थोरले साहेब - १३३

नेहरूजींनी माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, अशी धमकी समितीनं दिली.  वि. स. पागे यांनी पत्रक काढून या धमकीचा पुनर्विचार समितीनं करावा, असं कळकळीचं आवाहन समितीला केलं.  पुणेरी बुद्धिजीवींचं महाराष्ट्रावरील सावट फार काळ टिकेल, असे आता वाटत नाही, असंही मत पागे यांनी व्यक्त केलं.  दक्षिण सातार्‍यातील जनता या पुणेरी बुद्धिजीवींची सोय पाहण्याकरिता सज्ज झाली आहे.  समितीच्या नेत्यांनी आमच्या खाजगी कार्यक्रमात अडथळा निर्माण केला तर त्यांचा समाचार घेण्याची आमची तयारी आहे.  आमच्या छातीचा कोट करून हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवू, असं ठणकावून सांगितलं.  राष्ट्रीय समारंभात घुसून घोषणाबाजी आदी थेर केल्यास त्याचा मुकाबला आम्ही आमच्या परीनं करू, असं पागे यांनी दक्षिण सातारावासीयांच्या वतीनं आपल्या एका भाषणात समितीच्या नेत्यांना सांगितलं.

वर्तमानपत्रातही दोन गट पडले.  एक गट निदर्शने झालीच पाहिजेत या मताचा तर दुसरा गट निदर्शने ठेचून काढलीच पाहिजेत या मताचा होता.  काही वर्तमानपत्रे तटस्थपणे परिस्थितीचं अवलोकन करून समितीला व समितीच्या विरोधकांना सबुरीचा सल्ला देत होती.  जनता मात्र गोंधळून गेली होती.  जनतेचा दबाव वाढतच होता.  या सर्व गोंधळाचा परिणाम समितीत दोन प्रवाह निर्माण झाले.  रक्तपाताची अतिरेकी भाषा करणारा एक गट तर दुसरा गट निदर्शनाच्या विरोधात दबक्या आवाजात बोलू लागला.  काहींनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनविला.  महाराष्ट्रातील जनतीवन अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकले होते.

महाराष्ट्रातील या वैरभावाच्या वातावरणात काय करावे, यातून मार्ग कसा काढावा या विचारात साहेब गढून गेले.  शिवगनिमी युद्धनीतीची आठवण साहेबांना झाली.  'शत्रूच्या जाळ्यात अडकविण्याकरिता दोन पावले मागे सरावे लागले तरी चालेल' ही ती रणनीती होती.  साहेबांनी समन्वयकाची भूमिका घेऊन समितीतील दबक्या आवाजात निदर्शनाला विरोध करणार्‍यांशी संधान साधलं.  प्रतापगडावरील कार्यक्रम यशस्वी करून दाखवायचाच, असा विडा साहेबांनी उचलला होता.  साहेबांच्या कारकीर्दीतील हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार होता.  प्रतापगडावर कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू होती.  नेहरूजींना प्रतापगडावर जाण्याकरिता रस्ता तयार करून पूर्ण झाला होता.  युगपुरुष शिवछत्रपतींचा ३८ फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडावर पोहोचला होता.  जगाच्या इतिहासात या कार्यक्रमाची नोंद व्हावी, महाराष्ट्राच्या इभ्रतीत भर पडावी, शिवछत्रपतींच्या नावलौकिकाची जगाच्या इतिहासानं दखल घ्यावी, असा हा कार्यक्रम व्हावा ही साहेबांची इच्छा होती.

मुंबईतील एका सत्कार समारंभात प्रतापगडावरील शिवछत्रपती स्मारकाच्या संदर्भात बोलताना साहेब म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराज भारताचा मानबिंदू आहेत.  चाळीस कोळी जनतेच्या भावनेचा हा प्रश्न बनला आहे.  जनतेच्या भावनेशी कुणी खेळण्याचा प्रयत्‍न करू नये.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणार्‍यांची मानसिकता मला कळत नाही.  ज्यांनी हे राज्य निर्माण केलं त्या जन्मदात्यालाच यांचा विरोध का ?  महाराजांच्या छत्रछायेखाली यांना संरक्षण मिळालं त्या संरक्षणकर्त्यालाच तुमचा विरोध का ?  मी विरोधकांना सावध करीत आहे.  तुम्ही विस्तवाशी खेळू नका.  हा निखारा का एकदा पेटला तर तुमच्या विरोधाची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही.  खरे बुद्धिवादी जागे झाले आहेत.  त्यांनी पोटभरू बुद्धिजीवींच्या विरोधात पत्रकबाजी सुरू केली आहे.  ते बुद्धिवादी आहे आणि तुम्ही बुद्धिजीवी आहात.