३
यशवंतरावजी हे उदारमतवादी शिक्षणाचे समर्थक होते यात शंका नाही. परंतु राष्ट्राचा विकास केवळ अशा ह्या उदारमतवादी शिक्षणातून होणार नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय या देशाचा औद्योगिक विकास घडू शकणार नाही. याची जाणीव त्यांनी आम्हाला वारंवार करून दिली. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या विकासावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून शेतीचा प्रश्न हा आपला मूलभूत प्रश्न आहे, या गोष्टीकडे त्यांनी आमचे लक्ष अनेकदा वेधले होते. ज्ञान-विज्ञानाची कास धरल्याशिवाय विकासाची गंगा अवतरणार नाही याचे भान विविध क्षेत्रांत काम करणा-या मंडळींनी ठेवणे आवश्यक आहे, असा आग्रही विचार यशवंतरावांनी आपल्या अनेक भाषणांतून व्यक्त केला. उदा. परभणी येथील कृषिमहाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा शिलान्यास करताना (१९६०) ते म्हणाले होते, ''मी हल्लीच्या शिक्षणाचा म्हणजे ज्याला ह्युमॅनिटीजचे शिक्षण म्हणतात त्याचा पुरस्कार करणारा आहे. पण मी ज्या देवाचा भक्त आहे त्याच देवाची स्तुती करणारा नाही. शेतीच्या शिक्षणाचीही आवश्यकता आहे. शेतकरी आणि शेतीशी संबंध असणारा मनुष्य हा शहाणा असल्याशिवाय शेती शहाणी होणार नाही यावर माझा विश्वास आहे.''१० आणि म्हणून शेतीसंबंधीचा शास्त्रीय दृष्टिकोण अगदी झोपडीतल्या शेतक-यापर्यंत नेऊन पोचवण्याची आवश्यक आहे. आपली शेती 'शहाणी' नाही, त्याचे कारण आपला शेतकरी 'शहाणा' नाही. शेतीचा प्रश्न एवढा गुंतागुंतीचा व बिकट आहे की त्याने भारताच्या जीवनातच एक प्रकारची 'टॅजिडी' निर्माण केली आहे, असे यशवंतरावांना वाटत होते. हा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची आणि त्यासाठी शेतीच्या नवीन ज्ञानाची गरज आहे. शेतीसंबंधीचा नवा विचार केवळ कृषिशास्त्राच्या अभ्यासकांपर्यंत म-यादित ठेवून चालणार नाही. वस्तुतः तो असा ''पाझरत किंवा न पाझरता अगदी सरळ कालव्यासारखा वाहत वाहत शेवटच्या शेतक-यापर्यंत जाऊन पोचला पाहिजे.''११ शेतीचा हा अति बिकट प्रश्न सोडविण्यासाठी सबंध शेतकरीवर्गच शहाणा करून सोडावा लागेल. ''त्याकरिता शेतीचे हे ज्ञान पावसाच्या पाण्यासारखे गेले पाहिजे असे मला वाटते. वाहणारी नदी ज्या गावाच्या काठाने जाईल त्यालाच फक्त पाणी देते. पण पावसाचे पाणी हे सगळीकडे जाते. कुठे कमी तर कुठे जास्त. असे पावसाच्या पाण्यासारखे शेतीचे ज्ञान सगळीकडे पसरले पाहिजे, वाढले पाहिजे, आणि ही महाविद्यालये त्याची केंद्रे झाली पाहिजेत.''१२
यशवंतरावजींनी हा जो विचार मांडला आहे तो ग्रामीण जीवनाच्या पुनर्रचनेचाच विचार आहे. विकास नागरी जीवनाचाही झाला पाहिजे आणि ग्रामीण जीवनाचाही. पण दुर्दैवाने ग्रामीण जीवन हे शतकानुशतकांपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलेले आहे. ते अंधारात बुडालेले आहे. ते प्रकाशात कसे आणता येईल ? नवीन ज्ञानाचा प्रकाश ग्रामीणा भागात नेल्याशिवाय अंधारात चाचपडणा-या कोट्यवधी लोकांना विकासाच्या वाटा सापडणार नाहीत. विकासाच्या वाटा त्यांना शिक्षणातून सापडू शकतील, अशी यशवंतरावांची धारणा होती. आणि म्हणूनच ते म्हणतात, ''शेतीसंबंधी जे नवीन संशोधन आज होत आहे याचा उपयोग आपली शतकरी करू शकेल अशा दृष्टीने शिक्षण देण्याचा प्रयत्न आपणाला करता येईल.''१३ यशवंतरावजींनी ग्रामीण शिक्षणाची कल्पना मांडली होती. गा्रमीण जीवनाच्या पुनर्रचनेसाठी व सर्वांगीण विकासासाठी
जे शिक्षण उपयुक्त ठरते, आवश्यक ठरते त्याला 'ग्रामीण शिक्षण' म्हणता येईल.
यशवंतराव चव्हाणांच्या शैक्षणिक विचारांचा आणि का-याचा मागोवा आपल्याला सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांच्या संदर्भातच घेणे भाग आहे. त्याशिवाय त्यांचा अन्वयार्थ आपल्याला कळणार नाही. व्यक्तींच्या वैचारिक आणि भावनिक समृद्धीसाठी शिक्षण हे जेवढे अनिवार्य आहे तेवढेच ते समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठीही आवश्यक आहे. यशवंतरावजींनी विकासाची स्वतःपुरती एक सुटसुटीत व्याख्या केली होती. ''सर्वच क्षेत्रांमध्ये संतुलित प्रगती म्हणजे विकास अशी विकासाची मी व्याख्या करतो. आणि म्हणून काही प्राथमिक संस्थांची, काही मूलभूत शैक्षणिक प्रयत्नांची विकासासाठी आवश्यकता असते.''१४ 'काही मूलभूत शैक्षणिक प्रयत्न' हे विकासप्रक्रियेसाठी आवश्यक असतात हे आता सर्वच राष्ट्रांच्या राज्यकर्त्यांनी आणि नियोजनकारांनी मान्य केले आहे, आणि म्हणूनच शिक्षणाचा प्रश्न आपल्याला बाजूला ठेवता येत नाही.
--------------------------------------------------------------------
१०. 'आमच्या शेतीचा मूलभूत प्रश्न', सह्याद्रीचे वारे, पृ. १३६.
११. कित्ता, पृ. १३८.
१२. कित्ता, पृ. १३८.
१३. 'ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना', सह्याद्रीचे वारे, पृ. १४२.
१४. 'आमच्या शेतीचा मूलभूत प्रश्न', सह्याद्रीचे वारे, पृ. १३३-३४.
------------------------------------------------------------------------------