• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १५८

जे जे मंगल त्याकरिता द्यावी लागणारी किंमत देण्याची मनोभूमिका महाराष्ट्राची आहे.  याच संतांनी नाठाळा माथी काठी मारण्याचं सामर्थ्य आमच्यात निर्माण केलेलं आहे.  अमंगल घालविण्यासाठी नाठाळांना वठणीवर आणण्याची शिकवण संतांनी आम्हाला दिली आहे.  दीनदुबळ्या, वंचितांच्या कल्याणासाठी महाराष्ट्राची निर्मिती झाली.  मराठी जनतेच्या उत्कर्षासाठी आम्ही अहोरात्र काम करू, महाराष्ट्राच्या जीवनात जे उदात्त आहे, विकसनशील विचार आहे त्याचा उपयोग भारताच्या उभारणीसाठी आम्ही प्रथम करू.  महाराष्ट्र भारताशी एकरूप झाला आहे.  भारताची भरभराट म्हणजे महाराष्ट्राची भरभराट असे मानणार्‍यांपैकी आम्ही आहोत.  भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल हा विचार आमच्या रक्तात भिनलेला आहे.  भारताच्या मोठेपणात महाराष्ट्राचं मोठेपण दडलेलं आहे.  भारताचा केंद्रबिंदू बर्फाच्छादित हिमालय आहे तर महाराष्ट्राचे प्रतीक काळ्या फत्तराचा सह्याद्री आहे.  हा सह्याद्री दोन-दोनशे, तीन-तीनशे इंच पावसाचा मारा आपल्या माथ्यावर झेलतोय.  निसर्गाच्या मार्‍याचा मुकाबला करतोय.  भारताचा मानबिंदू असलेल्या हिमालयावर जर भविष्यकाळात संकट कोसळलं तर हा काळ्या फत्तराचा सह्याद्री छातीचा कोट तयार करून ढाल बनून हिमालयाचं रक्षण करील, असं मी याप्रसंगी आपणास वचन देतो.''

साहेबांनी उत्स्फूर्तपणे महाराष्ट्राच्या भारताप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.  क्षणभर राजभवनाच्या किनार्‍यावर आदळणार्‍या लाटा थबकल्या राजभवनावरील सभामंडपानं श्वास रोखला असा भास निर्माण झाला.  सभामंडपातील मराठी आणि अमराठी माणसं साहेबांच्या विचारांनी भारावून गेली.  महाराष्ट्राला साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राचा भाग्यविधाता मिळाला, अशा भावना व्यक्त करू लागले.  शिवतीर्थ आणि राजभवनावरील कार्यक्रम एकाच वेळी पार पडताहेत.  सनईभीष्म बिस्मिल्लाखाँ व गानकन्या लताजींनी राजभवन जिंकलं तर शिवतीर्थावर 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीतानं शाहीर शेख व शाहीर साबळे महाराष्ट्राच्या पराक्रमाचा ज्वलंत इतिहास १० लाख महाराष्ट्रीयन जनतेच्या समोर उभा करून शिवतीर्थ जिंकताहेत.  समुद्राला उधाण आलेलं आहे.  सागर आणि जनसागर शिवतीर्थावर देहभान विसरून एक झाले आहेत.  एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचं स्मरण शाहीर करताहेत.  त्या हुतात्म्यांना मुजरा करण्यासाठी १० लाख महाराष्ट्रीयन एकत्र आलेत.  त्यांच्या बलिदानाच्या आठवणी चिरंतन आपल्या हृदयात साठवून घेत आहेत.  'व्यर्थ न जावो बलिदान' या वीररसातील काव्यानं मराठी मनं उत्साहित होताहेत.

या भारावलेल्या वातावरणातच नेहरूजींनी रात्री १ वाजता परदेशगमनासाठी विमानतळावरून उड्डाण केलं.  महाराष्ट्र दर्शन नेहरूजींना विमानातून व्हावं याकरिता समुद्रात लाँचेसची रचना महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे करण्यात आली.  त्या लाँचेसवर विद्युतदिव्यांची व्यवस्था करण्यात आली.  नवमहाराष्ट्राचा नकाशा विद्युत रोषणाईनं समुद्रात तयार करण्यात आला.  १ मे १९६० रोजी नवमहाराष्ट्र राज्याचा जन्म झाला.  जन्मकुंडली मांडणार्‍यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्याच्या भविष्याची मांडणी करण्यास सुरुवात केली असावी.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा कार्यक्रम आटोपून साहेबांना व मला सह्याद्रीवर यायला पहाटेचे ४ वाजले.  थोडी विश्रांती घेऊन सकाळी राजभवनावर मुख्यमंत्रीपदाच्या शपथ कार्यक्रमास आम्हा दोघांना जावयाचे आहे.  सकाळच्या कामाच्या सूचना नोकरांना देऊन मी माझ्या खोलीत गेले.  मला सकाळी जाग आली ती 'घनश्याम सुंदरा' या अमरभूपाळीच्या मंगलस्वरानं.  त्वरित तयार झाले.  स्वयंपाकघरात जाऊन चहा तयार केला.  चहाचा ट्रे घेऊन साहेबांच्या खोलीत गेले.  साहेब तयार होऊन वर्तमानपत्र चाळत होते.  साहेबांनी मला जवळ बसवून घेतलं.