• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १२३

कार्यकर्तृत्वामुळं अनेकांची थाप कर्तृत्ववान माणसाच्या पाठीवर पडत असते; पण मायेची थाप ही काही और असते.  तिची तुलनाच होऊ शकत नाही.  ही थाप माता आणि मातीची असते.  जी माता आपल्या रक्तामांसाच्या बाळाला कुशीत नऊ महिने नऊ दिवस वाढवीत असताना आपल्या तान्हुल्याची गर्भात सुरक्षित वाढ व्हावी, त्याला लोह मिळावं म्हणून काळ्या मातीच्या ढेकळातील एक कवडीभार माती दररोज खात असते.  ती कूस आणि ती माती आपल्याकडे कधीही, काहीही मागत नाही.  नेहमी आपल्या उत्कर्षाचा विचार करीत असते.  तिची थाप पाठीवर झेलण्यासाठी साहेबांनी १४ नोव्हेंबर ही तारीख कराडला जाण्याकरिता निश्चित केली.  ज्या मातीनं साहेबांना अंगाखांद्यावर खेळविलं, तिच्यातील खनिजांनी रक्ताचा पिंड घडविला त्या मातीची धूळ मस्तकी लावण्यासाठी साहेब कराडला निघाले.  मी आणि साहेब दोघेच गाडीत होतो.  आमच्या गाडीच्या मागेपुढे गाड्यांचा ताफा होता.  गाडी वेगानं पुणेमार्गे कराडला जवळ करू लागली.  गाडीचा वेग काय असतो तो मी प्रथमच अनुभवत होते.  या वेगावरून मला आठवण झाली ती वेगवान वाहनांची.  केवळ वेगवान वाहन मिळालं नाही म्हणून मला देण्यासाठी मुंबईहून रक्तपेढीतून रक्त आणता आलं नाही.  कदाचित शामरावांचा रक्तगट माझ्या रक्तगटाशी मिळाला नसता तर मला आजचा दिवस आणि या गाडीचा वेग पाहावयास मिळाला नसता.  मी मनानं कराडला केव्हाच पोहोचले.  मला घरात आई चातकाप्रमाणे साहेबांच्या वाटेकडे नजर लावून वाट पाहताहेत.  घर पाहुण्यारावळ्यानं गजबजून गेलंय.  नेहमीप्रमाणं बाबुराव कोतवाल पाहुण्यारावळ्यांची सरबराई करताहेत.  साहेबांचे मित्र आईच्या अवतीभोवती जमा झाले.  घरातील बालगोपाळ एखाद्या सणाच्या दिवसासारखे नटूनथटून इकडेतिकडे फिरताहेत.  सोनूताई आल्यागेल्यांना काही कमी पडू नये याची काळजी घेताहेत हे दिसू लागलं.

साहेबांची गाडी कराडच्या गावकुसाजवळ आली.  साहेबांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला.  गाड्यांचा ताफा थबकला.  साहेब गाडीतून उतरताच मागील आणि पुढील गाडीतून अंगरक्षक साहेबांच्या आजूबाजूला उभे राहिले.  साहेबांनी त्यांना इथंच थांबण्याचा इशारा करून रस्त्यालगतच्या शेतात चालत गेले.  त्या काळ्या आईची मूठभर माती उचलली आणि आपल्या मस्तकी लावली आणि परत गाडीत येऊन बसले.  

सर्व कराड आज सजूनधजून साहेबांच्या आगमनाची आतुरतेने वाढ पाहतंय.  साहेबांची गाडी कराडच्या गल्लीबोळातून वाट काढीत साहेबांच्या घरासमोर जाऊन थांबली.  साहेब गाडीतून उतरले.  मला उतरायला थोडा वेळ लागला.  साहेब माझी चौकशी करू लागले.  तेवढ्यात मी त्यांच्याजवळ येऊन पोहोचले.

साहेब मला म्हणाले, ''असं मागे राहायचं नाही.  माझ्यासोबत राहायचं.  तुझ्यामुळं आजचा दिवस या घराला पाहायला मिळाला.''

मी समाधानानं साहेबांच्या चेहर्‍याकडं पाहून हसले.  माझ्या सुना आणि भाचेसुनांनी आम्हा उभयतांना ओवाळलं.  साहेब आणि मी सोबतच घराचा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला.  आई बसल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन आईच्या पायावर दोघांनी माथे टेकविले.

आई म्हणाल्या, ''शाब्बास माझ्या छाव्या, माझ्या यशवंता !  तू माझ्या गणपतचा शब्द खरा करून दाखविलास... तुझ्या दोन्ही थोरल्या भावांची इच्छा पूर्ण केलीस... तू चव्हाण घराण्याचे पांग फेडलेस... माझ्या उदरात जन्मास आला अन् माझी कूस धन्य झाली... असाच मोठा होत राहा.... देशाची आणि गरिबांची सेवा करीत राहा.... माय आणि मातीला विसरू नको... तुझ्या मातेचा आशीर्वाद सतत तुझी पाठराखण करीत राहील...''