मराठी मातीचे वैभव- ६६

शिक्षण आणि शिक्षणसंस्थांपासून यशवंतरावजींच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या.  शिक्षण हे केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर एकंदर समाज आणि राष्ट्राच्या भवितव्याची कुंडली मांडते अशी त्यांची धारणा होती.३०  ते ब-याचदा अपेक्षाभंग करणारे ठरते याची त्यांना कल्पना नव्हती असे नाही.  तरीपण ते समाज व राष्ट्राच्या आशेचे अंतिम स्थान आहे अशी त्यांची श्रद्धा होती.  शिक्षणाकडे सतत आशेनेच पाहिले पाहिजे, निराशेने पाहणे धोक्याचे ठरेल असे त्यांचे म्हणणे होते.  शिक्षणाविषयीची असमाधानता सार्वत्रिक होत असल्याचेही त्यांच्या ध्यानात आले होते.  विकसित राष्ट्रांमध्येही शिक्षणाविषयीची असमाधानता वाढत असल्याची जाणीव त्यांना होती.  सुशिक्षित बेकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे ते आपल्या डोळ्यांनी पाहात होते.  आजच्या शिक्षणातनू तरुणांच्यामध्ये शिस्तही बाळगती जात नाही अशी ओरड त्यांच्या कानी पडत नव्हती असे नाही.  तरीपण निरक्षर बेकारांपेक्षा सुशिक्षित बेकार अंतिमतः देशहिताचे ठरतील असे त्यांनी अनेकदा म्हटले होते.  त्यांचे हे म्हणणे तर्हेवाईक वाटण्यासारखे होते.  पीडलेला माणूस सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करू शकतो.  ती परिस्थिती बदलण्याचा विचारही तो करू शकेल.  ते म्हणतात : ''पण काही मंडळींचा असा आक्षेत आहे की, फार महाविद्यालये काढल्याने गुणवत्ता कमी होते, आणि पुष्कळ मुले शिकून शहाणी झाली आणि त्यांना  नोक-या मिळाल्या नाहीत म्हणजे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न तयार होतो.  त्यांना यात मोठा धोका दिसतो.  पण धोका कोणत्या कामात नाही ?  आणि यात धोका असलाच तर सुशिक्षित बेकार आणि अशिक्षित बेकार यांमधला कोठला धोका अधिक मोठा ?  शिक्षणाने देशात बोरीच निर्माण होणार असेल तर देशामध्ये सुशिक्षित बेकार असणे अधिक चांगले असे मी म्हणेन.  कारण सुशिक्षित बेकार निदान विचार तरी करू शकेल.  आपण बेकार का राहिलो याची तो कारणपरंपरा शोधील आणि ती दूर करण्याचा तो प्रयत्न करील.  तेव्हा शिक्षणाने सुशिक्षित बेकारांचा धोका निर्माण होईल या शंकेत काही अर्थ नाही.''३१  या सुशिक्षित बेकारांच्या असंतोषातून समाजक्रांतीची मशाल पेटेल असा विचार त्यांच्या मनात निर्माण होत असे.  वास्तविक यशवंतरावजींचा पिंड समन्वयवादी व्यक्तीचा होता.  वर्गकलह देशात पेटावा असे त्यांना वाटत नव्हते.  पण तो टाळता येईल का ?  याबद्दल त्यांचे मन साशंक होते.  हिंदुस्थानात वर्गसंघर्ष नव्हता, असे कधी झाले नाही.  तो होता आणि आज तो अधिक उग्ररूप धारण करीत आहे.  आपल्या देशातला वर्गसंघर्ष हे जातिसंघर्षाचेच रूप आहे, असे यशवंतरावांचेही ठाम मत होते.  ते म्हणतात, ''जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था ही अत्यंत वाईट स्वरूपाची विग्रहव्यवस्थाच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.  या जाति-वर्ण-वर्गव्यवस्थांना सध्या जे विकृत स्वरूप आले आहे, त्या स्वरूपासाठी त्या निर्माण करण्यात आलेल्या नव्हत्या, असे म्हणतात फारसा अर्थ नाही नि तसे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करणे ठरेल.''३२  भारतात वर्गसंघर्ष अटळ असे त्यांचे मत बनले होते.  जे शोषित आहेत त्यांनी संघटितपणे शोषकांचा आहे, प्रतिकार केला पाहिजे.  त्यांनी प्रस्थापितांच्या दयेवर जगण्याचे काही कारण नाही.  ''हा संघर्ष अटळ आहे; आणि एकदा तो अटळ आहे, हे मान्य केले की मग ही एक लढाई ठरते आणि लढाई नेहमी अहिंसकच राहिली पाहिजे ही इच्छा चांगली आहे, पण व्यवहारात तसे घडणे अशक्य आहे,''३३ असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

यशवंतरावांच्या वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष यासंबंधीच्या मतांच्या संदर्भात त्यांच्या शिक्षणविषयक विचारांची दखल घेतली पाहिजे असे मला वाटते.  मला असे वाटते की त्यांनी हे सर्व पुढे उद्भवणा-या परिस्थितीवर सोडून देण्याचे ठरविले होते.  या देशात क्रांतिकारक परिवर्तन कधी घडले नाही, याची मात्र त्यांना खंत होती.  उच्च शिक्षणाची दारे सगळ्यांना खुली असली पाहिजेत.  शिक्षण लोकभाषेतून दिले पाहिजे, ज्ञानविज्ञान खालच्या थरातील सर्वांच्या घरादारांपर्यंत जाऊन पोचले पाहिजे आणि ते समाजक्रांतीचे रसायन ठरले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटत होते.  शिक्षणप्रसारातून बेकारी वाढली तरी हरकत नाही; कारण सुशिक्षित बेकार हे विचार करू शकतील व काही तरी कृती करू शकतील, यावर त्यांचा विश्वास होता.  या देशात आमूलाग्र परिवर्तन घडू शकेल का ?  हा प्रश्न त्यांच्या मनाच्या तळाशी घर करून बसलेला होता, असे माझे मत आहे.
--------------------------------------------------------------
३०.  लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या कोनशिलासमारंभ प्रसंगी (२९ आक्टोबर १९७९) मांडलेला विचार.
३१.  'लोकभाषा हीच ज्ञानभाषा', युगांतर, पृ. १७१.
३२.  'वर्गसंघर्ष आणि जातिसंघर्ष', भूमिका, पृ. २४४.
३३.  कित्ता, पृ. २४४.
--------------------------------------------------------------------------