• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १९३

ते पुढे म्हणतात, ''रशिया भारताला मदत करीत आहे याची नोंद अमेरिकेला घ्यावी लागेल.  भारताला रशिया आणि अमेरिका एकाच वेळी लष्करी साहित्य पुरविणार.  इतर देशांच्या बाबतीत ही परिस्थिती नाही.  चीन आणि रशिया यांच्यातील तणाव संपल्यानंतर भारत रशियाच्या बाजूने झुकेल काय ?  याचा विचार अमेरिकेला करावा लागेल.''

मिग-२१ जातीच्या विमानाच्या निर्मितीत रशियाची मदत घेऊन भारतानं या विमानाच्या निर्मितीला सुरुवात केली.  याबद्दल अमेरिकेची नाराजी होती.  एफ-१०४ जातीची विमानं भारताच्या पदरात पाडून घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न साहेबांनी केला.  यात साहेबांना यश आलं नाही.  या जातीची विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिली होती.  अमेरिकेच्या वतीनं टालबोट मध्यस्थी करीत होते.  त्यांच्या मध्यस्थीला फारसं यश येण्याची चिन्हं साहेबांना दिसेनात.  पंधरा दिवस वाटाघाटीचा घोळ चालूनही काही निष्पन्न होत नाही हे साहेबांना कळून चुकलं.  साहेबांनी डीन रस्क यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.  शेवटी राष्ट्राध्यक्ष प्रे. जॉन्सन यांच्याशी बोलण्याचे ठरले.  २८ मे ही तारीख निश्चित करण्यात आली.      

अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन यांची भेट वॉशिंग्टनला घेण्याचं निश्चित झाल्यानंतर साहेब लॉस एंजिल्समध्ये थांबले.  कॉलोरॅडो येथील अमेरिकेची हवाई अकादमी पाहण्यासाठी गेले.  हवाई अकादमीची पाहणी करून साहेबांनी तिथं मुक्काम केला.  दुसर्‍या दिवशी वॉशिंग्टनला पोहोचून प्रे. जॉन्सन यांची भेट घ्यायची ठरलेली.  रात्री साहेब गाढ झोपेत असताना खोलीतील फोन खणखणू लागला.  कोलोरॅडोसारख्या अनोळखी शहरात मध्यरात्री कुणाचा फोन असणार या विचारात साहेबांनी फोन उचलला आणि ती भारताच्या भविष्याची काळरात्र ठरली.  फोनवरून साहेबांच्या कानावर 'पंतप्रधान नेहरूजी यांचं देहावसान झालं' असे घणाघाती प्रहार व्हावेत त्याप्रमाणे वाक्य आदळू लागले.  वॉशिंग्टनहून फोनवर बोलत होते फिलिप्स टालबोट.  साहेबांच्या डोळ्यांतील झोप उडून तिची जागा अश्रूंनी घेतली.

साहेबांनी स्वतःला सावरलं.  साहेबांनी टालबोट यांना सांगितलं, ''मला कुठल्याही परिस्थितीत दिल्लीला पोहोचायला पाहिजे.  तुम्ही युद्धपातळीवर प्रयत्‍न करा.''

टालबोट यांनी साहेब अंत्यविधीसाठी कसे पोहोचतील याच्या हालचाली रात्रीच सुरू केल्या आणि टालबोट यांच्या प्रयत्‍नामुळं साहेबांना नेहरूजींच्या अंत्यविधीला हजर राहता आलं.

पंतप्रधानांचा अंत्यविधी कुठलीही अप्रिय घटना न घडता पार पडावा यासाठी संरक्षण खातं प्रयत्‍नशील होतं.  जगातील विविध देशांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रमुख, भारतातील मान्यवर यांची व्यवस्था चोख राहावी यासाठी पोलिस     यंत्रणा आणि त्यांच्या मदतीला लष्करी जवान तैनात करण्यात आलेले.  गांधीजींच्या अंत्यविधीच्या वेळेस जो विस्कळीतपणा आला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना साहेबांनी लष्करी अधिकार्‍यांना दिल्या होत्या.  याचवेळी एका अफवेचं वादळ दिल्लीवर घोंगावू लागलं.  एक लष्करी अधिकारी साहेबांच्या कानाशी लागला आणि लगेच निघून गेला.  हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांच्या देखरेखीखाली अंत्यविधी पार पडला.  ती अफवा शेवटी अफवाच ठरली.  नेहरूजींचा उत्तराधिकारी म्हणून शास्त्रीजींची निवड झाली.  लोकशाही मार्गानं सत्तांतर झालं.  त्या अफवेची शहानिशा साहेबांनी केली असता त्यात काही तथ्य आढळून आलं नाही.  जनरल चौधरी यांनी राष्ट्रपतींची मान्यता घेऊन काही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून ६ हजार सैनिक दिल्लीत आणले होते.  चौधरी यांनी कॅबिनेट सेक्रेटरीला याची कल्पना दिली होती.