• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १५६

नवमहाराष्ट्र राज्य निर्मितीचा उद्‍घाटन सोहळा मलबार हिलवरील राजभवनावर आयोजित केलेला.  राजभवन इंग्रजांच्या राजवटीतील विलासी जीवनाचं प्रतीक.  या राजभवनावर नेहरूजींच्या हस्ते ३० एप्रिलच्या मध्यरात्री ठीक १२:०१ मिनिटांनी १ मे १९६० रोजी भारताच्या नकाशावर महाराष्ट्र राज्याच्या सीमा निश्चित होऊन मराठी जनतेचं एक राज्य अस्तित्वात येणार आहे.  मराठी जनतेच्या जीवनातील सोनियाचा दिवस म्हणून १ मे १९६० या दिवसाची नोंद होणार आहे.  याच वेळी शिवतीर्थावर (शिवाजी मैदान) तमाम मराठी माणसांच्या भावनेच्या लाटा धडकू लागल्या.  अख्खी मुंबई शिवतीर्थावर अवतरली.  समुद्राच्या लाटांना उधाण आलेलं.  समुद्रदेखील उसळ्या घेऊन शिवतीर्थाजवळीत चौपाटीवर आनंद व्यक्त करू लागला.  राजभवन आणि शिवतीर्थावरील विद्युत रोषणाई नभातील चांदण्याशी स्पर्धा करू लागली.  नभातील चांदण्यांना हेवा वाटावा अशी विद्युत रोषणाई या दोन ठिकाणी करण्यात आली.  अख्खी मुंबई व महाराष्ट्रातील जनता सजूनधजून या कार्यक्रमात सहभागी झालेली.

रात्री ठीक अकरा वाजून पंधरा मिनिटांनी साहेबांसोबत मी सह्याद्रीवरून राजभवनाकडे निघाले.  निघण्यापूर्वी आम्ही दोघांनी आईच्या पायावर माथा टेकविला.  आईनं भरभरून आम्हाला आशीर्वाद दिला.  मी आज माझ्या माहेरची - फलटणच्या मोरे घराण्याची घरंदाज वस्त्रे परिधान केली.  नऊवारी काठपदराचं पातळ, त्याच रंगसंगतीचं ब्लाऊज.  महाराष्ट्रीयन पद्धतीनं नेसलेलं पातळ, कपाळावर ठसठशीत सौभाग्याचं कुंकू अन् अंगावर महाराष्ट्रीयन दागिने.  साहेबांनी पांढरंशुभ्र धोतर, त्यावर पांढराशुभ्र नेहरू शर्ट आणि नेहरू शर्टवर त्यांचं आवडतं पांढरंशुभ्र जाकीट अन् डोईवर पांढरीशुभ्र गांधी टोपी त्यांच्या खास पद्धतीनं घातलेली.  हा वेश परिधान करून साहेब प्रसन्न चित्तानं कार्यक्रमाला निघाले.  ५६ ते ६० या चार वर्षांत आजच्या दिवसासाठी करावी लागलेली बौद्धिक कसरत... जनतेकडून गैरसमजातून झालेला मानापमान... सर्व आजच्या दिवसासाठी सहन करीत त्यावर आजचा सोनियाचा दिवस उगवला.  ठीक ११.३० ला आम्ही राजभवनावर पोहोचलो.

राजभवनावर राजभवनाला शोभेल असा भव्य शामियाना उभारलेला.  दरबारी थाटात अधिकारी लक्ष ठेवून वावरताहेतं.  कार्यक्रमात कुठलीच उणीव राहता कामा नये याची काळजी घेताना प्रशासन दिसतंय.  महाराष्ट्रीयन शुभमंगल वाद्य हळुवारपणे कानाची साथसंगत करतंय.  शामियाना महाराष्ट्रातील मराठीजनांनी व्यापलेला.  बुद्धिवादी, बुद्धिजीवी, उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ, कामगार प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींच्या चेहर्‍यावर उत्साह ओसंडून वाहतोय.  कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर राज्यपाल जयप्रकाश यांचं आगमन झालं.  साहेबांनी आणि मी त्यांचं स्वागत केलं.  नवमहाराष्ट्राच्या जन्माची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी कार्यक्रमास हजर असलेल्यांची उत्सुकता वाढीस लागू लागली.  बाराला दहा मिनिटं कमी असताना भारताचे विधाते नेहरूजी आपल्या कन्या इंदिरा गांधींसह शामियान्यात हजर झाले.  मी इंदिरा गांधींच्या स्वागतास सामोरे गेले.  जयप्रकाश आणि साहेबांनी नेहरूजींचं स्वागत केलं.  तरुणाईला लाजवील या चपळाईनं व्यासपीठावर चढून नेहरूजी विराजमान झाले.  त्यांच्यामागोमाग राज्यपाल, साहेब, इंदिराजी आणि मी व्यासपीठावर स्थानापन्न झालो.