बुद्धीवर तुम्ही पोट भरीत आहात याची जनतेला जाणीव होत आहे. या बुद्धिजीवींना या महाराष्ट्रात काय पाहिजे हे कळायला मार्ग नाही. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रात 'बहुजनसुखाय बहुजनहिताय' चे निर्णय घेण्यात आले तेव्हा तेव्हा या बुद्धीवर पोट भरणार्या वर्गांनी विरोध दर्शविला. संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकाराम घ्या, जोतीबा फुले घ्या, शाहू महाराज घ्या आणि आता लोकशाहीमध्ये मी मुख्यमंत्री झालो तर मलाही विरोध ! यांना शेवटी या महाराष्ट्राचं काय करायचं आहे हे तरी कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा जाणूनबुजून प्रयत्न कुणी करणार असतील तर शासनाचा प्रमुख म्हणून मलाही काही कटू निर्णय घ्यावे लागतील. ते निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाने आपल्याला दिलेली एक देण आहे. जगातील इतिहासकारांनी, विद्वानांनी म्हटलंय, 'हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं.'
आमच्या देशात महाराज जन्माला आले हे आमचं भाग्य आहे. महाराष्ट्र तर त्यांची जन्मभूमी. त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या स्मारकाला विरोध करून आम्ही आमचा करंटेपणा जगासमोर दाखवीत आहोत. मी विरोधकांना सावध करतो. आपण आपल्या निदर्शनाचा पुनर्विचार करावा. तुम्हाला जनतेनं एका निवडणुकीत निवडून दिलंय. त्याचा उपयोग विधायक कामासाठी करा, असं मी तुम्हाला आवाहन करीत आहे. निदर्शकांच्या प्रेतांवरून जाण्याची भाषा आता बदलली आहे, असं मला कळलंय. आता फक्त घोषणा देण्याचं ठरविण्यात आलं आहे. मी म्हणतो, घोषणा तरी कशासाठी ? संयुक्त महाराष्ट्र मागण्याचा तुम्हाला हक्क आहे. त्याच्यासाठी आवश्यक घोषणा द्या; पण त्या प्रतापगडाच्या परिसरातच का ? घोषणा देण्यासाठी भारताची भूमी तुम्हाला मोकळी आहे. माझं काम तुम्हाला सावध करण्याचं आहे. ते मी केलं आहे.''
संपूर्ण सातारा जिल्हा समितीच्या विरोधात पेटून उठला. ३० नाव्हेंबर ही तारीख जवळ येऊ लागली. वर्तमानपत्रात पत्रकबाजी, दम-प्रतिदमांनी महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मावळे शिवशाहीच्या काळात पोहोचले. त्यांच्या अंगात शिवशाही संचारली. प्रतापगडाच्या पायथ्याशी पुन्हा युद्ध होणार असं बोललं जाऊ लागलं. शिवभक्त आणि समितीप्रेमी लाखोंच्या संख्येने प्रतापगडाच्या पायथ्याशी जमा झाल्यानंतर तिथं उद्भवणारी परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शासनाला कठीण जाईल. अफजलखानाच्या सैन्याची जी लांडगेतोड अवस्था निर्माण झाली होती तशी समितीच्या कार्यकर्त्यांची होऊ नये, असा विचार करणारी मंडळी अस्वस्थ झाली. त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. मवाळ धोरण स्वीकारणार्या समितीच्या प्रतिनिधींनी साहेबांशी संपर्क साधला. कार्यक्रम हा दोन महापुरुषांच्या इभ्रतीचा झाला आहे. कार्यक्रम पार पाडीत असताना त्याला कुठलंही गालबोट लागता कामा नये याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली पाहिजे. त्याकरिता आपल्याला मार्ग काढावा लागेल, असं आपलं मत साहेबांनी समितीतील मवाळ प्रतिनिधींसमोर ठेवलं. चर्चेअंती समितीच्या देशावरील निदर्शकांनी वाईच्या पुढे आणि कोकणातील समितीच्या भक्तांनी पोलदपूरच्या पुढे चाल करून याचं नाही, असं ठरलं. या दोन्ही ठिकाणी समितीच्या चेल्याचपाट्यांनी घोषणा द्याव्यात, सभा घ्याव्यात व आपला विरोध दर्शवावा. दोन्ही ठिकाणी पालिसांचा कडेकोट बंदोबस्त राहील. पोलिसांनी परिस्थिती हाताळताना पोलिस बळाचा वापर समयसूचकतेनं करावा अशा सूचना साहेबांनी पोलिस अधिकार्यांना दिल्या.
३० नोव्हेंबर १९५७ ला प्रतापगडावर शिवशाही अवतरली. गडाच्या अंगाखांद्यावर मावळे दिसू लागले. संपूर्ण शिवप्रेमी मावळा प्रतापगडाच्या पायथ्याशी जमा झाला. प्रत्येकाच्या अंगात वीरश्री संचारलेली. मिळेल त्या गाड्यांनी, पायी, सायकलवर हातात भगवा ध्वज घेऊन मावळ्या वेशातील शिवभक्त प्रतापगडाच्या पंचक्रोशीत येऊन पोहोचला. जिकडे नजर पोहोचेल तिकडे दर्याखोर्यातून मावळे गड चढताना दिसताहेत. शिवप्रेमी व समितीचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुठेच आमने-सामने येणार नाहीत अशी वाहनव्यवस्था व रस्ते तयार करण्यात आले होते. नेहरूजी पुण्याहून वाईमार्गे प्रतापगडावर पोहोचणार होते. ठरल्याप्रमाणे वाई येथे समितीचा मोठा जनसमुदाय जमा झालेला होता. नेहरूजींची गाडी याच रस्त्यानं प्रस्थान करणार होती. नेहरूजी ठरलेल्या वेळेस वाईमार्गे प्रतापगडावर जाण्यास निघाले. नेहरूजींसमवेत साहेब गाडीत होते. रस्त्याच्या दुतर्फा नेहरूजींच्या स्वागतासाठी जनता उभी होती. रस्त्यात जागोजागी कमानी उभारलेल्या होत्या. गाव आणि कमानीजवळ नेहरूजींच्या गाडीचा वेग कमी करण्यात येत असे. नेहरूजींना लोक डोळे भरून पाहत आणि गाडीवर फुले उधळून स्वागत करीत. नेहरूजी या स्वागतानं भारावून गेले.