• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १२४

आईचा आशीर्वाद घेऊन साहेब घरातून बैठकीत आले.  सर्व मित्र साहेबांपासून अंतर ठेवून उभे राहू लागले.  ते साहेबांजवळ येण्यास कचरायला लागले.  साहेबांना त्यांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं.  शेवटी साहेबांनी सर्वांच्या हातात हात मिळविले.  सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घळघळा गालावरून ओघळू लागले.  साहेबांनाही गहिवरून आलं.

साहेबांच्या गाड्यांनी सत्कार स्थळाकडं कूच केली.  साहेबांसोबत मी गाडीत होते.  रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून कराडची जनता साहेबांचं स्वागत करू लागली.  रस्त्यावर कमानीची रेलचेल दिसली.  प्रत्येक व्यावसायिकानं आपल्या दुकानासमोर सडा टाकून रांगोळ्या काढलेल्या दिसल्या.  आपापल्या दुकानाच्या नावानं कमानी सजवलेल्या दिसल्या.  भांड्याच्या दुकानदारांनी भांड्यांच्या कमानी उभारलेल्या दिसल्या.  रस्त्यावर वनराई अवतरलेली दिसली.  घरांवर पताका लावून घरं सजवण्यात आली होती.  सभास्थळी पोहोचताच गगनभेदी तोफांचे बार उडवून सलामी देण्यात आली.  फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.  तुतार्‍याधारक मावळ्यांनी तुतार्‍यांचा आवाज अस्मानात निनादिला.  डफ, ढोल-ताशांचे आवाज युद्धभूमीची आठवण जागी करू लागले.  साहेब गाडीतून उतरले.  अंगरक्षकांची धावपळ सुरू झाली.  स्वागतपीठ ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सजविलं होतं.  क्षणभर मला कराडात शिवशाही अवतरल्याचा भास झाला.  साहेब स्वागतपीठावर विराजमान झाले.  मी साहेबांच्या डाव्या बाजूला बसले.  नजर पोहोचेल तिथपर्यंत साहेबांवर प्रेम करणारी जनता साहेबांच्या स्वागताला आलेली.  घराच्या छतावर, झाडावर ज्याला जिथे जागा मिळेल तिथे माणसंच माणसं बसलेली दिसत होती.  स्वागत मैदानाला जनसागराचं रूप प्राप्‍त झालं होतं.  सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून जनता या स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर होती.  मावळ्याच्या वेशातील कार्यकर्त्यांची लगबग डोळ्यात भरत होती.  स्वागत समिती सूत्रबद्ध पद्धतीनं स्वागतपीठावरील कार्यक्रम पार पाडत होती.  सुवासिनीच्या हस्ते माझी साडी-खनानारळानं ओटी भरण्यात आली.  साहेबांचा कोल्हापुरी फेटा बांधून व चांदीची तलवार भेट देऊन सत्कार करण्यात आला.  व्यक्ती, संस्थाच्या हारांचे ढीग स्वागतपीठावर जमा होऊ लागले.  हारांचा ढीग हटविला की दुसरा लगेच तयार व्हायचा.  हारांचे ढीग हटविता हटविता कार्यकर्त्यांची दमछाक होऊ लागली.  या भागातील आमदार, नामदार, मंत्री, प्रतिष्ठित, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, सदस्य यांनी हजेरी लावलेली.  अनेक वक्तयांनी आपल्या भाषणात साहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.  साहेबांची कामं करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांना जीव लावून त्यांना संधी उपलब्ध करून देणं, संकटकाळी मित्रांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, साहेबांच्या स्वभावातील अनेक जीवनपैलू वक्तयांनी उलगडून सांगितले.

साहेब सतकाराला उत्तर देताना म्हणाले, ''तुम्ही माझा दुसर्‍यांदा सत्कार करीत आहात.  पहिला सत्कार मी या राज्याचा मंत्री झालो तेव्हा स्वीकारला होता.  आता मुख्यमंत्री म्हणून हा सत्कार मी स्वीकारत आहे.  मी पहिल्यांदा मंत्री म्हणून या कराडात आलो त्या वेळी माझे जिवलग मित्र माझ्या घरी मला भेटले.  आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली.  आजही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथम मातेच्या दर्शनाकरिता घरी गेलो तर तेच माझे जिवलग मित्र घरी होते.  ते मला भेटण्याऐवजी माझ्यापासून दूरदूर उभे राहू लागले.  मला वाटलं माझं काही चुकलं तर नाही ?  मी विचार करू लागलो.  माझ्यात असा काय बदल झाला ?  माझ्यावर प्रेम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांना व मित्रांना माझं सांगणं आहे - मी आज कोण झालो यापेक्षा मी कोण होतो याची मला जाणीव आहे.  ही माझ्या मातेची शिकवण मला आहे.  मी तुमचा तोच यशवंता आहे.  तुमचा लंगोटी यार आहे.  या मातीत तुम्ही आणि मी चैत्राच्या महिन्यात गावोगावच्या यात्रेत रेवड्या व नारळावर कुस्त्या खेळलो.  तोच तुमचा यशवंता आजही तोच आहे.  माझ्यात काहीही बदल झालेला नाही.  मी मागच्या सत्काराला उत्तर देताना म्हणालो होतो, 'जनतेनं आमची पाच वर्षांकरिता गडी म्हणून नेमणूक केलीं आहे.'  आता गड्याचा मी मुकादम झालो आहे.  मला बढती मिळाली आहे हाच तो काय माझ्यात फरक झाला आहे.  मला जनतेला आणि माझ्या जिवलग मित्रांना, कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की, मला तुमच्यापासून दूर करू नका.  मी माणूसवेडा माणूस आहे.  केव्हाही माझ्याकडे या, तो तुमचा यशवंता म्हणून मी तुमचं स्वागतच करील.