थोरले साहेब - १२७

शेतकरी व कामगारांना काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जवळचे वाटतात.  पांढारपेशा व उच्चवर्णीयांना विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आपले वाटतात, असं चित्र जनतेमध्ये १९५७ च्या निवडणुकीत निर्माण झालं.  लोकशाहीतील युद्धात वर्तमानपत्र अत्यंत प्रभावशाली शस्त्र मानण्यात येतं.  अत्रेंसारख्यांचं 'मराठा' वर्तमानपत्र आग ओकत होतं.  अत्रेंची ही मुलूखमैदान तोफ काँग्रेसचे धिंडवडे उडवीत होती.  वर्तमानपत्राच्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेचं श्राद्ध घालून त्या श्राद्धाच्या जेवणावर ताव मारून ताजेतवाने झालेले विरोधक काँग्रेसची भंबेरी उडवीत होती.  हिंसक मार्गांचा अवलंब करून काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होताना दिसत होते.  बुद्धिभेद करणारा एक वर्ग साहेबांच्या पाठीमागे हात धुऊन लागला.  या निवडणुकीत साहेबांचा पराभव करण्याचा विडा त्यांनी उचलला.  विरोधकांच्या या तुफान मार्‍याला आपल्या बुद्धीच्या जोरावर अहिंसक मार्गाने परतावून लावण्याचा प्रयत्‍न साहेब करताहेत.  विरोधकांनी साहेबांना क्रमांक एकचा शत्रू मानलं आणि काँग्रेसला दुसरा क्रमांक दिला.  या युद्धाचं 'साहेब विरुद्ध समिती' असं चित्र रंगविण्यात येऊ लागलं.  साहेबांचा पराभव म्हणजे काँग्रेसचा पराभव हे ध्येय उराशी बाळगून विरोधकांनी साहेबांना सळो की पळो करून सोडलं.  युद्धात तसेच निवडणुकीत तत्त्व आणि नैतिकतेला पायदळी तुडविलं जांतं याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे १९५७ ची निवडणूक.  प्रचाराला कुठला धरबंध उरला नाही.  अत्रेंचं 'मराठा' दैनिक द्वैषाचं विष पेरण्यात पटाईत होतं.

खेर आणि मोरारजी या दोघांनी आपल्या कारकीर्दीत सत्ता राबविताना जे निर्णय घेतले ते बहुजनांच्या विरोधातले होते.  त्याचे परिणाम या निवडणुकीत काँग्रेसला भोगावे लागत आहेत.  खेर यांचा इंग्रजी विषयासंबंधीचा निर्णय, मोरारजी देसाईंनी केलेला गोळीबार, स. का. पाटलांनी मुंबईबद्दल केलेली दर्पोक्ती या सर्व घटनांच्या संदर्भात विरोधकांनी उठवलेलं वादळ या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाकणार असं वातावरण निर्माण करण्यात आलं.  साहेबांच्या नेहरूंप्रती असलेल्या निष्ठेच्या अर्थाचा अनर्थ करून साहेबांची प्रतिमा खलपुरुषाची ठरवून त्यांना नेतस्तनाबूत करण्याचा विरोधकांनी आखलेला डाव हाणून पाडणे साहेबांना अवघड जाऊ लागले.  'मराठा' वर्तमानपत्रानं प्रचाराचं सोडलेलं तारतम्य, जनतेच्या काळजाला भिडणारं लिखाण, हुतात्म्याची छायाचित्रे छापून जनतेच्या भावनेला पेटविण्यचा उद्योग 'मराठा' वर्तमानपत्र करू लागलं.  खेर वगळता आचार्य अत्रेंनी आपल्या घणाघाती भाषणात मोरारजी, स. का. पाटील, साहेब, नेहरूजींना लक्ष्य बनविलं.  मोरारजी देसाईंचा उल्लेख अत्रे आपल्या भाषणात नेहमी 'कसाई' म्हणूनच करायचे, तर स. का. पाटलांना 'नासका पाटील' म्हणून हिणवायचे (ना. स. का. पाटील).  साहेबांना 'विश्वासघातकी' म्हणत 'सूर्याजी पिसाळ' ठरवायचे.  कधीकधी नेहरूंना 'औरंगजेबाची' उपमा द्यायचे.  जनता अत्रेंच्या भाषणाची मजा लुटायचे.  

काँग्रेसमधील दुसर्‍या फळीच्या नेत्यांनी प्रचाराचा मार्ग बदलून टाकला.  या नेत्यांनी जनतेत जाऊन मराठी भाषा नसलेल्या विविध जाती-जमातींना द्वैभाषिक राज्यामध्येच तुम्हाला कसे संरक्षण मिळेल हे पटवून देऊ लागले.  बिगरमराठी भाषिकांना कार्यकर्त्यांचा हा विचार पटायचा.  ग्रामीण भागात वेगळीच शक्कल कार्यकर्त्यांनी लढविली.  'काँग्रेसला मत म्हणजे यशवंतराव चव्हाणांना मत' अशा घोषणांनी ग्रामीण भाग दणाणून सोडला.  साहेबांचं कुटुंब शेतकरी वर्गातलं.  शेतकर्‍यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे उच्चवर्णीयांच्या मनाला खटकतंय.  ही मात्रा ग्रामीण भागात लागू पडली.  साहेबांना सत्तेवरून पायउतार करण्याचा उच्चवर्णीयांचा मनसुबा उधळून लावा, असा प्रचार कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात सुरू केला.  साहेब या निवडणुकीत प्रमुख उमेदवार असल्यानं दिल्लीचे डोळे या निवडणुकीकडे लागले.  महाराष्ट्र तर साहेबांकडे आपला प्रतिनिधी म्हणून पाहू लागला.  या निवडणुकीत साहेबांना बदनाम करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही.  ही निवडणूक 'साहेब विरुद्ध विरोधी पक्ष' अशीच झाली.  साहेब निवडून आले तर द्वैभाषिक राज्यनिर्मितीचा विजय होईल, मुंबई हातची जाईल याप्रमाणे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न केला.  कराड मतदारसंघाकडं देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं.  साहेबांचा विजय म्हणजे महाराष्ट्राचा विजय असं सर्वांनी गृहीत धरलं होतं.