव्हती आणि त्या सभेत भाषण करायला गेलो. वैयक्तिक सत्याग्रह, म्हणजे एका अर्थाने समारंभाने जेलमध्ये जाणे, असाच प्रकार तो होता.