सर्वश्री माडगूळकर, पां. वा. गाडगीळ, स. गो. बर्वे, त्र्यं. शि. भारदे, वि. स. पागे, तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जाशी यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा काँग्रेससाठी उपयोग करून घेतला. निवडणुकीसाठी तिकीट वाटताना अधिक अधिक जाति जमातींना प्रतिनिधित्व मिळावे याची यशवंतराव खबरदारी घेत. भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण या दोघांनी १९५२-५७ च्या काळात महाराष्ट्र काँग्रेस बलवान बनविली आणि काँग्रेस प्रशासनाला लोकप्रिय बनविले. नंतर मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन तट पडले. चव्हाण व हिरे एकमेकापासून थोडे दूर झाले. कित्येक महत्त्वाचे कार्यकर्ते काँग्रेसपासून दूर होऊन त्यांनी जन काँग्रेस स्थापन केली. १९५७ च्या निवडणुकीत प. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. विदर्भाने सावरून धरल्यामुळे काँग्रेस पक्ष कसाबसा अधिकारारूढ बनला. १९५७ ते ५९ ही दोन वर्षे काँग्रेसच्या दृष्टीने फार वाईट गेली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी समिती बनवून एकत्र येऊन काँग्रेसला व काँग्रेस सरकारला विरोध केला. महाराष्ट्रातून काँग्रेसचे उच्चाटन होते की काय असे वाटू लागले होते. तथापि यशवंतराव चव्हाणांच्या कौशल्यामुळे, मुत्सद्देगिरीमुळे, राजकीय शहाणपणामुळे काँग्रेस वाचली. यशवंतरावांना वैयक्तिक खूप त्रास झाला. खूप मानहानी सोसावी लागली. महाराष्ट्रापेक्षा देश मोठा मानायचा आणि नेहरूंचे मन वळवूनच महाराष्ट्र मिळवायचा हे सूत्र पुढे ठेवून यशवंतरावजी दिल्लीचे मन वळवू शकले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी केली.
काँग्रेस पक्षच संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करील हे आश्वासन त्यांनी पुरे करून दाखविले.
काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून ती एक चळवळ आहे, जन आंदोलन आहे असे चव्हाणसाहेब म्हणत. या राष्ट्रीय प्रवाहात इतर प्रवाह सामील होणार आणि त्याबरोबर काही चांगलं, काही वाईट प्रवाहात शिरणार. चांगली माणसे काँग्रेसमध्ये यावीत असा त्यांचा सततचा प्रयत्न असे. मग ते शे.का.प.चे मोरे, जेधे, जाधव, खाडिलकर आणि मोहिते असोत वा समाजवादी पक्षाचे शिवाजीराव पाटील, मोहन धारिया वा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ असोत, या सर्वांना आत घेऊन त्यांचा काँग्रेससाठी उपयोग करून घेण्याची कामगिरी यशवंतरावांनी पार पाडली. तसेच रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब रूपवते, कम्युनिस्ट पक्षाचे अण्णासाहेब शिंदे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यशवंतरावजींचा दृष्टिकोण उदार होता. त्यांना माणसांची चांगली पारख होती. माणसे कार्यकर्ते चुकायचे पण त्यांच्या चुका सांभाळून घ्यायच्या, त्यांना रागवायाचे नाही हा साहेबांचा स्वभाव. विश्वास द्यायचा आणि घ्यायचा. कुणाचा द्वेष करायचा नाही, कुणाकडून काही अपेक्षा बाळगायची नाही. सर्वांशी संबंध ठेवायचे. मग ती मंडळी राजकारणातील असोत वा समाजकारण, शिक्षण, कला-क्रीडाक्षेत्रातील असोत. राजकारणी पण रसिक, राजकारणी पण साहित्यिक, राजकारणी पण मोठ्या मनाचा माणूस अशी यशवंतरावजींची विविध रूपे होती.
दिल्लीत त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, बुद्धिमत्ता, हुशारी, मुत्सद्देगिरी अधिक खुलून दिसली. १९६२ ते १९७७ पर्यंत १५ वर्षे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदे भूषविली, नव्हे तर गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री ही महत्त्वाची पदे सांभाळून देशाकडून, काँग्रेस पक्षाकडून, विरोधकांकडून वाहवा मिळविली. परदेशांनी व परदेशी वृत्तपत्रांनी पण त्यांची वाखाणणी केली. एक चांगले पार्लमेंटॅरियन म्हणून त्यांचा बोलबाला झाला. थोड्या मोजक्या शब्दात म्हणजे कसे मांडायचे, शांतपणे हसत हसत उत्तर कसे द्यायचे, गृहास विश्वासात घेऊन निवेदन कसे करायचे याची यशवंतरावजींची जी हातोटी होती, ती विलक्षण होती. त्यांनी पं. नेहरूंच्या समवेत काँग्रेस वगि कमिटीवर काम केले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बरोबर काँग्रेस कार्यकारिणीत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात काम केले. प्रथम १९६९ मध्ये आणि नंतर १९७८ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्ष फोडल्याचे चव्हाणांनी डोळ्याने पाहिले. अनुभवले. इंदिरा गांधींचे १९६९ मधील धोरण त्यांना मान्य नव्हते आणि १९७८ मधील तर नव्हतेच नव्हते. संजीव रेड्डी प्रकरणी त्यांनी श्रीमती इंदिरा गांधींना जाहीर विरोध केला आणि १९७८ मध्ये ते इंदिरा गांधींच्या नव्या काँग्रेसमध्ये न जाता जुन्या पारंपारिक काँग्रेसमध्ये राहिले. स्वतःच्या नावाचा पक्ष स्थापन करणे आणि त्या पक्षात आपली हुकूमशाही प्रस्थापित करणे हे धोरण त्यांना मान्य नव्हते. यशवंतरावजींचा १९८० ते ८१ मध्ये खूप कोंडमारा झाला. त्यापूर्वी त्यांनी १९७८ त १९७९ पर्यंत जुन्या काँग्रेसमध्ये राहून ती बळकट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या मूल्यांसाठी झगडा दिला. तथापि १९८० च्या निवडणुकीत लोकांनी श्रीमती इंदिरा गांधींच्या बाजूने कौल दिल्यानंतर यशवंतराव थोडे हलके, व्यथित झाले. अरस काँग्रस की इंदिरा काँग्रेस असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला, आणि काही महिन्यांच्या मंथनानंतर त्यांनी मनाशी निर्णय घेतला की, काँग्रेसचा मुख्य प्रवाह तो बनला आहे. अरस काँग्रेस नव्हे. म्हणून त्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये सामील होण्याचे ठरविले. हा निर्णय बरोबर की वाईट याचे मूल्यमापन करण्याच्या किंवा शहानिशा करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. काँग्रेसबरोबर आपण राहिले पाहिजे, राष्ट्रीय प्रवाहाबरोबर राहिले पाहिजे, एवढाच निकष त्यांनी लावला.
हायस्कूलमध्ये असताना यशवंतरावाजींनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन सत्याग्रह केला. तुरुंगवास भोगला. त्या वेळी म्हणजे १९३० मध्ये त्यांनी काँग्रेसशी जो संबंध जोडला तो अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत - १९८० पर्यंत, ५० वर्षे ठेवला. काँग्रेसमध्ये खूप स्थित्यंतर झाली. खूप मतभेद, भांडण झाली पण यशवंतरावजींनी काँग्रेसचा कधी त्याग केला नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा हे सूत्र शेवटपर्यंत कायम ठेवले. त्यांचे जीवन काँग्रेसमय बनले होते, आणि काँग्रेससाठी आणि देशासाठी त्यांनी परिश्रमाची आणि त्यागाची परिसीमा गाठली होती. ज्या काँग्रेसकरता त्यांनी जीवन वेचलं तो पक्ष मोठा करण्याकरिता परिश्रम केले, त्या काँग्रेसने शेवटी शेवटी चव्हाणांची उपेक्षा केली ही त्यांच्या जीवनातील शोकांतिका. यशवंतराव काँग्रेसमय जीवन जगले आणि काँग्रेसजन म्हणून अनंतात विलीन झाले. एका फार मोठ्या माणसाला महाराष्ट्र आणि देश अवेळी मुकला !