• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ६२

गणपतरावांची प्रकृती डॉ. भरुचांच्या उपचारांनी सुधारू लागली.  त्यांना बरं वाटू लागलं.  ते हिंडूफिरू लागले.  नेहमीच कार्यात मग्न असलेले गणपतराव घरात बसून कंटाळले.  त्यांना घर खायला उठायचं.  पहिलवान गडी या बिमारीनं खंगून गेले.  त्यांची मित्रमंडळी त्यांना घरी बसू देत नसे.  मित्रांचा लोंढा सारखा त्यांच्या मागे असायचा.  गणपतराव कराडच्या बाजारपेठेत वजन बाळगून होते.  ते बाजारपेठेत गेले म्हणजे बाजार हरखून जायचा.  व्यापारी गणपतरावांचं आदरातिथ्य करायचे.  याच वेळी कराड नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या.  आमच्या घराकडे कार्यकर्ते आणि साहेबांच्या मित्रांच्या चकरा वाढल्या.  एकेदिवशी गौरीहस सिंहासने, हरिभाऊ लाड, शिवाजीराव बटाणे, शांतारामबापू, माधवराव जाधव, तुकाराम शिंदे, राघूअण्णा लिमये हे गणपतरावांच्या तब्येतीची विचारपूस करायला घरी आले.  गणपतरावांशी गप्पागोष्टी केल्यानंतर ही मंडळी आईकडे जाऊन बसली.  या सर्वांना पाहून यशवंताच घरी आल्याची क्षणभर जाणीव विठाईंना झाली.  आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.  

आई म्हणाल्या, ''अरे लबाडांनो, आज आठवण झाली का आईची ?  यशवंता मुंबईला गेल्यापासून तुम्हीपण माया पातळ केली या घरावरची.  अरे, तुम्ही मला सर्व जण यशवंताच्या ठिकाणीच आहात.  मी कधी फरक केला का तुमच्यात अन् यशवंतात ?''

आईच्या या बोलण्यानं सर्वांच्या काळजात कालवाकालव झाली.  चळवळीतील आठवणी जाग्या झाल्या.  रात्री-बेरात्री आईनं चार घास आग्रहानं खाऊ घातलेले आठवले.  कधीही चिडचीड केली नाही की वैतागल्या नाहीत.  प्रत्येकाची आई होऊन वागल्या.  सर्वांना गहिवरून आलं.

गहिवरलेल्या अवस्थेतच गौरीहर सिंहासने म्हणाले, ''आई, चुकलं का काही आमचं ?''

''नाही रे, काही चुकलं नाही तुमचं.  तुमच्या रूपानं मला आज यशवंता भेटल्याचा आनंद झाला.  असेच येत जा बाबांनो... यशवंताला तर आता वेळ मिळत नाही.  तुम्हीतरी वेळ काढून भेटत जा रे लेकरांनो...'' आई.

''आई, आम्हालातरी तुमच्याशिवाय या कराडमध्ये कोण आहे ?  साहेब तर मुंबईत कामात तल्लीन झालेत.  त्यांना कामाशिवाय कुणाचीच आठवण येत नाही.'' शांतारामबापू.  

''करू देत त्याला आता काम.  त्याचा संसार मोठा झालाय म्हणे.  सर्व महाराष्ट्र त्याचं घर झालंय म्हणे.  करू देत बिचार्‍याला महाराष्ट्राची काळजी.  बरं, आज सर्व यशवंताचे बालपणाचे भिडू मिळून आलात म्हणजे तसंच काहीतरी महत्त्वाचं काम असणार.'' आई.

''आई, आम्ही गणपतरावांच्या ॠणातून मुक्त होऊ इच्छितो.'' राघूअण्णा लिमये.

''अरे, असं काय काम गणपतने तुमच्यासाठी केलं ?''  आई.

''आई, गणपतदादांनी आम्ही केलेला गुन्हा पोटात ठेवून आम्हाला माफ केलं होतं.'' बटाणे.

''अरे, पण गणपतचा असा कोणता गुन्हा तुम्ही केला होता ?''  आई.