• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १०

दाजीबा घाटगेही बहीण विठाबाई ढवळेश्वरच्या चव्हाण कुटुंबात दिली.  ढवळेश्वर खानापूर तालुक्यात छोटंसं खेडं.  ढवळेश्वरातील मानमरातब असलेलं हे कुटुंब.  गावातील एका शेतकर्‍याच्या कर्जाला जामीन राहिलं.  कर्जदाराकडून अथवा सावकाराकडून दगाफटका झाला असावा.  या कुटुंबाची जमीन सावकाराच्या घशात गेली.  भूमिहीन कुटुंब पोट भरण्यासाठी भटकंती करीत ढवळेश्वराच्या जवळच असलेल्या विटे या गावी स्थिरावलं.  काबाडकष्ट करून पोट भरण्यास पुरेल एवढी जमीन विकत घेतली.  त्यावर या कुटुंबाची गुजराण होऊ लागली.  साहेबांचे पणजोबा राणोजी चव्हाण यांचे वडील किंवा आजोबाच्या काळात ही घटना घडली असावी.  वाघोजी चव्हाण साहेबांचे आजोबा.  वाघोजी चव्हाण यांना दोन पुत्र.  एक रामचंद्र चव्हाण व दुसरे बळवंतराव चव्हाण.  थोरले चार पुस्तकं शिकल्याने शेती सोडून बेलिफ म्हणून सरकारी नोकरी करू लागले.  धाकले बळवंतराव विट्याला शेती करू लागले.  हेच बळवंतराव साहेबांचे वडील, आईचे पतीन अन् माझे सासरे....

माझे सासरे खूप मेहनती.  त्यांची सहचारिणी विठाआई.  जसा विठ्ठल-रुख्मिणीचा जोडा.  यांचा संसार बालगोपाळांनी बहरलेला.  साहेबांना दोन वडीलबंधू.  ज्ञानोबा व गणपतराव.  एक भगिनी - राधाअक्का-माझी नणंद.  मला दोन जावा.  जावा कसल्या ?  त्या माझ्या थोरल्या भगिनीच....

घरात कसलीच कुरबूर नाही की धुसफूस नाही... गरिबी हा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा समान धागा.  माझे सासरे अहोरात्र कष्ट उपसायचे.  आहे त्या शेतीव्यतिरिक्त दुसर्‍याकडेही काम करायचे.  आई त्यांच्या कष्टात सहभागी व्हायच्या.  घरातील सुनांनीदेखील आपल्या माहेरचा तोरा कधी मिरवला नाही.  आपापल्या परीनं कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्‍न त्या करीत असत.  चिद्द, चारित्र्य, संस्कार या त्रिवेणी संगमावर आईचा संसार बहरलेला.  आईच्या जीवनात अनेक संकटं आली; परंतु आई डगमगल्या नाहीत.

आई मुलांना सांगायच्या, ''अरे, संकटं ही ढगासारखी येतात आणि निघून जातात.  आपण धीर सोडायचा नसतो.''

आईच्या संसारात संकटांची उतरंड कमी होण्याऐवजी वाढत जायची तरीही आई निभावून न्यायच्या.  असंच एक संकट आईच्या जीवावर बेतलं अन् तेही साहेबांच्या जन्माच्या वेळी.

आईची यापूर्वीची बाळंतपणं सुखरूप झालेली.  याही वेळी बाळंतपणाला आई माहेरी - देवराष्ट्राला आल्या.  गोधुळीची वेळ झालेली.  देवराष्ट्राच्या पारावर गावातील कारभार्‍यांचा फड जमलेला.  दिवेलागणीची वेळ झाली तरीही दाजीबा घाटगे पारावर आले नाहीत.  कारभार्‍यांत कुजबूज सुरू झाली.  'भजनाच्या वेळेला येतील' असे गृहित धरून फड उठला.  देवराष्ट्रात रात्रीच्या वेळी नियमित भजन होत असे.  जेवूनखाऊन भजनीमंडळी देवळात आली तरीही दाजीबा घाटगे आले नाहीत.

इकडे दाजीबा घाटगे यांच्या वाड्यात वेगळीच चिंता पसरली होती.  दाजीबा घाटगे चिंतातुर अवस्थेत वाड्यासमोरील ओट्यावर एकटेच बसलेत.  घरात विठाईअक्काच्या जीवाची तगमग सुरू झाली.  आडवळणी गाव... गावात कुठल्याच वैद्यकीय सुविधा नाहीत.... अनुभवाच्या जोरावर गावातील वयस्कर चार-दोन सुईणी जमलेल्या... त्यांनी आपल्या अनुभवातील सर्व कसब पणाला लावलेले; पण त्यांच्या उपायांना यश येण्याची चिन्हे दिसेनात.  इकडे विठाईचा जीव खालीवर होऊ लागला.  सर्व आयाबहिणी चिंतेत पडल्या.  त्यांना काय करावं काही सुचेना.  जेवणवेळ टळून गेली.  विठाईच्या जीवघेण्या यातनांनी कहर केला.  त्यातच विठाईची शुद्ध हरपली.  माणसाचे प्रयत्‍न तोकडे पडले की, प्रयेक माणूस नाइलाजाने का होईना देवाला शरण जातोच.  विठाईअक्काची आई मोठी धिराची बाई... त्यांचा गावातील कुलदैवतावर भरवसा.  सागरोबा हे घाटग्यांचे कुलदैवत.  विठाईअक्काच्या आईनं सागरोबाचा धावा केला, मनोमन नवस बोलल्या.  विठाईअक्कावरील संकट टळलं.  घाटगे घराण्यात भाचा जन्माला आला.  चव्हाण घराण्याचा यशोदीप, सर्वहरा वर्गाचा तारणहार यशवंत दि. १२ मार्च १९१३ ला जन्मला.  दाजीबा घाटगे यांनी देवळातील भजनीमंडळीचं गूळ वाटून तोंड गोड केलं.