• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ८२

महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगाव हे त्यांच्या आदर्शाप्रमाणे निर्माण झाले पाहिजे व प्रत्येक तरुण हा सुसंस्कृत व प्रगतिशील विचाराचा असला पाहिजे अशी यशवंतरावजींची धारणा होती.  ''कल्याणकारी राज्यात जोपर्यंत शिक्षण, सहकार, शेती व आरोग्य या गोष्टींना प्राधान्य व महत्त्व दिले जात नाही तोपर्यंत ते खरे लोककल्याणकारी राज्य झाले असे म्हणता येणार नाही.'' असे यशवंतरावजी म्हणत.  खेड्यातील प्रत्येक माणसाने एकमेकाकडे सहृदयतेने मदत करण्याच्या भावनेतून पाहिले पाहिजे असे यशवंतरावजी म्हणत.  त्यांच्या मते ज्या खेड्यातला समाज आपले सगळे प्रश्न एकमेकांच्या सहका-याने, जिव्हाळ्याने आणि समजुतीने सोडविण्यासाठी एकत्र बसून निर्णय करू शकतो असे पंचायतीचे जीवन जगणारे खेडे निर्माण झाले पाहिजे असे यशवंतरावजींचे स्वप्न होते.

यशवंतरावजी गरिबांचे व भूमिहीनांचे रक्षक होते.  दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळी भूमिहीनांचा सत्याग्रह झाला त्या वेळी यशवंतरावांनी भूमिहीनांच्या समस्या मूलभूत आहेत हे मान्य करून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.

नवमहाराष्ट्राचा भाग्योदय करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले व या हाती घेतलेल्या अवघड कामात यश नक्की मिळेल अशी त्यांना आशा होती.  नवमहाराष्ट्रात आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस यावेत या सामान्य माणसाच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी शासनाच्या मार्फत लोकांची अधिकाधिक सेवा करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

यशवंतरावजी हे नेहमी सावधपणाने जपून पावले टाकणारे मुत्सद्दी नेते होते.  सर्व बाबींचा विचार करून एकाच प्रश्नाविषयी अत्यंत मोजके व नेमके बोलण्याचे पथ्य ते पाळीत.

यशवंतरावजींना त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे जीवाला जीव देणारे, सर्व जातिधर्माचे, अडाणी, शिक्षित, प्राध्यापक, शेतकरी, साहित्यिक, कलावंत इत्यादी अनेक व्यवसायांतील मित्र लाभले होते.  त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता.  

यशवंतरावजींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभाराची एक आदर्श अशी परंपरा निर्माण करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणचा त्यांनी प्रयत्न केला.  कल्याणकारी राज्याचा आदर्श सर्वांपूढे ठेवला.  स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे मंडळ स्थापून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.  वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरणातून महाराष्ट्रात आदर्श जिल्हा परिषदा कशा निर्माण होतील याचा विचार करण्यासाठी समिती नेमून भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रात जिल्हा परिषदा स्थापन केल्या.

यशवंतरावजी स्वतः एक उच्च कोटीचे साहित्यिक व कलेचे उपासक होते.  साहित्य, कला, संगीत, भारतीय संस्कृती याबद्दल अपार प्रेम त्यांच्या ठाई होते.

तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना करून मान्यवर अशा थोर साहित्यिकांच्या व कलावंतांच्या का-याला राजाश्रय देऊन चालना देण्यचे कार्य त्यांनी सुरू केले.  

महाराष्ट्रात कृषी व औद्योगिक क्रान्ती घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्राची तिसरी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे काम हाती घेऊन विविध खात्यांचे अभ्यास गट तयार केले.

मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या विकासाचा आराखडा त्यांनी तयार करविला.  ठाणे खाडीवर पूल बांधून मुंबई महाराष्ट्राच्या मुख्य भूमीशी जोडण्याची योजना त्यांनीच करविली.  त्यामुळे यशवंतरावजींना नव्या औद्योगिक नव मुंबईचे जनक म्हणविता येईल.  प्रा. वि. म. दांडेकर यांच्या समितीने महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात जवळ जवळ ७० टक्के नोक-या ह्या केवळ मुंबई व ठाणे औद्योगिक परिसरातील आहेत, हे दाखविल्यामुळे १९६२ मध्ये यशवंतरावांनी मुंबईबाहेर उद्योगधंद्यांचे जाळे उभारण्याच्या योजना आखल्या.

महाराष्ट्राच्या दुर्दैवामुळे यशवंतरावजींना नवमहाराष्ट्र निर्मितीनंतर सुमारे अडीच वर्षांतच त्यांची भारताचे संरक्षणमंत्री म्हणून पं. नेहरूंनी निवड केल्यामुळे दिल्लीस जावे लागले व यशवंतरावजींच्या मनातला महाराष्ट्र घडविण्याचा त्यांचा इरादा अर्धवटच राहिला.

१९६२ मध्ये चीनकडून पराभव होत असताना त्यांची देशाचे नवे संरक्षणमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे नेहरूनंतर कोण हा प्रश्न यशवंतरावजींच्या रूपाने सुटला आहे असे अनेकांना वाटत होते.

भारताचे संरक्षणमंत्री असताना यशवंतरावांनी संरक्षण खात्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या व त्यामुळे जवानांचे मनोधैर्य वाढविण्यास मदत केली व त्यामुळे भारतास १९६५ च्या युद्धात पाकिस्तानवर सहज मात करता आली.  

त्यानंतर भारताचे गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री म्हणून १९७७ पर्यंत विविध मंत्रिपदे त्यांनी समर्थपणे भूषविली व प्रत्येक खात्यावर स्वतःची वेगळी अशी छाप त्यांनी पाडली.  जनता पक्षाच्या फाटाफुटीनंतर यशवंतरावजींची भारताच्या उपपंतप्रधानपदी निवड झाली.  

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार श्री. यशवंतरावजी चव्हाण हे त्यांच्या प्रिय पत्नी वेणूताई यांच्या निधनाचे दुःख न पेलू शकल्यामुळे अल्पशा आजाराने २५ नाव्हेंबर १९८४ ला स्वर्गवासी झाले.  

त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन !