थोरले साहेब - ९०

साहेब सत्काराला उत्तर देण्यासाठी उभे राहिले.  क्षणभर मंडपात शांततेची लहर पसरली.  सर्वजण आपला जीव कानात आणून साहेबांचं भाषण ऐकण्यास उत्सुक होते.  साहेबांनी समोर बसलेला जनसागर न्याहाळला.  काही क्षण शांत उभे राहिले.

कंठ दाटलेल्या आवाजात म्हणाले, ''माझ्या पाठीराख्या बंधू आणि भगिनींनो, मी येथे आलो ते सत्कार घेण्याकरिता नाही, तर तुमचे आभार मानण्यासाठी, आभार याकरिता की, लोकशाहीमध्ये तुम्ही या देशाचे मालक आहात.  आम्हाला निवडून देऊन तुम्ही देशाचा कारभार पाहण्यासाठी नोकर म्हणून पाच वर्षांसाठी आमची नेमणूक केली आहे.  नोकराचे काम इमानेइतबारे मालकाच्या हिताचे रक्षण करणे हे आहे.  तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्याकरिता जास्तीत जास्त काम करून त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.  तुम्हाला सुखासमाधानाचे जीवन कसे जगता येईल हे पाहणे आमचे काम आहे.  या तुमच्या गरजा जर आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत तर पाच वर्षानंतर तुम्ही आम्हाला बदलू शकता.  आपण आपापसांतील सर्व मतभेदांना गाडून टाकूया.  या देशाच्या भवितव्यासाठी एकदिलाने काम करूया.  देशाची उन्नती म्हणजे तुमची-माझी उन्नती.  हजारो वर्षांपासून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या जो वर्ग वंचित आहे, आपल्या बरोबरीनं त्याला उभं करूया.  याकरिता तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आहे.'' आभार मानून सभा संपली.  साहेबांनी सभा व जनतेची मनं जिंकली.  

साहेबांना सत्कार सभेच्या ठिकाणी पोहोचून डोंगरी घरी आले.  त्यांनी आई, सोनूताई व माझं दर्शन घेतलं.  आपला परिचय आम्हाला करून दिला.  मुंबईच्या घराची कल्पना दिली.  साहेबांनी घरामध्ये कुठल्या वस्तू पाहिजे याची यादी आपल्याकडून घेण्याबद्दल सूचना दिल्या.  आपण मुंबईला येण्यापूर्वी मी घरात सर्व वस्तू व्यवस्थित लावून ठेवतो, असेही त्यांनी सांगितले.  

मी डोंगरेंना म्हणाले, ''मी मुंबईला आल्यानंतर आपण दोघं मिळून गरजेप्रमाणं जे सामान लागेल ते बाजारातून घेऊत.  आताच यादी द्यायची गरज नाही.''

''ठीक आहे'' असे म्हणत डोंगरे सभास्थानाकडे निघून गेले.  साहेबांनी सभास्थळाकडूनच कराडवासीयांचा निरोप घेतला व मुंबईच्या वाटेला लागले.  

साहेब सचिवालयात जाऊन पुरवठा खात्याच्या कामात बारकाईनं लक्ष घालू लागले.  सामान्य जनता अन्नधान्याच्या तुवड्यामुळं शासनावर नाराज होती.  त्रस्त जनतेच्या हिताचे निर्णय केंद्र शासनाच्या धोरणात फेरबदल करून घेण्याची निकड साहेबांच्या लक्षात आली.  केंद्रात रफी अहमद किडवाई यांच्याकडे अन्नधान्य पुरवठा खातं होतं.  एक चतुर सहकारी म्हणून नेहरूजी त्यांच्याकडं पाहत असत.  केंद्रात आणि महाराष्ट्रात जनतेच्या नाडीवर हात असलेले दोघे पुरवठामंत्री असल्यामुळं दोघांचं सूत जमलं.  साहेब वयानं तरुण असूनही त्यांच्यातील अभ्यासूवृत्ती व प्रश्न सोडवण्याची मनाची तळमळ पाहून अहमद किडवाई साहेबांवर खूश होते.

साहेबांनी अहमद किडवाई यांचा विश्वास संपादन केला.  अन्नधान्य नियंत्रण पद्धतीत काही त्रुटी होत्या.  त्यामुळं ग्रामीण जनतेचे हाल होत असत.  या अटींचा अभ्यास करून, त्यांचं निवारण करून ग्रामीण जनतेला दिलासा देण्याचं काम प्रथम साहेबांनी केलं.  लहान शहर तसेच खेड्यातून ज्वारी, बाजरी आणि मका यावरील नियंत्रण उठविण्याचं साहेबांनी ठरविलं.  यात व्यापार्‍यांनी साठेबाजी करून किंमत वाढविण्याचा उद्योग करू नये, अशी समज व्यापार्‍यांना दिली.  अन्नधान्य पिकविणारा आणि व्यापारी यांच्या सहकार्यावरच हे धोरण यशस्वी होईल याची जाणीव साहेबांना होती.