४
शास्त्रीय ज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला विकासाच्या वाटा सापडणार नाहीत हे महाराष्ट्राला यशवंतरावांनी अनेकदा सांगितले. पण शास्त्रीय ज्ञान घेण्याची सर्वसामान्य लोकांमध्ये कुवत कधी निर्माण होईल ? लोक साक्षर झाल्याशिवाय ते शक्य नाही; हे उघड आहे आणि म्हणून देशातील सर्व थरांतील नागरिकांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीने देणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसाराशिवाय लोकशाही समाजाची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. जनसामान्यांना प्राथमिक शिक्षण प्राप्त झाले तर त्यातून लोकशाही शक्तीचा आविष्कार अतिशय प्रभावीपणे होऊ शकतो, हा विचार यशवंतरावांनी अनेकदा आपल्या भाषणांतून अगदी हिरीरीने मांडला होता. प्राथमिक शिक्षण हे तळागाळातील आणि सर्वदूर पसरलेल्या ग्रामीण भागातील पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजनसमाजाला उपलब्ध करून देता आले तरच भारतीय लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजतील अशी यशवंतरावांची प्रामाणिक धारणा होती. भारताच्या राज्यघटनेत वयाच्या चौदा वर्षांपर्यंत सर्वांना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिले जावे अशा एका मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. हे मार्गदर्शक तत्त्व सर्व राज्यांच्या शैक्षणिक धोरणाचे एक अविभाज्य अंग आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला की माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षणही विकास पावते यात शंका नाही. तेव्हा अशा ह्या पायाभूत प्राथमिक शिक्षणाला यशवंतरावजींनी अनन्य साधारण महत्त्व दिले होते. लोकशाहीची मुळे खोलवर रुजविण्याची असतील आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षणप्रसाराचे कार्य शासनाला प्रचंड प्रमाणात हाती घेणे भागच होते आणि आहे.
यशवंतरावांनी अलिगढ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभप्रसंगी केलेल्या दीक्षान्त भाषणात या संदर्भात पुढील विचार मांडला होता : ''शिक्षणप्रसार ही प्रौढ मतदानपद्धतीबरोबर येणारी गोष्ट असून प्रौढ मतदानपद्धती लोकशाही राज्यकारभाराचा पाया आहे. म्हणून, आपल्या नवजात लोकशाहीची मुळे खोलवर रुजविण्याच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास साहजिकच राजकीय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्या प्रचंड मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढविण्यासही त्याची पुष्कळच मदत होऊ शकेल. तसे झाल्यास आर्थिक क्षेत्रातही त्याचे इष्ट असे परिणाम घडून येतील. शिवाय शिक्षणाच्या या प्रसारात संस्कृतीच्या प्रसाराची बीजे साठलेले असून त्यामुळे मानवी मूल्ये व ध्येय आम जनतेच्या आवाक्यात आणणे शक्य होणार आहे.''१७ शिक्षणप्रसाराकडे बघण्याची यशवंतरावजींची दृष्टी किती व्यापक आणि अर्थपूर्ण होती हे त्यांच्या या शब्दांतून व्यक्त होते. शिक्षणप्रसाराला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते व असले पाहिजे. शिक्षण हे आपल्या समोर राजकीय अधिकारांचे, आर्थिक विकासाचे आणि सांस्कृतिक संपन्नतेचे दरवाजे उघडीत असते आणि म्हणून जगातील कुठल्याही राष्ट्राला व समाजाला शिक्षणाकडे पाठ फिरविता येत नाही. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, विषमतेच्या दलदलीत रुतून बसलेल्या आणि जातिजातीत चिरफळलेल्या समाजाला तर शिक्षणाशिवाय प्रगतीचा विचार करणे शक्य नाही.
प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा वस्तुतः या दिशेतील पहिले पाऊल ठरते. पुढचा मार्ग माध्यमिक आणि उच्च शिक्षणाशिवाय सापडणे कठीणच, विशेषतः माध्यमिक शिक्षणाच्या सोयी व सवलती जनसामान्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असा यशवंतरावांचा आग्रह होता. कारण माध्यमिक शिक्षण हा एकूण सर्व शिक्षणाचा गाभा असतो. माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रांत पदार्पण करतात. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यातून विविध व्यवसायांसाठी आवश्यक असणारे आणि उच्च शिक्षणाच्या विविध शाखांना जोडणारे मार्ग निघतात. शिक्षणातला एक महत्त्वाचा व स्वतंत्र असा टप्पा म्हणून आणि त्याचबरोबर त्याच्या इतर टप्प्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून माध्यमिक शिक्षणाकडे पाहणे आवश्यक ठरते आणि म्हणून माध्यमिक शिक्षणात विविधता आणि उपयुक्तता आणणे आवश्यक आहे, असा यशवंतरावजींचा आग्रही सल्ला होता. ''माध्यमिक शिक्षणात ही विविधता आपण आणली नाही तर त्याच्या उपयुक्ततेसंबंधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन माध्यमिक शिक्षण ही एक डोकेदुखी निर्माण करणारी गोष्ट ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.''१८ माध्यमिक शिक्षण हे अर्थपूर्ण व सर्वस्पर्शी असले पाहिजे.
-------------------------------------------------------------------
१७. 'लोकशाही शक्तीचा प्रभावी आविष्कार', सह्याद्रीचे वारे, पृ. १५३.
१८. 'माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व', युगांतर, पृ. १६७.
-------------------------------------------------------------