यशवंतराव चव्हाण हे सर्व करू शकले याची अनेक कारणे आहेत. ही कारणे जशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत, तशीच ती त्यांच्यावर झालेल्या थोर संस्कारात आहेत. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अतिशय अवघड परिस्थितीत त्यांना घ्यावे लागले. पण ही अवघड परिस्थितीच त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीत उपयोगी ठरली. स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रकारची कामे करताना अनेक खेड्यांत जाण्याची आणि ग्रामीण जीवन अधिक जवळून पाहण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. अनेकांचा दाट परिचय झाला. किसन वीर यांच्यासारखे अनेक सहकारी त्यांना या कलातच लाभले. सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यांच्या परिसरातील अनेकांचे त्यांच्याशी दृढ नाते याच काळात जुळले. स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व विशद करताना विविध स्तरावर ज्या चर्चा कराव्या लागत त्यातून त्यांच्या विचारांना धार आली. गरीब शेतकर्यांच्या अनेक प्रश्नांची जाणीव झाली. या जाणिवेतून त्यावर उत्तरे शोधण्यासाठी सतत चिंतन करण्याची सवय जडली. म. गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वेगळेपण समजावून सांगताना आणि म. गांधींची विचारसूत्रे ग्रामीण जनतेला पटवून देताना त्यांना अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची सवय जडली. शालेय व महाविद्यालयीन जीवनात जोपासलेली ज्ञानपिपासा त्यांच्या मदतीला आली. सॉक्रेटिस, प्लेटो यांच्यापासून ते कार्ल मार्क्सपर्यंत 'स्वातंत्र्य' या संकल्पनेची झालेली मीमांसा आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर अस्तित्वात आलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये स्वदेशी व स्वराज्य चळवळीचे आधार आहेत हे लोकांना पटवून देणे आवश्यक आहे असे त्यांना पटले. प्राचीन भारतातील उज्ज्वल परंपरा आणि आर्य चाणक्यासारख्या महापंडिताने आर्थिक जीवनातील इतर क्षेत्रांत सांगितलेली विविध प्रकारची विश्लेषणे त्यांनी काळजीपूर्वक अभ्यासिली. मानवेंद्रनाथ रॉय, लक्ष्मणशास्त्री जोशी, धनंजयराव गाडगीळ यांच्या सहवासातून आणि त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून स्वातंत्र्योत्तर भारतात काय केले पाहिजे याची तात्त्वि बैठक अनेक विषयांच्या अभ्यासचिंतनातून त्यांना नक्की करता आली. अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी स्वतःला घडवले, आणि महाराष्ट्राची बुद्धी शक्तिशाली झाली पाहिजे व शक्ती बुद्धिशाली झाली पाहिजे यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
यशवंतराव चव्हाणांचे साहित्यप्रेम, त्यांचे नाटकवेड, त्यांची संगीतप्रीती ही एक नितांत सुंदर घटना आहे. इंग्रजी मराठीतील कथा, कादंबरी, कविता त्यांनी आधाश्यासारखी वाचून काढली होती. शेक्सपियर आणि कालिदास त्यांनी काळजीपूर्वक अभ्यासिला होता. सततचे वाचन व विद्वानांचा सहवास हाच त्यांनी आपल्या जीवनातील विरंगुळा मानला होता आणि म्हणून त्यांची वैचारिक बैठक पक्की झालेली होती. रॉय यांच्या विचाराचा त्यांच्यावरील परिणाम ते पुढे सत्तेवर आल्यावर त्यांनी जे अनेक पुरोगामी कायदे केले त्यात जाणवतो आणि तर्कतीर्थांच्या संस्कार-सहवासाच्या परिणामातून महाराष्ट्राची बौद्धिक पातळी उंचावली पाहिजे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा शोध लागतो. बुद्धिमत्ता आणि ज्ञान ही शहरी लोकांची मक्तेदारी नाही हे ग्रामीण भागात फिरताना शिक्षण नसतानाही जी बुद्धिमान माणसे त्यांना भेटली त्यांचेशी झालेल्या चर्चेतून ते समजून घेऊ शकले आणि एक अपूर्व नेतृत्व ते उपलब्ध करून देऊ शकले.
चीनच्या आक्रमक युद्धप्रसंगी संरक्षणमंत्रिपदी त्यांना एक फार मोठे आव्हान स्वीकारूनच जावे लागले. चिनी नेतृत्वाशी केलेल्या कराराच्या प्रभावात असलेल्या नेहरूंना या आक्रमणामुळे जो मानसिक धक्का बसला, त्या धक्क्यातून त्यांना सावरून घेऊन विस्कळित झालेली संरक्षण आघाडी पुन्हा एकदा नीट बांधण्यासाठी त्यांना पराकोटीचे परिश्रम घ्यावे लागले. १९६५ च्या भारत पाक संघर्षात, यशवंतरावांनी केलेली संरक्षण खात्याची पुनर्बांधणी समर्थ ठरली. त्या युद्धात आपले सैन्य विजयी होऊ शकले याचे फार मोठे श्रेय, यशवंतरावांनी संरक्षणखात्यास दिलेल्या प्रेरणांस, योजकतेस आणि पुनर्बांधणीस द्यावे लागेल. या मंत्रिपदाच्या काळात त्यांचे दैदीप्यमान नेतृत्व देशभर प्रभाव पाडणारे ठरले.