३५ मॉस्को
२५ जून, १९७४
कालचा दिवस हा महत्त्वाचा गेला. वित्तमंत्र्यांशी सविस्तर बोलणे झाले. सामान्यत: आजपर्यंतच्या अनुभवावरून सोविएत रशियाच्या वित्तमंत्र्याला भारतीय प्रश्नाबाबत प्रत्यक्ष भाग घेऊन निर्णय देण्या-घेण्याची फारशी प्रथा-संधी-नसावी.
अनेक गोष्टींचा, जो मी माझ्या चर्चेत उल्लेख केला, त्याचे बारकावे आपल्याला माहीत नाहीत असे त्यांनी प्रांजलपणे सांगितले.
भारतीय - सोव्हिएट आर्थिक सहकार्य आता निश्चित व भक्कम पायावर उभे आहे. त्याची विविध क्षेत्रांत वाढ झाली आहे. त्याचा आकार (व्हाल्यूम) वाढला आहे. त्यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ते प्रश्न नव्या दृष्टीने तपासून पाहून काही धोरणात्मक निर्णय, राजकीय दृष्टिकोनातून घेण्याची तातडीची आवश्यकता आहे; हा माझा मुख्य मुद्दा होता.
येथील सर्व चर्चेमध्ये हेच मला विस्ताराने व तपशील देऊन सांगावयाचे आहे. हे आर्थिक सहकार्य अजूनही विस्तारावयाचे आहे. त्याची सखोलता व दृढता अजूनही वाढवावयाची आहे. त्यासाठी काय करणे शक्य आहे ते सांगण्यासाठी मी आलो आहे.
Composition of credit assistance and the framework of this assistance needs to be changed and softened. या दृष्टिकोनातून मी काही निश्चित सूचना मांडल्या.
दुपारी श्री. सॅचकोव्ह यांच्याशी बोलणे झाले. हे भारतात अनेक वेळा आलेले गृहस्थ आहेत. भारतीय आर्थिक संयुक्त आयोगावरील (जॉईन्ट कमिशन) सोव्हिएट प्रतिनिधी म्हणून काम करतात.
त्यांना मी माझ्या भेटीचा हेतू समजाविला. निव्वळ तांत्रिक (टेक्निकल) किंवा फक्त आर्थिक प्रश्न नसून मूलत: राजकीय प्रश्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे हे आग्रहाने सांगितले.
हे गृहस्थ काहीसे रिजिड आहेत. त्यांना माहीत असलेल्या तपशीलात गुंतून जाऊन मुख्य प्रश्नापासून दूर राहतात. दिल्लीतील झालेल्या चर्चेत मला हाच अनुभव होता म्हणून येथे मी त्यांना जरा (त्यांच्या पाहुणचाराच्या वातावरणाचा फायदा घेऊन म्हणा तर) सुनविले. रात्रीच्या भोजनप्रसंगी इतर सोव्हिएट पाहुण्यांच्या हजेरीत त्यांची माझी पुन्हा भेट झाली. तेव्हा मी त्यांचा "Very competent Technocrat" असा उल्लेख केला तेव्हा तेच थोडेसे व्याकूळ झाले. म्हणाले, टेक्नोक्रॅट शब्द येथे थोडासा टीकात्मक दृष्टीने वापरतात. म्हणजे ज्याला राजकीय दृष्टी समजत नाही असा तज्ज्ञ या अर्थानेही हा उल्लेख होतो.
तेव्हा मी हसत हसत सांगितले की, ह्या अर्थाने मी बोललो नाही. तेव्हा त्याला काहीसे बरे वाटले. पण त्याला जे समजणे जरूर होते ते तो समजला.
चारच्या सुमारास बाहेर फिरायला गेलो. क्रेमलिनच्या आवारात त्यांनी नवे डी माँड एक्झिबीशन किंवा म्युझियम तयार केले आहे. ते पहावयास गेलो.