साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यांनी आपले सचिव प्रधान यांना मॅडमसोबत राहण्याची खूण केली. इंदिराजींचा अहंकार जागा झाला. त्या रागानं फणफण करत जवळच्या एका खोलीत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझारा घालू लागल्या. खिडकीजवळ हात बांधून उभ्या राहून दूरवर पाहताहेत. प्रधानांनी त्यांना एक तिथं असलेलं मासिक दिलं. त्या मासिकाकडे त्यांनी तिरस्कारानं पाहिलं आणि जवळ असलेल्या टेबलावर फेकून दिलं. इंदिराजींचा राग त्यांच्या चेहर्यावर दिसतोय. दीड-दोन तास नकाशाच्या खोलीत गुप्त बैठक चालली. बाहेर इंदिराजी दीड ते दोन तास ताटकळत उभ्याच राहिल्या. त्यांनी अवमानित अवस्थेत वेळ घालविला. या घटनेचे पडसाद देशाच्या पुढील वाटचालीत आपणास पाहावयास मिळतात.
दुसर्या दिवशी नेहरूजी सैनिकांसमोर आपलं मन मोकळं करणार होते. छोटेखानी व्यासपीठ तयार करण्यात आलं. सैनिकी शिस्तीत जवान समोर बसले. सर्व अधिकारी आणि नेहरूजी, साहेब, इंदिराजी व्यासपीठावर स्थानापन्न झाले. नेहरूजींनी सैनिकांचा उत्साह वाढावा म्हणून आपलं मनोगत व्यक्त केलं. मागे काहीतरी चुळबूळ झाल्याची शंका इंदिराजींना आली. त्या व्यासपीठावरून उतरून तिकडे गेल्या. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री चालीहा होते. त्या सैनिकाचं म्हणणं एका अधिकार्याला ऐकून घेण्यास सांगून त्या परत आल्या. सैनिकांच्या अडचणी कुणी ऐकून घेण्यास तयार नाही असा त्या सैनिकांचा आरोप होता. सैनिकांत असंतोष असल्याची पुसटशी कल्पना साहेबांना आली.
डिसेंबर महिन्यात लेह आघाडीला भेट देण्याचं निश्चित झालं. नेहरूजी आणि साहेब हे दोघेच भेट देणार आहेत. या भेटीची अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. साहेबांनी मलादेखील या भेटीची कल्पना दिली नव्हती. ही भेट निरुत्साही झाली. नेहरूजींना कुठल्यातरी चिंतेनं घेरलं असावं. त्यांचा पूर्वीचा सळसळता उत्साह त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून आढहत नव्हता. निस्तेज अवस्थेत ते बोलायचे. सैनिक मात्र नेहरूजींना पाहण्यास व ऐकण्यास उत्सुक असत.
साहेबांनी ज्या ज्या वेळी सैनिक छावण्याला भेटी दिल्या त्या भेटीत त्यांना सैनिकांमधील आत्मविश्वास प्रखरतेनं जाणवला. साहेबांचं स्वागत सैनिक जल्लोषात करीत. मराठा संरक्षणमंत्र्याबद्दल सैनिकांना आत्मीयता वाटे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला नवा संरक्षणमंत्री लाभल्याचा त्यांना अभिमान वाटायचा. यामुळं साहेबांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हायचा.
साहेबांच्या कर्तृत्वाचा गरुडपक्षी राजकारणाच्या क्षितिजावर गरुडझेप घेण्याच्या तयारीत असतानाच त्याचे पंख छाटण्याचा घाट घालण्यात आला. हे पंख छाटण्याचं काम एकीकडून टी. टी. के. मार्फत चालू झालं. दुसर्या बाजूनं बिजू पटनाईक. युद्धसामुग्री मिळविण्याकरिता टी. टी. के. अमेरिकेला जाणार याबद्दल साहेबांना कल्पना होती. त्यांचा परदेशाशी व्यवहार करण्याचा अनुभव लक्षात घेता साहेबांनी सहमती दिली. दोन प्रभावी मंत्र्यांच्या समजुतीनं हे घडत आहे असं वातावरण निर्माण झालं; पण फेब्रुवारी १९६३ ला ठिणगी पडली. नेहरूजींनी साहेबांना कार्यालयात बोलावून घेतलं. पाऊण तास दोघांत चर्चा झाली. टी.टी.के.नी नेहरूजींना पत्र लिहून अडचणीत आणलं.