• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १९४

त्यांनी राष्ट्रपतींच्या कानावर सैन्य दिल्लीत आणण्याची गोष्ट जशी घातली होती तशी याची कल्पना काळजीवाहू पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांना द्यावयास पाहिजे होती.  ते त्यांच्याकडून राहून गेलं.  त्यातून या अफवेचं वादळ दिल्लीत उठलं असावं.  साहेब आणि जनरल चौधरी यांच्यात चर्चा झाल्यानंतर या अफवेला पूर्णविराम मिळाला.  'सैनिक उठाव करून सत्ता हस्तगत करणार' अशी ती अफवा होती.

पंतप्रधानांची निवड एकमताने व्हावी ही साहेबांची प्रांजळ भूमिका.  शास्त्रीजी, मोरारजी आणि साहेब यांची नावं राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागली.  पंतप्रधानाच्या निवडीच्या प्रक्रियेबद्दल साहेबांनी आपले विचार व्यक्त केले.

म्हणाले, ''भारताच्या भवितव्याकडे सारं जग आशेनं बघतंय.  नेत्याची निवड एकदिलानं आपण कशी करतो हे जगाला पाहावयाचे आहे.  मतभेद न होता बहुमताचा कौल घेऊन नेता निवडला पाहिजे.''  मत साधारणतेचा कौल (कॉन्सेन्सस) म्हणून पुढे भारताच्या राजकीय इतिहासात याची नोंद झाली.  याचे प्रवर्तक साहेब ठरले.  शास्त्रीजींची पंतप्रधान म्हणून एकमतानं निवड झाली.      

शास्त्रीजी आणि साहेबांचे विचार एकजीव झाले होते.  कुठल्याही कठीण प्रसंगी नेहरूजींसोबत शास्त्रीजी हजर असत.  साहेबांची संरक्षणमंत्री म्हणून झालेली निवड शास्त्रीजींच्या सहमतीनं झालेली होती.  शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानं साहेबांचा हुरूप वाढीस लागला.          

साहेबांसोबत रशियाच्या दौर्‍यावर जाण्यास शेवटी मी होकार दिला.  आम्हाला २८ ऑगस्ट ६४ ला निघायचं होतं.  शेवटपर्यंत परदेश दौरा टाळण्यासाठी प्रयत्‍न करून बघितले; पण मला यश मिळालं नाही.  भाषा, हवामान, तेथील अन्नपाणी हे सर्वकाही माझ्यासाठी अनोखं होतं.  शेवटी साहेबांची सावली म्हणून आपण वावरायचं.  शेवटी श्रीपाद डोंगरे आहेच साथीला.  केव्हातरी साहेबांच्या वाचनालयातून मी मॅक्झिम गोर्की यांची 'आई' नावाची मराठीत भाषांतरित केलेली कादंबरी मिळविली होती.  ती वाचल्यानंतर मला रशिया पाहण्याची इच्छा झाली होतीच.  तो योग आता आला.  मॉस्कोच्या विमानतळावर उतरताच उत्साहवर्धक हवामान, निर्मळ सूर्यप्रकाश, वेळ तिसर्‍या प्रहराची, नजर पोहोचेल तिथपर्यंत वनश्रीची हिरवळ.  आल्हाददायक वातावरणात रशियाचे संरक्षणमंत्री मेलिनोव्हस्की व त्यांच्या पत्‍नी आमच्या स्वागताला जातीनं उपस्थित होते.  त्रिलोकनाथ कौल रशियातील भारताचे वकील आणि त्यांच्या अधिकार्‍यानं आमचं स्वागत केलं.  साहेबांनी लष्करी मानवंदना स्वीकारली.  आमची राहण्याची व्यवस्था मॉस्को विद्यापीठाच्या परिसराच्या मागे जंगलवजा निवांतस्थळी केली होती.  टुमदार बंगल्याच्या प्रांगणात आमच्या गाड्या पोहोचल्या.  

कौल आणि साहेब बंगल्यासमोरील हिरवळीवर पोहोचले.  

कौल साहेबांना म्हणाले, ''आपल्याला धोरणात्मक काही बोलायचे असल्यास खुल्या मैदानातच बोललं पाहिजे.  आपल्याकडे म्हणतात ना 'भिंतीला कान असतात' तसे येथे खोल्यांमध्ये श्रवणयंत्रे बसविलेली असतात.  आपण इथे सावधगिरी बाळगावयाची असते.''  कौल यांचा सल्ला साहेबांना पटला.  नेहमीच हे दोघे एकत्र आले म्हणजे बागेत जाऊन बोलत असत.  

लाल चौकातील लेनिनच्या समाधीला प्रथम आम्ही भेट दिली.  क्रेमलीनच्या भिंतीला लागून लेनिन चिरनिद्रेत विसावलेले.  त्यांचं शव पाहिल्यानंतर ते शांतपणे विश्रांती घेत आहेत असा भास आपणास होतो.  साहेबांनी या साम्यवाद्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून पुष्पचक्र वाहिलं.  तीन-तीन, चार-चार किमीच्या रांगा या महात्म्याच्या दर्शनाकरिता लागलेल्या होत्या.  या वेळी साहेबांना मानवेंद्र रॉय यांचा सहवास आठवला.