९२ हूस्टन
९ ऑक्टोबर, १९७६
थोडा उशीरा उठून सावकाश तयार झालो. सकाळी शहरापासून २०-२५ मैलांवर असलेला नासा-स्पेस-सेंटर पाहाण्यासाठी गेलो. जगाचे आज आकर्षण असलेले हे केंद्र आहे. सर्व अंतराळवीरांचे शिक्षण येथे होते.
चंद्रावर गेलेली सर्व यंत्रे - याने, येथेच बनली. अंतराळातील सर्व प्रयोगांचे नियंत्रण येथूनच होते. हजारो वैज्ञानिक या केंद्रात काम करतात. यांत काही भारतीय वैज्ञानिकही आहेत.
आज - वर्षात ते एक दिवस केंद्र बंद ठेवतात - तो दिवस होता. तरीही केंद्रातील सर्व ठिकाणे फिरून दाखविण्याबाबत त्यांनी खास व्यवस्था केली होती.
दोन वैज्ञानिकवजा अंतराळवीर मुद्दाम हजर होते. हे केंद्र पाहण्याची माझी फार वर्षांची हौस होती ती आज पुरी झाली.
१९६१ साली प्रे. केनेडीने दहा वर्षांच्या आत मानव चंद्रावर उतरेल अशी घोषणा केली आणि ते आवाहन वैज्ञानिकांनी स्वीकारून पुरे केले. अशी विश्वाची नवी दालने खोलण्याचा पराक्रम करणारे हे कार्यक्षेत्र पाहून मन प्रसन्न झाले.
एकदोन वर्षांत आणखीन काही नवी पावले टाकण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. त्याची तयारी चालू आहे. अंतराळामध्ये लॅबॉरेटरी कायमची क्रियाशील ठेवावयाचा त्यांचा व रशियनांचा काही संयुक्त प्रयत्न होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.
सूर्यप्रकाशापासून मानवी उपयोगासाठी एनर्जी - शक्ती मिळविण्याच्या प्रयत्नासाठी अंतराळाच्या क्षेत्रात विशेष करण्यासारखे आहे असे येथे मत दिसले. त्यांचेही प्रयोग करण्याचे प्रयत्न आहेत. त्यांच्या कामासंबंधी अनेक तांत्रिक बाबी त्यांनी सांगितल्या. अर्थात् त्या सर्वच आम्हाला समजल्या असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु प्रत्यक्ष यान कसे असते, आत यंत्र-सज्जता कशी असते, तेथे कसे राहावयाचे, खाणे-पिणे व इतर नैमित्तिकांची अंतराळात असताना काय व्यवस्था असते हे सर्व त्यांनी समजाविले.
अंतराळ-प्रवास सुरू असताना पृथ्वीवरून ज्या ठिकाणाहून त्याच्या तपशीलाचे व इतर सर्व नियंत्रण होते तेथे आम्ही पुष्कळ वेळ काढला. विज्ञानाची प्रगति या देशात फार आहे. हे सर्व बऱ्याच तपशीलात पाहिल्यानंतर समाधान वाटले.