• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १९८

काश्मीरच्या सीमेलगत पाक सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्‍न चालूच होता.  भारतीय सैन्य मात्र सावधगिरीनं शत्रूपक्षाच्या सैन्याला पिटाळून लावत होतं.  जम्मूच्या भीमबार भागात शत्रूसैन्य प्रवेश मिळवीत आहे हे कळताच भारतीय लष्करानं टिथवाल भागात सामर्थ्यानिशी धडक मारून युद्धबंदी रेषेच्या वायव्य भागातील अतिमहत्त्वाची ठाणी हस्तगत केली.  त्यामुळे शत्रूसैन्याला घुसखोरीचा मार्गच बंद झाला.  भारताच्या लष्करानं पाकिस्तानच्या भूमीवर पाच मैल आत चाल करून हाजी-पीर-पास हे कठीण ठाणं मोठ्या शौर्यानं जिंकून घेतलं.  साहेबांनी हाजी-पीर-पास ठाण्याच्या धुमश्चक्रीची माहिती संसदेला दिली.  भारतीय सैन्याचं मनोबल एका विशिष्ट उंचीला पोहोचलं आहे.  भारतीय सैन्याने शत्रूपक्षाला दिलेला तडाखा जिव्हारी लागला.  युद्धाची खुमखुमी मनात ठेवून पाकिस्ताननं एका संपूर्ण ब्रिगेडच्या ताकदीनिशी भारतावर चाल करण्याचं ठरविलं.  या पाकिस्तानच्या चालीनं प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटलं.  आंतरराष्ट्रीय सीमेवर भीमबार-छांब हद्दीत पाकिस्तान रणगाड्यानं तळ ठोकला. १ सप्टेंबर १९६५ ला हे रणगाडे तासभर भारतीय सैन्यावर आग ओकत राहिले.  रणगाड्यासोबत पाकिस्तानी सैन्य युद्धबंदी रेषा ओलांडून भारतावर चाल करून आले.  त्यांचा हल्ला प्रभावशाली होता.  दोन ब्रिगेडस् सैन्य म्हणजे ६ हजार सैन्य १०० रणगाड्यांच्या सहार्‍यानं भारतीय हद्दीत आगेकूच करीत आहे.  या पहिल्या दिवशी १ हजार भारतीय सैन्य मुहतोड प्रतिकार करीत आहे.  ७५ अमेरिकन रणगाडे पाकनं रणभूमीवर उतरवले.  या अजस्त्र रणगाड्यांच्या मार्‍यानं भारतीय लष्कराला ६ मैल मागे रेटलं.  छांब भाग हा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानच्या सोयीचा.  त्यानं जबरदस्त हल्ला करून आगेकूच सुरूच ठेवली.  कमांडर हरबक्षसिंग यांनी जनरल चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून हवाई हल्ल्याची आवश्यकता असल्याचं निदर्शनास आणून दिलं.  पाकिस्तानचे पॅटन रणगाडे आग ओकत जम्मूला गिळंकृत करण्याच्या बेतानं आगेकूच करीत आहेत.  कमांडर हरबक्षसिंग आणि जनरल चौधरी यांची बोलणी ४ वाजेच्या सुमारास झाली.  वेळ कमी होता.  अंधार पडल्यानंतर रणगाडे अधिक जोमानं जम्मूच्या दिशेनं निघाले असते.  काही मिनिटांच्या आतच जनरल चौधरीला निर्णय घ्यावयाचा आहे.  हवाईदलप्रमुख व चौधरी संरक्षण मंत्रालयात साहेबांकडे पोहोचले.  साहेबांना रणभूमीवरील परिस्थिती सांगितली व हवाई हल्ल्याची परवानगी मागितली.  पंतप्रधानांशी विचारविनिमय करण्यास अवधी कमी आहे.  सूर्यास्तापूर्वी हवाई हल्ला करणे ही योग्य वेळ आहे.

''यक्षणी आदेश देण्याची आवश्यकता आहे का ?''  साहेब.

''हवाई हल्ला करण्याची हीच अचूक वेळ आहे.'' सरसेनापती.

''काही हरकत नाही.  आगे बढो, हल्ला करा.'' साहेब.

साहेबांचा आदेश मिळताच क्षणाचाही विलंब न करता भारताच्या हवाई दलानं काश्मीरच्या दिशेनं झेप घेतली.  भारतीय लष्करी विमानांच्या हल्ल्यानं तोफखाने, रणगाडे उद्ध्वस्त केले.  राक्षशी आगेकूच अर्ध्या तासाच्या आत धुळीस मिळविली.  सरसेनापतीनं हवाई दलाच्या पराक्रमाची माहिती साहेबांच्या कानी घातली.  साहेबांनी पंतप्रधानांना भेटून हवाई हल्ल्यासंबंधी सविस्तर माहिती त्यांना दिली.  एकजीव झालेले हे दोन नेते एकमेकांना समजावून घेऊ लागले.  साहेबांच्या या निर्णयाचं शास्त्रीजींनी लोकसभेत समर्थन केलं.  छांबमधील लष्कराच्या शौर्याची, पराक्रमाची माहिती साहेबांनी लोकसभेत दिली.  पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुत्तो यांनी साहेबांना लक्ष्य करून तोंडसुख घेतलं.