१०-१२ वर्षांचा शेतकर्याचा पोरगा बांधावरून जाणार्या घोडेस्वाराला अडवितो. घोडेस्वार शस्त्रसज्ज असतो. त्याच्या घोड्याचा लगाम हातात धरून हे चिमुरडं पोर त्या घोडेस्वाराला जाब विचारतं.
म्हणतं, ''खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवील राई राई एवढ्या...''
हे घोडेस्वार दस्तुरखुद्द शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज माझे आहेत. महाराजांचं राज्य माझं राज्य आहे. मी या राज्याच्या संरक्षणाकरिता सज्ज आहे ही भावना यातून व्यक्त होते.
साहेब संरक्षणमंत्री झाल्याचे जाहीर होताच महाराष्ट्रात व देशात एक पराक्रमाची, शौर्याची लहर पसरली. वीररसात काव्य निर्माण होऊ लागलं. देश ईर्षेनं पेटून उठला. ज्याला जे जमेल ते करण्याची ऊर्मी उफाळून आली. अशीच ऊर्मी एका आदिवासी कवयित्रीने साहेबांवर काव्य करून व्यक्त केली. स्वातंत्र्यातील स्त्रीलादेखील वाटू लागलं की, हे स्वातंत्र्य माझं आहे. स्वातंत्र्यावर आलेल्या संकटाला साहेब आपल्या कर्तृत्वाने दूर सारतील असा आत्मविश्वास या आदिवासी स्त्रीने व्यक्त केला.
ही आदिवासी स्त्री लिहिते -
'संरक्षणपद भूषव यशवंता !'
'सह्याद्री'च्या कड्या कड्यातून जयध्वनी घुमला ।
विशाल भारत वर्षामाजी, क्षणात तो उठला ॥१॥
'यशवंता'च्या यशकीर्तीची वार्ता जै आली ।
महाराष्ट्राची भोळी जनता हर्षान्वित झाली ॥२॥
संरक्षणमंत्र्यांचा देऊन तुम्हा श्रेष्ठ मान ।
'पंडितजी' नी महाराष्ट्राचा केला बहुमान ॥३॥
महाराष्ट्राचे स्फूर्तिप्रद तू निर्मल जल प्याला ।
'शिवरायांच्या' पावनभूवर अखंड वावरला ॥४॥
मोगलशाहीस धडकी दिधली मर्द मराठ्यांनी ।
जरिपटका तो अटकेवरती नाचविला ज्यांनी ॥५॥
त्या वीरांची उत्स्फूर्ती तव अंतरात भरली ।
महाराष्ट्राच्या कणांकणांतील देशभक्ति शिरली ॥६॥
'जिजाबाईंचे, 'छत्रपतीं'चे अनेक संतांचे ।
आशीर्वाद तूज द्याया आले वारे दख्खनचे ॥७॥
धन्य जन्म-भू । धन्य । 'माय' तव धन्य 'वेणुताई' ।
तुझ्याच रूप, फळा पावली, त्यांची पुण्याई ॥८॥
'हर हर' गर्जून 'संरक्षणपद भूषव' यशवंता ।
महाराष्ट्राचा मानाचा घे मुजरा गुणवंता ॥९॥
- शांतादेवी, तडवी, जळगाव