• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ७८

मध्येच आचार्य अत्रे म्हणाले, ''मी या पक्षात आहे.  मग या पक्षाला जातिवादी पक्ष कसं म्हणता येईल ?''

''या पक्षात आपलं स्थान काय आहे याची मला कल्पना नाही.'' साहेब.

''यशवंतराव, तुम्ही काँग्रेस पक्षाच्या सत्तेत आहात, मोरारजींच्या सोबत कार्यरत आहात.  तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी राहणारच.'' अत्रेंनी साहेबांवर वार केला.

''अत्रे साहेब, यशवंतराव म्हणतात त्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं.  आपण त्यांना समजावून घेतलं पाहिजे.  यशवंतराव सत्तेत आहेत म्हणून काँग्रेसची बाजू घेताहेत असा आरोप त्यांच्यावर करणे योग्य नाही.  सत्तेची लालसा असती तर त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना मंत्रीपद मिळावयास पाहिजे होते; पण ते मिळाले नाही.  त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती ते यशस्वीपणे हाताळताहेत.  यशवंतरावांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण नेहरूंवर विश्वास ठेवून काँग्रेसबरोबर राहू.  वेगळा पक्ष काढण्याचा विषय बाजूला ठेवू.'' पी. के. सावंत यांनी साहेबांची पाठराखण केली.

या बैठकीत साहेब एकाकी पडले.  मोरे-जेधे यांचा एक गट आणि साहेबांचा एक गट अशी कार्यकर्त्यांत व पक्षात विभागणी होऊ लागली.  शेवटी जेधे-मोरे गटाची सरशी होऊन त्यांनी 'शेतकरी कामगार पक्षा'ची स्थापना केली.  महाराष्ट्रातील स्वतःला स्वतःच खानदानी समजणारी मराठा मंडळी या पक्षाच्या आश्रयाला गेली.  साहेबांच्या गटानं मात्र काँग्रेसची साथ सोडायची नाही असा निर्णय घेतला.  पक्षात राहिलेल्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांची साहेबांनी मोट बांधली.  संपूर्ण मुंबई राज्याचा दौरा केला.  कार्यकर्त्यांना या फुटीमागचा अर्थ समजावून सांगितला.  काँग्रेसच्या विचारांना मानणारी नवीन कार्यकर्त्यांची फौज साहेबांनी तयार केली.  काँग्रेस पक्षातूनच काही मंडळी नवीन जन्माला आलेल्या पक्षाला रसद पुरविण्याचं काम करीत होती.  त्यांचं पक्षातलं महत्त्व आपोआप कमी होत गेलं.  तेही पक्ष सोडून नवीन पक्षात गेले.  मुंबई राज्यात काँग्रेसच्या विचारानं भारावलेली एकदिलाची कार्यकर्त्यांची फळी नेहरूजींच्या पाठीमागे साहेबांनी उभी केली.

मुंबईत राहून पक्षाच्या घराला बळकट करण्याच्या प्रयत्‍नात साहेब गुंतले.  वेळ काढून कराडला येऊन जात.  काय हवंय त्याची व्यवस्था करीत.  कराडच्या घराला दयनीय अवकळा आली.  घरात कुणी कर्ता पुरुष नाही.  आम्ही तिघी जावा आईला जपू लागलो.  आई नातवंडांना सांभाळण्यात वेळ घालवू लागल्या.  विस्कळीत झालेल्या घराला सावरण्याचा आटोकाट प्रयत्‍न करू लागल्या.  गणपतरावांपासून क्षयानं या घरात जो मुक्काम केला तो मुक्काम हलण्यास तयार नव्हता.  माझा स्वभावही चिडचिडा बनत चालला होता.  ज्ञानोबांच्या मृत्यूच्या धक्क्यातून मी आता कुठे सावरले होते तोच गणपतरावांना मृत्यूनं गाठलं.  सोनूताई व भागीरथीताईकडं पाहिलं की मला भडभडून यायचं.  त्यांच्या भवितव्याची चिंता खायला उठायची.  साहेब भेटायला आले म्हणजे मी अबोल व्हायचे.  साहेबांचा दुरावा मला सहन होत नव्हता.  मी त्यांच्यावर चिडायचे.  स्थितप्रज्ञ आईची मूर्ती मला पाहवत नव्हती.  घरातील दुःखाची छाया आणि साहेबांच्या दुराव्याच्या जात्यात मी भरडले जाऊ लागले.  साहेब भेटून गेल्यावर त्यांचं एखादं पत्र यायचं.  पत्रात माझ्या चिडण्याची त्यांना भीती वाटायची.  स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करण्याचा विचार त्यांच्या मनात यायचा.  पत्रात माझी मनधरणी करायचे.  अशा पत्रानं माझाही राग मावळायचा.  गणपतराव गेले तेव्हा विक्रम दीड वर्षाचा होता.  विक्रमला मी 'राजा' म्हणून बोलावते.  तो आहेही राजबिंडा.  आता तो घरभर धिंगामस्ती करू लागला.  माझा त्याला आणि त्याचा मला लळा लागला.  तो माझ्याच अंगावर वाढू लागला.  मला कामही करू देत नाही.  सारखा कडेवर घे म्हणतो.  मी त्याचे लाड पुरवू लागले.