• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ११८

आज माझं चित ठिकाणावर नव्हतं.  मन बेचैन होतं.  याक्षणी मला साहेबांच्या जीवनातील संकटांचे प्रसंग आठवू लागले.  एक-एक संकट निवारताना साहेबांच्या मनाची झालेली कुचंबणा आठवते.  आजही तसंच काहीसं संकट साहेबांवर बेतलेलं आहे.  या संकटातून साहेब सहीसलामत बाहेर पडतील का ? साहेबांनी मागे मला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली.

त्यात त्यांनी लिहिलं होतं, ''१९५२ ते १९५५ च्या कठीण राजकीय काळातही तू माझी सोबतीण म्हणून साथ केलीस.  कितीतरी कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जीवाभावाच्या मित्राचे कार्य केलेस.  तुझी साथ नसेल तर मी एकटा काही करू शकेन अशी माझी मनःस्थिती नाही.  तुझ्या निरागस सोबतीशिवाय मी निरर्थ व्यक्ती ठरण्याचा संभव आहे.  माझ्या वाढत्या जबाबदारीबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर माझे आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल असा धाक मनात निर्माण झाला आहे.''

आजचा प्रसंग त्यांच्या राजकीय जीवनाचं भविष्य ठरविणारा आहे.  राजकीय विरोधक साहेबांना खिंडीत पकडून त्यांना नामोहरम तर करणार नाही ?  कारण एका बाजूनं देवांचा कावेबाजपणा व दुसर्‍या बाजूनं हिरेंचा राजकीय धसमुसळेपणा साहेबांचा घात तर करणार नाही ?  या कावेबाज व राजकीय धुसमुसळेपणाला आजवरची साहेबांची राजकीय पुण्याई पुरून उरेल का ?  १६ ऑक्टोबर १९५६ हा दिवस साहेबांच्या आतापर्यंतच्या कार्याचं मूल्यमापन करणारा दिवस ठरणार.  डोंगरेंच्या निरोपाकडे मी डोळे लावून बसलेय.  जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझी काळजी वाढू लागली.  विरोधकांकडून साहेबांना काही दगाफटका तर होणार नाही ?  माझ्या मनाची अवस्था 'वैरी न चिंती ते मन चिंती' अशी झालीय.  माझ्या कानावर जे आलं ते माझ्या जिव्हारी लागलं.  मनाला झोंबलं.  साहेबांनी त्याचा कशाप्रकारे प्रतिकार केला असेल... त्यांची मानसिक अवस्था कशी असेल... साहेब भावनावश झाल्यास त्यांना सावरण्यासाठी त्यांचे जीवाभावाचे मित्रही जवळ नाही.  नियती याहीवेळेस साहेबांच्या पाठीशी उभी राहील का, साथ देईल का ?  माझं मन सारखं भरकटतंय.  नाही नाही ते विचार मनात थैमान घालताहेत.  सकाळपासून मी घरात चिंतामग्न वावरत असताना पाहून नोकरचाकरही माझ्यापासून दूरदूर राहू लागले.  सर्व घटना घडत असताना साहेब थोडेही चलबिचल न होता आपल्या सहकार्‍यांच्या साथीनं या प्रसंगाला तोंड देत असतील का ?  देवगिरीकर आणि बाळासाहेब देसाई हे साहेबांची पाठराखण करीत असतीलच.  श्रेष्ठींचा विश्वास साहेबांनी आपल्या कार्यातून मिळविला आहे.  या सर्वांच्या सद्‍भावनेच्या पाठिंब्यावर साहेब यशस्वी होतील असं माझं मन मला ग्वाही देत आहे.  कराडची माती, माय आणि वंचितांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहेत.  या पुण्याईच्या जोरावर साहेब यश संपादन करतील, अशी माझ्या मनाची समजूत मीच घालीत आहे.

आणि घडलंही तसंच.  गाड्यांचा लोंढा बंगल्याच्या दिशेनं येताना मला दिसला.  साहेब गाडीतून उतरण्याअगोदर डोंगरे गाडीतून उतरून धावतच बंगल्यात शिरले.  साहेब विजयी झाल्याचे त्यांनी मला सांगितले.  माझी एकच तारांबळ उडाली.  मी साहेबांना ओवाळण्याची तयारी करू लागले.  तयारी करून ओवाळण्यासाठी बंगल्याबाहेर आले.  साहेबांना ओवाळलं.  माझी आणि साहेबांची दृष्टादृष्ट झाली.  दृष्टीची भाषा एकमेकांना कळली.  मी साहेबांच्या आनंदात विलीन झाले.  साहेब कार्यकर्त्यांच्या गराड्यात सामील झाले.

रात्रीचे ११ वाजत आले तरी साहेबांभोवतालची गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसेनात.  स्वागतासाठी आलेल्या थोरामोठ्यांची साहेब आस्थेवाईकपणे चौकशी करू लागले.  बंगल्यासमोरच्या हिरवळीवरच साहेबांनी आपली बैठक मांडली.  कार्यकर्त्यांना साहेब आपल्या जवळ बसून घेऊन ख्यालीखुशाली विचारू लागले.  आल्यागेल्यांसाठी चहापाणी करण्यावर डोंगरे लक्ष ठेवून होते.  साहेबांचं आम्हाला सांगणं असायचं, 'घरी आलेला कार्यकर्ता असो की, ग्रामीण भागातील नागरिक... त्याचं स्वागत आपल्या घरी झालंच पाहिजे.  त्यांच्याच पुण्याईनं आपल्याला हे दिवस आलेत.'