थोरले साहेब - २१४

९ ऑक्टोबरला इंदिराजी, साहेब, जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद, स्वर्णसिंग यांच्या स्वाक्षरीचं एक खरमरीत पत्र निजलिंगअप्पांना देण्यात आलं.  सी. सुब्रमण्यम यांना कार्यकारिणीतून काढण्याचा एकतर्फी निर्णय व कमलापती त्रिपाठी आणि अन्य नेत्यांना त्यांच्या पदावरून हटविण्याचा घेण्यात आलेला निर्णय हे दोन्ही निर्णय कार्यकारिणीच्या ऐक्याच्या निर्णयाला बाधा आणणारे निर्णय आहेत.  याकरिता १५ ऑक्टोबरला कार्यकारिणीची बैठक घ्यावी व लगेच १५ नोव्हेंबरपूर्वी काँग्रेसचं खास अधिवेशन घेण्यात यावं.

१ नोव्हेंबरला निजलिंगअप्पांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली.  कामराज यांच्या सल्ल्यानुसार सी. सुब्रमण्यम, साहेब, जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद यांना पक्षातून काढून टाकावं असं सिंडिकेटच्या मंडळींनी ठरविलं.  इंदिराजींना पक्षात बेदिली माजवीत आहात याबद्दल एक आरोपपत्र देण्यात आलं.  शंकरदयाळ शर्मा, फक्रुद्दीन अली अहमद आणि सी. सुब्रमण्यम यांना कार्यकारिणीतून काढल्याचा फतवा काढण्यात आला.  अशा या बेजबाबदार कार्यवाहीमुळं इंदिराजी आणि साहेबांनी व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी १ नोव्हेंबरच्या निजलिंगअप्पांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.  त्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला इंदिराजींच्या निवासस्थानी बैठक घेऊन व अ. भा. काँग्रेसची बैठक बोलावून नवीन अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.  निजलिंगअप्पांच्या अध्यक्षतेखाली ठरलेली कार्यकारिणीची बैठक झाली.  काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात येऊन पक्षाचे दोन तुकडे झाले.  ही घटना १ नोव्हेंबर १९६९ ची.

कार्यकारिणीची दोन छकलं पडल्यानंतरही काही प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांनी साहेबांची भेट घेतली.  साहेबांनी आपल्या प्रामाणिक व चांगल्या सदिच्छेचा उपयोग करून दोन्ही गटांत समेट घडवून आणावा, पक्षाला या संकटातून वाचवावं अशी विनंती केली.  साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीचा मान ठेवून प्रयत्‍न करून बघितला.  शंकरदयाळ शर्मा वगळता फक्रुद्दीन अली अहमद व सी. सुब्रमण्यम यांच्यावरील कार्यवाही मागे घेण्यास सिंडिकेट तयार झाली.  शंकरदयाळ शर्मा यांच्यावरील कार्यवाही मागे घ्यावयाची असेल तर मोरारजी देसाई व अन्य मंत्र्यांना परत इंदिराजींनी मंत्रिमंडळात घ्यावं, अशी अट निजलिंगअप्पांनी घातली.  निजलिंगअप्पा आणि इंदिराजी यांच्यात खलित्याची लढाई सुरू झाली.  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.  निजलिंगअप्पा आणि इंदिराजींमध्ये वैयक्तिक कडवटपणा निर्माण झाला.  निजलिंगअप्पांनी बोलावलेली १२ नोव्हेंबरची कार्यकारिणीची बैठक चालू असताना याचवेळी इंदिराजींच्या निवासस्थानी इंदिराजींनी बैठक बोलावली होती.  

शेवटचा प्रयत्‍न म्हणून साहेब व वसंतराव नाईक यांनी इंदिराजींच्या घरून स. का. पाटील यांच्याशी संपर्क साधला.  स. का. पाटील निजलिंगअप्पांनी बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त होते.  नाईकांनी जो निरोप स. का. पाटलांना दिला त्यावर स. का. पाटील यांनी त्यांच्या सहकार्‍यांशी चर्चा केली व नाईकांना उलट निरोप दिला - 'पंतप्रधानाच्या गटाशी सहमत होण्याची वेळ निघून गेली आहे.'  १२ नोव्हेंबर १९६९ रोजी दुपारी १ वाजता इंदिराजींना निजलिंगअप्पांच्या काँग्रेस कार्यकारिणीनं काँग्रेस पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.  गांधी-नेहरूंची काँग्रेस दुभंगली.  अखिल भारतीय काँग्रेसपासून प्रदेश काँग्रेस ते जिल्हा काँग्रेसपर्यंत काँग्रेसच्या चिरफाळ्या, ढिलप्या, किलच्या उडाल्या.