साहेबांची हेटाळणी करताना भुत्तो म्हणाले, ''भारताचे संरक्षणमंत्री पाकिस्तानवर लांडग्यासारखे तुटून पडले असले तरी पाकिस्तानला भारतीय संरक्षणमंत्र्यांनी शेळी, मेंढी समजू नये. याची त्यांना कल्पना यावी.''
छांबमधील पाकिस्तानची झालेली दमछाक त्यांच्या जिव्हारी लागली. ३ व ४ सप्टेंबरला सेबरजेट विमानाच्या मार्यानं भारतीय हद्दीत मुसंडी मारली. भारतीय हवाई दलानं भारतीय बनावटीची आकारानं लहान असलेली 'नॅट' विमानं हल्ल्यात वापरून सेबरजेटसारख्या शक्तिशाली विमानाचा फडशा पाडला. अखनूरच्या दिशेनं पाक सैन्याची भारतीय हद्दीत आगेकूच चालूच होती. ५ सप्टेंबरला पाक सैन्य अखनूरच्या टप्प्यात पोहोचलं. पाकचे जनरल मुसा सैन्याला चिथावणीखोर भाषा वापरून प्रोत्साहन देत आहेत. 'अल्ला तुमच्या पाठीशी आहे.... तुमचा विजय निश्चित आहे,' असे ते म्हणत आहेत.
पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय भूमीचा काही मैलांचा भाग काबीज केला. काश्मीरचं स्वातंत्र्य धोक्यात सापडलं होतं. संरक्षण खात्यातील अधिकार्यांची आणि लष्करी अधिकार्यांची एकच झुंबड उडाली आहे. खलबतावर खलबतं चालू आहेत. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, तीनही दलांचे प्रमुख यांच्या बैठकांवर बैठका चालू आहेत. देशाच्या अस्तित्वासाठी आणि इतिहासानं नोंद घ्यावी असा भारतानं घेतलेला निर्णय आहे तो स्वरक्षणार्थ करवाई करण्याचा. ६ सप्टेंबरला निर्णयाची अंमलबजावणी करताच पाकिस्तानचं संरक्षण खातं चक्रावून गेलं. त्यांना काय करावं हेच कळेना. भारतीय सैन्याने लाहोरच्या दिशेनं गुरुदासपूर, अमृतसर आणि फिरोजपूर अशा तीन आघाड्यांवरून चाल करून जाण्याचं ठरविलं. भारतीय सैन्य विद्युतवेगानं लाहोरच्या दिशेनं झेपावलं. संसदेत साहेबांनी हे स्वसंरक्षणाकरिता आक्रमण जाहीर करताच टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचं संसदेनं स्वागत केलं. छांबमध्ये सियालकोटचा ताबा घेऊन पाकिस्तानचं कंबरडं मोडून काढण्याचं उद्दिष्ट भारतीय लष्कराला देण्यात आलं. भारतीय सैन्य पाकच्या भूप्रदेशाचा कब्जा करीत लाहोरच्या दिशेनं मुसंडी मारीत आहे. काश्मीरकडील पाकिस्तानच्या सैन्याला आपली मोहीम थांबवून लाहोरच्या संरक्षणाकरिता धाव घ्यावी लागत आहे.
लाहोरचं संरक्षण करणार्या इचोगिल कालव्याला हस्तगत करणं हे भारतीय सैन्याचं लक्ष्य आहे. लाहोरची सुरक्षितता या कालव्यावर अवलंबून आहे. हा कालवा काबीज केला की लाहोरवर ताबा मिळविल्यातच जमा आहे. इचोगिल कालव्याच्या काठावर वसलेलं डोंगराई, खेमकरण आणि बर्की इथपर्यंत भारतीय सैन्याने धडक मारून लाहोरची कोंडी केली. २२५ पॅटन रणगाड्यांनी ३० चौरस मैलाचं क्षेत्र व्यापलेलं आहे. या रणगाड्याची ताकद पाकिस्तान सैन्याची पहिल्या प्रतीची आहे. भारतीय लष्कराकडे रणगाड्यांची कमतरता असूनही भारतीय लष्करानं शिवयुद्ध नीतीचा गनिमी कावा युद्धात वापरून या पाकिस्तानी राक्षशी रणगाड्यांचा फडशा पाडला. ९७ रणगाड्यांना ताब्यात घेऊन खेमकरण येथे पॅटन रणगाड्यांचं कब्रस्तान निर्माण केलं. लाहोरचा बचाव आपण करू शकत नाही या भीतीनं पाकिस्तानी सैन्याला आपला जीव वाचविण्यासाठी व लाहोरचा बचाव करण्याकरिता पूल उडवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला. सियालकोट आघाडीवरही रणगाड्यांची धुमश्चक्री उडाली. पाक हवाई दलानं नागरी विमानावर हल्ला करून गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचा बळी घेतला. अमृतसरच्या बगलेतील चिराटा या नागरी भागावर बॉम्बवर्षाव करून तो भाग बेचिराख केला.