सोनहिरा
१९४६ चा मार्च महिना. चव्हाण घराण्यात इतिहासाने नोंद घ्यावी अशी घटना घडली. कराड विधानसभेची निवडणूक साहेबांनी जिंकली. कार्यकर्त्यांचा जल्लोष, गावकर्यांचा आनंद शिगेला पोहोचलेला. घरापर्यंत येण्यास साहेबांना उशीर होऊ लागला. माझं मन सैरावैरा धावू लागलं. कधी साहेबांना ओवाळते आणि त्यांच्या आनंदात सहभागी होते असं झालं मला. एकदाचे साहेब घरासमोर आले. प्रथम आई व बंधूच्या पायाला स्पर्श करून त्यांचं दर्शन घेतलं. अनेक महिलांनी साहेबांना ओवाळलं. तशी मीही ओवाळण्यासाठी पुढं आले. ओवाळते वेळी माझी आणि साहेबांची नजरानजर झाली. त्यांच्या चेहर्यावरील भाव माझ्या मनात प्रवेशकरते झाले. साहेबांच्या हृदयातून निघालेले बोल माझ्या कानी पडले.
बोल होते - ''यशाची खरी मानकरी तूच आहेस.''
या वाक्यानं माझ्या काळजाचा ठाव गाठला. माझ्यावर झालेल्या संस्कारांचा सन्मान साहेबांनी केल्याची जाणीव क्षणभर मला झाली.
लगेच मी म्हणाले, ''अशी वाटणी करायची नसते.''
माझे वडील कै. रघुनाथराव मोरे हे मूळचे फलटणचे. आम्ही मुंबईला राहत असू. वडील बडोदे राजघराण्याच्या खाजगी खात्यामध्ये महत्त्वाचे गृहस्थ. वडिलांची फलटण येथे उत्तम शेती व घर. घरंदाज संस्कार आमच्यावर व्हावेत म्हणून आम्हाला वर्षातून दोन-तीन महिने फलटण येथे राहावे लागे. माझ्या वडलांचे दोन विवाह. पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. पहिल्या पत्नीला दोन कन्या - सोनूबाई व तानूबाई. दुसरी पत्नी माझी आई - लक्ष्मीबाई. मी, चंद्रिका व धाकटा भाऊ बाबासाहेब लक्ष्मीबाईंची अपत्ये. माझा जन्म फलटण येथे २ फेब्रुवारी १९२६ ला झाला. मातापित्याचं छत्र हरपल्यानंतर माझी बहीण सोनूबाईचे यजमान नामदेवराव धस यांनी आमच्या पालकत्वाची भूमिका पार पाडली.
साहेब मला पाहण्यासाठी सातरला आमच्या नातेवाईकांच्या घरी आले. मला पाहण्याचा सोपस्कार रीतिरिवाजाप्रमाणं पार पडला. ''वकील असलो तरी प्रथम मी स्वातंत्र्य चळवळीचा कार्यकर्ता आहे. मिळकत म्हणाल तर जेमतेम. एकत्र कुटुंब. आई देवभोळी. तिला समजावून घेणरी घरंदाज सून हवीय.'' असं त्या वेळी साहेब म्हणाल्याचे मला आजही आठवते. साहेब हे बोलत असताना मी टक लावून त्यांना बघून घेतलं. साहेबांनी मला काही प्रश्न विचारले. मला जसं सुचलं तशी मी उत्तरं दिली. त्यांच्या चेहर्याकडे पुन्हा एकदा न्याहाळून बघितलं. त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे भाव दिसले. पाहण्याचा कार्यक्रम संपला. आमच्या घरात चर्चा सुरू झाली. मुलगा स्वातंत्र्य चळवळीतील, घरी जमीनजुमला काही नाही, शिक्षण हे एकमेव भांडवल. घरात ही चर्चा चालू असतानाच कराडहून मुलगी पसंत असल्याचा निरोप आला. माझ्या पसंतीचा प्रश्न नव्हता. त्या काळी मुलीचं मत विचारण्याची रीतच नव्हती. लग्न कराडला करावं लागेल, अशी गळ चव्हाण घराण्याकडून घालण्यात आली. माझं लग्न २ जून १९४२ ला करायचं निश्चित झालं. सर्वसामान्याच्या घरातील लगीनघाई मोर्यांच्या घरात सुरू झाली. कराड येथे मराठा बोर्डिंगच्या आवारात यशवंतरावांच्या कीर्तीला साजेल अशा भव्य स्वरूपात विवाह पार पडला. नामदेवराव धस यांनी कन्यादान केलं.
सौभाग्य हा दागिना व संसार हा धर्म मानून मोर्यांची लेक मी-वेणू २ जून १९४२ ला चव्हाण घराण्याची सून झाले. संसारसुखाची स्वप्नं सोबत घेऊन चव्हाण कुटुंबाची झाले. माणुसकी आणि माणसानं भरलेलं घर मला मिळालं. घरात आर्थिक श्रीमंती नाही; पण मनाची श्रीमंती ओथंबून वाहते. साहेबांच्या आईच्या रूपानं मला माझी आईच मिळाल्याचं भाग्य लाभलं. घरातील सर्व कामं उरकून फुरसत मिळाल्यानंतर आई आपल्या संसाराच्या गत आठवणीत रमायच्या. संसार करता करता जीवाची झालेली हेळसांड, साहेबांच्या जडणघडणीतील घटनाप्रसंग सांगायच्या.... साहेबांच्या आईचं माहेर देवराष्ट्र. शके २३० ते ४४० या काळात महाराष्ट्रात अनेक लहान-मोठी राज्ये आणि राजे उदयाला आले. देवराष्ट्राचं राज्य हे त्यापैकीच एक. देवराष्ट्र शके ४७८ मध्ये चालुक्याच्या अधिपत्याखाली आलं. पुढे थोड्याच काळात नामशेषही झालं. आज एका खेड्याच्या रूपानं तग धरून उभं आहे हे देवराष्ट्र. या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावी साहेबांच्या मातोश्रींचा जन्म घाटगे घराण्यात झाला. या घराण्यातील दाजीबा घाटगे आईचे बंधू. खाऊनपिऊन सुखी. शेतकर्याच्या जीवनातील हालअपेष्टा याही घराण्यात होत्याच.