सरहद्दीवर युद्धजन्य परिस्थिती. साहेब रात्रंदिवस शत्रूपक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. कुठल्या क्षणी युद्धाची ठिणगी पडेल याचा नेम नव्हता. पंजाबच्या विमानतळाला रात्री उशिरा भेट देऊन साहेब दिल्लीत आले. मध्यरात्री दूरध्वनी खणखणू लागला. दूरध्वनीवर निरोप होता - साहेब पोरके झाल्याचा. मातोश्री विठाई साहेबांना भारतमातेच्या रक्षणासाठी देशाच्या हवाली करून स्वतः नियतीच्या कुशीत विसावल्या. साहेबांनी मला आवाज दिला. साहेबांच्या आवाजात कंप होता. मी लगबगीनं साहेबांजवळ आले.
मी विचारण्यापूर्वीच साहेब सांगू लागले, ''वेणू, पंढरपूर येथील विठ्ठलाच्या देवळात माझा हात धरून मला यशाच्या शिखरावर पोहोचवणारी माझी आई माझा हात सोडून गेली.''
साहेब जे सांगताहेत त्यावर माझा विश्वास बसेना. मी भांबावून गेले. काय करावं मला काही सुचेना. मी आणि साहेब एकमेकांकडे पाहून रडलो आणि दुःख हलकं केलं. शेवटी एकमेकाला सावरून मुंबईला जाण्याच्या तयारीला लागलो. माझ्यावर आईचा अपार जीव होता. आम्हा सुनांना आमच्या आईची आठवण कधीच येऊ दिली नाही. आईच्या आठवणीनं मला घेरलं.
संरक्षणमंत्री म्हणून साहेब दिल्लीला जाण्यास निघाले तेव्हा आई मला म्हणाल्या, ''वेणू, यशवंतरावाचा सांभाळ आता तुला करायचा आहे. माझ्या जागी आता तूच त्याची पालनकर्ती आहेस.''
साहेब संरक्षणमंत्री झाले आणि नेहरूजींची लोकसभेत पाठराखण केली तेव्हापासून नेहरू घराण्याशी आमचा घरोब्याचा धागा घट्ट झाला. नेहरू घराण्याचं एक वैशिष्ट्य होतं की, ज्याला आपलं म्हटलं त्या घरातील सुखदुःख ते आपलं सुखदुःख मानत. साहेबांच्या आईला भेटण्याची इच्छा नेहरूजींनी व्यक्त केली. एके दिवशी नेहरूजी आणि इंदिराजी आईच्या भेटीस आले. आईचा आशीर्वाद घेतला. याचा आईला मोठा आनंद झाला होता. या आठवणीत मी आणि साहेब मुंबईला येऊन पोहोचलो. ही तारीख होती १८ ऑगस्ट १९६५. साहेबांनी आईच्या पार्थिवाला अग्निडाग दिला आणि त्याक्षणी खाली बसले. भूतकाळ गळून पडल्याचा भास साहेबांना झाला. घरातला कर्ता झालो अशी भावना साहेबांची झाली. कर्तेपणाच्या कल्पनेनं साहेब गोंधळले. दुनियातले कर्तेपण चालते; पण घरातलं लहानपण फार मोठं असतं याची साहेबांना जाण होती.
'वंचिताचा पालनहार ।
मातेविना निराधार ।
परस्वाधीन आहे पुत्र नियतीचा ।'
हे सत्य साहेबांना याक्षणी उमगलं.