• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ८१

यशवंतरावजींची काँग्रेसपक्ष व पं. नेहरुजींवर नितांत श्रद्धा होती.  १ डिसेंबर १९५५ रोजी त्यांनी फलटण येथील व्याख्यानात सांगितले होते की ''मुंबई राज्य रचनेबाबत काँग्रेस कार्यकारिणी जो अंतिम निर्णय घेईल तो मी शिरोधार्य मानीन.''

यशवंतरावजींची काम करून घेण्याची एक आगळी अशी विशिष्ट पद्धत होती.  सहका-यांचा विश्वास संपादन करून, त्यांना आपलेसे करून पोटात शिरून ते दुस-याकडून काम करवून घेत.  एकसंध, एकजिनसी नवमहाराष्ट्र तयार व्हावा अशी त्यांची मनापासून तळमळ होती.

विविध मोठमोठ्या पदांवर काम करताना त्यांना एकाच वेळी विविध अशा जटिल समस्यांना तोंड द्यावे लागत असे.  पण यशवंतरावजींची काम करण्याची एक पद्धत होती.  एक प्रश्न सुटला की लगेच दुसरा प्रश्न ते हाती घेत.  एकाच वेळी अन्य सर्व गोष्टींची व विचारांची काळजी ते करीत नसत.  एक समस्या व्यवस्थित सुटली की मग आपले डोके ते दुस-या समस्येकडे लावीत.  ते म्हणत की आपले पहिले पाऊल घट्ट रोवल्यावरच दुसरे पाऊल पुढे टाकावे.  तसेच विविध प्रश्नांतून कोणत्या प्रश्नास अग्रक्रम द्यावयाचा याचाही ते गंभीरपणे विचार करीत.  कोणता प्रश्न केव्हा हाती घ्यावयाचा तेही स्वतः ठरवीत.

काँग्रेसचे ते सच्चे पाइक होते.  ते वयाने २३-२४ वर्षांचे असतानाच क-हाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचे बंधू श्री. गणपतराव चव्हाण हे काँग्रेसच्या विरुद्ध उभे होते.  पण भावाच्या प्रेमाचा मोह बाजूला सारून यशवंतरावांनी त्यांचे विरुद्ध प्रचार केला व त्यांच्या भावाचा पराभव करविला.  त्यावरून त्यांचे काँग्रेस पक्षाबद्दलचे प्रेम व पक्षशिस्त स्पष्ट होते.

यशवंतरावजींच्या बालपणी शिक्षण ही श्रीमंतांच्या आवाक्यातील बाब होती.  गरीब शेतकरी, कष्टकरी मजूर व सामान्य माणसांच्या मुलांना त्या वेळी महागडे शिक्षण घेणे सर्वस्वी अशक्य होते.  त्या वेळच्या परिस्थितीमुळे सामान्य माणसात शिक्षणाविषयी आस्था नव्हती.  आजच्या मनाने त्या वेळी शिक्षणाच्या सोईसुद्धा अत्यंत अपु-या होत्या.  तालुक्याच्या ठिकाणी एखादे हायस्कूल व काही मोजक्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालये होती.  तेथेसुद्धा फक्त मोठ्या जमीनदारांची, श्रीमंतांची व फार मोठ्या अधिका-यांची मुले शिक्षण घेऊ शकत.  यशवंतरावजींनी स्वतः बालपणी शिक्षणासाठी सोसलेल्या अनंत अडचणींमुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्य गरीब विद्यार्थ्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली.  महाराष्ट्राची प्रगती हवी असेल तर प्रत्येक तरुणास उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली पाहिजे अशी यशवंतरावजींची धारणा होती.

महाराष्ट्राचा कायापालट करून नव महाराष्ट्र निर्माण करावयाचा असेल तर शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या व प्रत्येक सामान्य गरीब माणसाच्या मुलास सर्व प्रकारच्या मोफत शिक्षणाची सोय त्याच्या घराजवळ झाली पाहिजे ही खूणगाठ मनाशी बांधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास शासनामार्फत फीमाफीची सवलत (ई.बी.सी.) जाहीर केली.  अशा प्रकारची सवलत देणारे महाराष्ट्र हे भारतातील सर्व प्रथम राज्य आहे.  या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर शिक्षणासाठी प्रचंड ताण पडला तरी हरकत नाही असे यशवंतरावजींचे म्हणणे होते.

शासनाने सुरू केलेल्या इ.बी.सी. च्या सवलतीमुळे महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती झाली असे म्हटले पाहिजे.  यामुळे १९५९ नंतर महाराष्ट्रातील बहुसंख्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होऊ लागले व त्यामुळे ग्रामीण भागात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांत शिक्षणाबद्दल आस्था निर्माण झाली व शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी सामान्य ग्रामीण तरुण धडपडू लागला.  

शासनाच्या या उदार धोरणामुळे ग्रामीण भागात नवनवीन शाळा व महाविद्यालये निर्माण झाली व गोरगरिबांच्या मुलांसाठी ज्ञानाची गंगा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य यशवंतरावजींच्या शैक्षणिक धोरणामुळे घडून आले.