मराठी मातीचे वैभव- ६०

यशवंतराव चव्हाणांनी विकासाची जशी सरळ व सोपी व्याख्या केली होती तशीच त्यांनी शिक्षणाचीही साधी व सरळ व्याख्या केली होती.  ती अशी होती :  ''शिक्षित व्यक्तीला स्वतःच्या भोवती घडणा-या गोष्टी आणि जगामध्ये घडणा-या इतर गोष्टी यांची ज्यामुळे काही संगती लावता येते, त्यांचा योग्य अर्थ समजावून घेता येतो, आणि त्यांचा परिणाम आपल्या जीवनावर काय घडतो, आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय घडतो हे समजावून घेता येते आणि समजावून देता येते, त्याला मी शिक्षण मानत आलो आहे.''१५  सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन ज्याच्यामुळे होते त्याला त्यांनी शिक्षण मानले.  तेव्हा अशा प्रकारचे शिक्षण समाज व व्यक्तीच्या विकासासाठी आणि त्यासाठी आवश्यक असणा-या मनुष्यबळाच्या नियोजनासाठी अपरिहार्य ठरते.  मानवी शक्तीच्या गुंतवणुकीशिवाय 'विकास' करणे, साधणे शक्य नाही, आणि म्हणूनच विकासाचे प्रश्न हे मूलभूत शैक्षणिक प्रश्न असतात.  यशवंतरावजी जेव्हा विकासासाठी 'काही मूलभूत शैक्षणिक प्रयत्नांची आवश्यकता असते' असे म्हणतात तेव्हा ते शिक्षणाच्या अनिवार्यतेबरोबरच त्याच्या मूलभूत उद्दिष्टांवरही बोट ठेवतात.  

परंतु विकासासाठी आवश्यक असणारे 'काही मूलभूत शैक्षणिक प्रयत्न' करणार कोण ?  देशातील शिक्षणसंस्था, विद्यापीठे, शासन आणि नियोजनकार या सर्वांनी मिळूनच हे 'शैक्षणिक प्रयत्न' केले पाहिजेत.  आणि हे 'प्रयत्न' ज्यांच्या विकासासाठी करणे आवश्यक आहेत त्यांचा त्यात सहभागही तितकाच किंबहुना अधिक-महत्त्वाचा आहे.  त्यासाठी व्यक्ती आणि समाज यांना विकासाभिमुख बनवावे लागेल.  समाज 'विकसनशील' बनला तर विकासाच्या योजना द्रुत गतीने फुलद्रूप होऊ शकतात.  आपली आकलनशक्ती वाढविल्याशिवाय जगातील कुठल्याही समाजाला या वैज्ञानिक युगात प्रगती करता येणे शक्य नाही, आणि म्हणून ''या पुढे सर्व समाजच शिकत राहिला पाहिजे,''१६  असा विचार यशवंतरावांनी बोलून दाखविला होता.  'शिकणा-या समाजा'ची संकल्पना ही अतिशय अर्थपूर्ण व महत्त्वाची संकल्पना आहे.  युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेनेच ही संकल्पना अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी मांडली होती.  खरे तर या संकल्पनेला मूर्त रूप देणे ही फारच कठीण अशी गोष्ट आहे; पण त्याचबरोबर ती तितकीच आवश्यकही आहे.  अविकसित देशांचा विकास शिक्षणप्रसाराच्या का-याला प्राधान्य दिल्याशिवाय शक्यच नाही.
---------------------------------------------------
१५.  'ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना', सह्याद्रीचे वारे, पृ. १४०.
१६.  'समाजाभिमुख शिक्षण' भूमिका, पृ. १६७.
----------------------------------------------------