थोरले साहेब - १६९

''माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे.'' आई.

मी आईला विचारावं असं साहेबांनी मला नजरेनं खुणावलं.  मग हळूच आईला मी विचारलं.

म्हणाले, ''आई, देशावर संकट आलं आहे.  नेहरूजी संकटांत सापडलेत.  नेहरूजी साहेबांना मदतीकरिता दिल्लीला बोलावताहेत.''

''नेहरूंवर असं काय संकट आलं आणि यशवंता दिल्लीला गेला म्हणजे ते संकट टळू शकेल ?''  आई.  

''होय आई, नेहरूजींचा तसा विश्वास आहे.  हिमालयाच्या बाजूनं चीन भारतात घुसखोरी करीत आहे.  लढाईला तोंड फुटलंय.  आपल्या सैन्याचं मनोधैर्य खचलं आहे.  देशाची जनता नेहरूजींवर नाराज झाली आहे.  आपल्या सैनिकांना प्राणाला मुकावं लागत आहे.  भारताच्या संरक्षणमंत्र्यावर जनता नाराज आहे.  त्यांना दूर सारून साहेबांना संरक्षणमंत्री करताहेत नेहरूजी.''  मी.

''नेहरूजी संकटात सापडले, हिमालयावर शत्रू चाल करून येतोय, आपले सैनिक धारातीर्थी पडत आहेत.  त्यांच्या संरक्षणाकरिता तू जात असशील तर नाही कशी म्हणू मी.  उलट मला न विचारता तू गेला असता तर मला तुझा अभिमान वाटला असता.  वेळ दवडू नको.''  आई.  

''आई, तुला विचारण्याचा आमचा हेतू वेगळा होता.  तू नाही म्हणणार नाही याची खात्री होती आम्हाला; पण आई, तुझं वय झालंय.  तुझी सेवा करण्याची इच्छा  आहे आमची.'' साहेब.

''अरे यशवंता, मातेची सेवा करण्याची तुझी इच्छा आहे ना, मग भारत तुझी माता आहे.  तिची सेवा म्हणजे माझी सेवा समज.  आईला आणि मातीला विसरू नको.  आई आणि माती एकच आहे.  भारतमातेची सेवा कर.  अरे, घार आकाशी जरी फिरत असली तरी तिचं चित्त तिच्या पिलाकडं असतंच.  तसं तू कुठंही जा, माझं चित्त तुझ्यापाशी राहील.  माझा आशीर्वाद सदैव तुझी पाठराखण करीत राहील.  यशवंत हो.''  आई.

आम्ही दोघं आईचा आशीर्वाद घेऊन पुढील आमच्या कामाला लागलो.  आईसोबत विचारविनिमय करून साहेब तयार होऊन त्यांच्या दैनंदिन कामास लागले.  आज ८ नोव्हेंबर.  दोन दिवसांत साहेबांना आपला निर्णय श्रेष्ठींना कळवायचा आहे.  दिल्लीमध्ये नेहरूजी आणि लालबहादूर शास्त्री यांचं साहेबांच्या बाबतीत बोलणं झालं असावं.  नेहरूजी जे काही संघर्षकालीन निर्णय घेत त्या वेळी शास्त्रीजी त्यांच्यासोबत असत.  ९ नोव्हेंबरला साहेबांना शास्त्रीजींचा फोन आला.  नेहरूजींच्या बोलण्याची उजळणी शास्त्रीजींनी साहेबांशी बोलताना केली. साहेबांनी नेहरूजींसोबत जे बोलणं झालं त्याची कल्पना शास्त्रीजींना दिली.  शास्त्रीजीदेखील नेहरूजींप्रमाणे माझा विचार साहेब घेणार यावर खूश झाले.  १० नोव्हेंबरला साहेबांचा कार्यालयामधून मला घरी फोन आला, 'मला ४ वाजता दिल्लीला पोहोचायचं आहे.  नेहरूजींचा फोन होता.'  मी साहेबांची बॅग भरून ठेवली.  त्यांना प्रवासात वाचण्याकरिता एक पुस्तकही बॅगमध्ये ठेवलं.  साहेब कार्यालयातून घरी आले.  मातेचं दर्शन घेतलं.  माझ्याकडं आत्मविश्वासानं चित्त भरून बघितलं.  मी नेहमीप्रमाणं हसतुमखानं भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.  साहेब दिल्लीच्या रोखाने निघाले.