• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ८३

या बैठकीनंतर जेधेंचा जळफळाट झाला.  त्यांनी रागाच्या भरात काँग्रेस प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा दिला.  तांबे यांच्या आरोग्य भवनातील बैठकीनंतर महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले.  अध्यक्षपदाची जबाबदारी भाऊसाहेब हिरे यांच्यावर टाकण्यात आली.  सचिव म्हणून साहेबांची निवड झाली.  पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून काम करीत असताना साहेबांकडे प्रांतीय पातळीवरचं नेतृत्व करणारं पद चालून आलं.  भाऊसाहेब हिरे आणि साहेब ग्रामीण भागाचे प्रतिनिधी म्हणून सर्वांसमोर आले.  तांबे भवनातील बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली.  भाऊसाहेब हिरे आणि साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र प्रांत पिंजून काढला.  स्वतःला कुलवंत म्हणवून घेणारे पुढारी जरी काँग्रेसला सोडून गेले तरी त्यांची उणीव भरून काढण्याचं काम या जोडगोळीनं केलं.

मिरजेच्या दवाखान्यातून मला घरी जाण्याची परवनगी डॉक्टरांनी दिली.  साहेबांनी ठरविल्याप्रमाणं मी काही दिवस पुण्यात आराम केला.  डॉक्टरांच्या निगराणीखाली मी औषधोपचार घेऊ लागले.  साहेब त्यांच्या कामाच्या धबडग्यातून वेळ काढून पुण्यास येत असत.

एके दिवशी मीच त्यांना म्हणाले, ''अहो, माझी तब्येत आता ठणठणीत झालीय.  कराडला जाऊया की.''

''आता तू कराडला गेलंच पाहिजे.  आई एकटी पडलीय तिथं.  भागीरथी वहिनीची तब्येतही चिंताजनक झालीय.  सोनू वहिनी आणि राधाक्का सारख्या मिरजेला असतात भागीरथी वहिनीच्या मदतीला.  घरात लहान मुलं आईला भंडावून सोडत असतील.  त्यांचं करण्यासवरण्यात आईची दमछाक होत असेल.  आईच्या मदतीला तुला जायलाच पाहिजे.  राजाला सांभाळता सांभाळता आईचा जीवन मेटाकुटीला येत असेल.'' साहेब.

राजाची आठवण साहेबांनी काढली आणि मी केव्हा कराडला जाते अन् राजाला बघते असं मला झालं.  माझा राजा माझ्याशिवाय कसा राहिला असेल पाच-सहा महिने ?  माझी आठवण त्याने काढली असेल का ?  पण त्याचं वय ते काय माझी आठवण काढायला ?  भागीरथीबाई या आजारातून बर्‍या झाल्या पाहिजेत.  त्यांच्या औषधपाण्याकडं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे.... या विचारातच मी आणि साहेब कराडला केव्हा येऊन पोहोचलो हे कळलंही नाही.

मला पाहून आईचा जीवन भांड्यात पडला.  साहेब व मी जोडीनं आईचं दर्शन घेतलं.  घरात हजर असलेल्या पुतण्यांनी आम्हा उभयतांचे दर्शन घेतले.  छोट्या राजनं थोरल्या भावांचा कित्ता गिरविला.  साहेबांनी त्याला कड्यावर उचलून घेतलं.  तो माझ्याकडं पाहून माझ्याकडं येण्याचा प्रयत्‍न करू लागला.  मी त्याला साहेबांकडून माझ्या कडेवर घेतलं.  तो माझ्याकडं अनोळखी नजरेनं पाहू लागला.  सोबांनी प्रताप, शिवाजी, अशोकदादा यांची हजेरी घेतली.  त्यांच्या अभ्यासातील प्रगती विचारली.  अभ्यास करण्याबद्दल सूचना दिल्या.  सुधा व लीला यांना आईची काळली घ्यावयास बजावलं.  अभ्यासातून वेळ काढून आजीला आणि काकुंना मदत करण्यास सांगितलं.

गणपतराव गेल्यापासून भागीरथीबाई अबोल झाल्या.  त्यांच्या आसवांना खंड माहीत नव्हता.  कितीही समजूत काढली तरी त्या काहीएक ऐकायला तयार नसत.  सोनूताई पाठच्या बहिणीसारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.  त्यांच्या माहेरची माणसं त्यांना तळहातावरील फोडासारखी जपू लागली.  महागातील महाग औषधं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुरवू लागली.  भागीरथीबाईंच्या प्रकृतीमध्ये आशादायक चिन्हे आढळून येत नव्हती.  मानसिकदृष्ट्या त्या इतक्या खचल्या होत्या की, औषध घेण्यास नकार देऊ लागल्या.  त्यांची समजूत घालावी लागे.  आई अधूनमधून मिरजेला जाऊन भागीरथीबाईला उभारी देत.  लहान मुलासाठी तुला बरं व्हावं लागेल म्हणून सांगायच्या.  अबोल भागीरथीबाईचे डोळे तेवढे बोलत.  घळाघळा अश्रू गाळायच्या.

मला जवळ घेऊन म्हणायच्या, ''वेणू, राजाला जीव लाव बरं !  त्याची आबाळ होऊ देऊ नको.  त्याला तुझ्या मायेची ऊब दे.  त्याला अंतर देऊ नको.''