थोरले साहेब - ६५

मुंबईच्या जुन्या सचिवालयाच्या इमारतीवर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं.  साहेब मित्रांसोबत या कार्यक्रमात सहभागी झाले.  साहेबांच्या मनःपटलावर गतकाळातील आठवणी सरकू लागल्या.  शाळकरी वयात खांद्यावर राष्ट्रध्वज घेऊन स्वातंत्र्य चळवळीच्या दिंडीत सहभागी झालो, तुरुंगवास भोगला, शिक्षणाकरिता मानहानी पत्करावी लागली, धनदांडग्यांच्या मनोवृत्तीनं गरिबीचे चटके सहन करावे लागले... कुटुंबानं सोसलेला मनसताप आठवला.  केवळ 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभून राहो' याकरिता.  जुन्या सचिवालयाच्या इमारतीवर मुख्यमंत्री ध्वज फडकावत होते तर इकडे साहेब सुराज्याचा विचार करीत होते.  वंचितांसाठी हे राज्य राबवायचं, त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस यावे याकरिता आपण काम करायचं हा मनसुबा साहेबांनी मनोमन रचविला.

इकडे गणपतराव रात्रंदिवस महानगरपालिकेच्या कामांत लक्ष घालू लागले.  त्यांचं तब्येतीकडं दुर्लक्ष होऊ लागलं.  वेळेवर पथ्यपाणी पाळण्यास दिरंगाई होऊ लागली.  परत त्यांच्या क्षयानं उचल खाल्ली.  आर्थिक ओढाताण तर होतीच.  साहेब शक्य तितकी आर्थिक मदत पुरवती होते; पण ती तोकडी पडत होती.  आईचे भाचे किसनराव घाटगे मदतीला होते.  मुंबईच्या डॉक्टरांनी औषधोपचार केले.  त्यांच्या प्रयत्‍नालाही यश येण्याची चिन्हे दिसेनात.  गणपतरावांनी अंथरूण धरलं.  शेलाटी बांध्याचा उंचापुरा गडी पार गळहाटून गेला होता.  सत्तेचाळीसचा डिसेंबर उजाडला.  गणपतरावांनी अन्नपाणी सोडलं.  कुणी भेटावयास आले तर डोळे उघडायचे.  एक दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकायचे.  त्यांना हात जोडायचे आणि परत डोळे मिटवायचे.  आवाज खोल गेलेला.  'आईऽ आईऽऽ यशवंतऽ यशवंतऽऽ' असे पुटपुटायचे.  आईनं ओळखलं - गणपत जास्त दिवसांचा सोबती नाही.  गौरीहर सिंहासने यांच्यामार्फत साहेबांना निरोप पाठवला.  गणपतराव अंतिम सत्याच्या वाटेवर निघाले.  

दुसर्‍या दिवशी गणपतरावांनी सर्वांची साथ सोडली.  घरात एकच हलकल्लोळ झाला.  भागीरथीबाईनं देहभार विसरून हंबरडा फोडला.  त्यांना मी आवर घालण्याचा प्रयत्‍न करू लागले.  माझ्या अशक्तपणामुळं मी त्यांना आवरण्यास कमी पडू लागले.  त्यामुळे माझ्या मदतीला सोनूबाई धावून आल्या.  त्या भागीरथीबाईला पोटाशी धरून त्यांना धीर देऊ लागल्या.  मी आईला सावरलं.  आई एखाद्या पुतळ्यासारख्या शून्यात पाहू लागल्या.  मी त्यांना रडतं केलं.  त्यांचा दुःखाचा बांध फुटला.  घरात एकच आक्रोश झाला.  आई दुःखात बुडाल्या.  पती, दोन तरुण मुलं गेली.  आईवर हा तिसरा आघात होता.  असा काय मी अपराध केला की त्याची सजा मला भोगावी लागत आहे, असे आईला वाटले.  तशाही परिस्थितीत आईनं मन खंबीर केलं.  अख्खं कामेरी गाव धावून आलं.  देवराष्ट्रही खाली झालं.  कराडमध्ये त्यांच्या मृत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली.  कराडच्या पंचक्रोशीतील जनसमुदाय कराडला लोटला.  साहेबांचे सारे मित्र धावून आले.  साहेबांची वाट पाहून शेवटी गणपतरावांना अग्निडाव देण्यात आला.  दुसर्‍या दिवशी साहेब कराडला पोहोचले.  वडिलांसमान भावाला खांदा देऊ शकलो नाही याबद्दल साहेब दुःखीकष्टी झाले.  स्वतःला कमनशिबी समजू लागले.  दोन्ही भावांचं शेवटचं मुखदर्शनही आपल्याला होऊ नये ही आपल्या जीवनाची शोकांतिका आहे.  ते स्वतःला अपराधी समजू लागले.  स्वतःला दोष देत हळहळ व्यक्त करू लागले.

ढालीसारखा पाठराखण करणारा भाऊ गोला.  के. डी. पाटील, चंद्रोजी पाटील यांच्यासारखे त्यागी मित्र गेले.  आता कुणाच्या भरवशावर व कुणासाठी राजकारणात राहायचं ?  संसार विस्कळीत झालेला... घराला कुणी वाली नाही... घरातील चिमुकल्यांचं भवितव्य वादळात सापडलेलं... या नियतीच्या संकटाला आई कुठपर्यंत तोंड देणार ?  त्यांचंही आता वय झालं... या विचारानं साहेब अस्वस्थ झाले.  पुढे काय करावं या विचारातच साहेब गढून जायचे.  देशकार्य की संसार ?  यातून त्यांना एकाची निवड करावी लागणार होती.  निर्णय होत नव्हता.  शेवटी हताश झाले.