थोरले साहेब - १२५

आज मी तुमच्याकडे आलो आहे ती माझी कैफियत घेऊन.  मी जनतेच्या दरबारात, जनतेच्या भल्याकरिता जनतेचा प्रमुख म्हणून न्याय मागत आहे.  माझं काही चुकत असेल तर माझी चूक लक्षात आणून द्या.  मी ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्‍न करील.  लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते असे मी मानतो.  जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसभेत बसलेले आहेत.  त्या प्रतिनिधींनी द्वैभाषिक राज्य राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  ही लोकसभा सार्वभौम आहे.  तिचा निर्णय बदलवण्याचा अधिकार आम्हाला नाही.  विरोधी मित्रांना माझी विनंती आहे की, तुम्हाला आणि मला एकाच ठिकाणी पोहोचायचे.  रस्ते, मार्ग वेगवेगळे आहेत.  आडमार्गानं जाऊ नका.  आडमार्गाचा रस्ता विचारता विचारता ज्या गावी तुम्हाला जावयाचे आहे ते गाव बाजूला राहून जाईल.  मग तुम्ही पुन्हा म्हणणार, 'आम्हाला चकवा झाला.'  जनता यावर विश्वास ठेवणार नाही.  आपण राजमार्गानं हातात हात घालून जाऊया आणि द्वैभाषिक राज्याचा विकास करूया.  राज्याच्या सीमा वाढविण्याच्या लढ्यात आपण एकमेकांची डोकी फोडीत बसलो तर डोकीच शिल्लक राहणार नाहीत.  मग त्या राज्याच्या सीमा कुणासाठी वाढवायच्या ?  माझ्या निष्ठा या मी पूर्वीच व्यकत केल्या आहेत.  त्यावरून मोठा गदारोळ माजविण्यात आला.  भारताप्रती माझं डोकं मी अर्पण केलेलं आहे.  आता दुसरं डोकं अर्पण करण्यासाठी मी ते आणू कुठून ?  म्हणून म्हणतो, सामाजिक आणि आर्थिक बदल झपाट्याने होत आहेत.  त्यात आपण मिळून सामील होऊ आणि आपला विकास करून घेऊ.  निजाम राजवटीत खितपत पडलेला मराठवाड्यातील भाऊ आपल्यात आला आहे.  विदर्भातील भाऊ हिंदी भाषिक प्रदेशात 'ना घर का ना घाट का' अशा अवस्थेत जीवन कंठीत होता.  तो मराठी भाषिक प्रदेशात येऊन मोकळा श्वास घेत आहे.  काठेवाडचा सामनाथला मानणारा आपला एक भाऊ आपल्याबरोबर नांदायला तयार आहे.  त्याला सोबत घेऊन द्वैभाषिक राज्याची जबाबदारी पार पाडूया.  अज्ञान आणि दारिद्र्याच्या कचाट्यातून जनतेला सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करूया.  गुजराती आणि मराठी हे सख्खे भाऊ आहेत असं मी म्हणणार नाही, तर ते जुळे भाऊ आहेत असे मी म्हणेल.  आपण सर्वजण एकत्र येऊन बुरसटलेल्या विचाराच्या अंधकारात अडकलेला विकासाचा रथ ओढून काढूया.  सामान्यांच्या जीवनात विकासाचा प्रकाश उजळूया.

प्रजासत्ताक लोकशाही आपण ज्या दिवशी मान्य केली त्या दिवसापासून पुरोगामी विचाराचं वारं भारतात वाहू लागलं.  मी मुख्यमंत्री होणं म्हणजेच जन्म, जात, धर्म, वंश या कुठल्याही बाबींचा विचार न करता फक्त तो या भारताचा नागरिक आहे या एका तत्त्वावर तो कुठल्याही पदावर जाऊ शकतो.  या महाराष्ट्रात शिक्षणाची दारं वंचितांसाठी महात्मा फुलेंनी खुली केली नसती, शाहू महाराजांनी शिक्षण तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत नेलं नसतं, स्वातंत्र्य मिळविताना या मातीचं सोनं करण्याची किमया महत्मा गांधींनी केली नसती, समाजवादाचा साक्षात्कार घडविणारे नेहरूजी नसते तर मी देवराष्ट्र या गावचा यशवंत गुराखी म्हणून कुण्या धनदांडग्याकडे आयुष्य व्यतीत केलं असतं.  मी मुख्यमंत्री झालो हा भारतातील दबलेल्या समाजाचा हुंकार आहे.  या हुंकाराचं रक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आहे.  हा हुंकार दबता कामा नये.  लोकशाही मार्गांनी आपण आपला संयुक्त महाराष्ट्र मिळविणार आहोत; पण तो अहिंसेच्या मार्गानं.  हिंसेच्या मार्गानं आपल्याला जावयाचे नाही.  त्या मार्गानं आपले प्रश्न सुटणार नाहीत.''

साहेबांनी आपलं मन जनतेसमोर उघडं केलं.  साहेबांनी सारखं बोलत राहावं असं मला आणि समोरच्या श्रोत्यांना वाटत होतं.  कारण साहेबांच्या संपूर्ण भाषणाच्या वेळेत एकही श्रोता सभेतून उठून गेला नाही.  साहेब आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले.  मोठ्या दिमाखात सत्कार सोहळा पार पडला.