विदेश दर्शन - १६९

८४ कोलंबो
१९ ऑगस्ट, १९७६

सकाळी ९ वाजता युगोस्लाव्हियाचे विदेशमंत्रि आले. तासभर होते. अल्जीअर्समध्ये आम्ही रुमानिया वगैरे राष्ट्रांबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेस विरोध केला असल्यामुळे इतर बाबतीत चर्चा सुरू झाली.
प्रमुख प्रश्नाला ते हातच लावत नव्हते. शेवटी मार्शल टिटोंच्या मुलाखतीचा मी उल्लेख केला. 'ऑब्झर्वर्सं स्टेटस् चा आग्रह न धरण्याच्या त्यांच्या नव्या धोरणाचे स्वागत केले आणि ज्या दिशेने ते काही पावले पुढे चालून आले आहेत त्या दिशेने आम्ही सहकार्याची भूमिका जरूर घेऊ असे म्हणताच खुलले. पुढे पुष्कळ मनमोकळी चर्चा झाली.

भूतानचे विदेशमंत्रि आले. त्यांच्या राज्याच्या भाषणाचा 'ड्राफ्ट' घेऊन आले होते. उपयोगी चर्चा झाली. महमद युनुसने, दरम्यान श्री. बुटिप्लिकांना फोन करून आम्ही भेटावयास येतो असे कळविले. ते परिषदेचे सध्याचे अध्यक्ष. तेव्हा मी त्यांच्याकडे जाणे बरे असे ठरविले.

परंतु तो मोठा खानदानी माणूस आहे. फोन पोहोचताच तेहून आमच्याकडे तातडीने आले. तुम्ही कामाने व वयाने ज्येष्ठ आहात, आणि आमच्या संस्कृतिप्रमाणे मी तुमचेकडे येणे युक्त होते म्हणून आलो असे सांगून जवळ जवळ दीड तास बसले होते. परिषदेच्या कामासंबंधी व वेस्टर्न सहाराबाबत विशेष बोललो.

रुमानिया, फिलिपाइन्सबाबत आम्ही गेस्टचे स्टेटस् मान्य करणार आहोत हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. फ्रेंच जाणणारे माझे शेजारी होते. ते त्यांच्या 'फ्रेंच' चीच फार स्तुती करीत होते.
दुपारी ४ वाजता विदेशमंत्र्यांची परिषद सुरू झाली. श्री. फेलिक्सचे नाव श्री. बुटिप्लिकाने सुचविले व काम सुरू झाले. औपचारिक काम होऊन त्या दिवसाचे काम संपले.

रात्री आशियायी विदेशमंत्र्यांना 'गॅलेफेस' मध्ये खाना दिला. १६-१७ विदेशमंत्रि आले होते. औपचारिक चर्चा झाल्यानंतर श्री. फेलिक्स भंडारनायके खुषीत होते. व्हिएतनाम, लाओस व कंबोज विदेशमंत्र्यांच्या हजेरीमुळे मी खूष झालो होतो. आजच्या जेवणाला बांगलादेशचे जनरल झिया आले होते. आजपर्यंत जे जे लोक-सरकारी व निमसरकारी-त्यांच्याबाबत भेटले होते त्यांनी त्यांचे हिंदुस्थानचा मित्र व एक सज्जन गृहस्थ असे वर्णन केले होते. मी त्यांनाही सन्मानाने वागविले व माझ्याजवळ जेवणासाठी बसवून घेतले.