७८ इस्तंबूल
४ एप्रिल, १९७६
आणखीन एक तासाने घरी यावयाला येथून निघू. काल सकाळी १० वाजता अंकाराहून निघालो. फार लवकर उठून तयार होऊन श्री. एजिव्हिल यांना भेटण्यासाठी गेलो. ते विरोधी पक्षाचे आजचे नेते आहेत. ४७ -४८ वर्षांचे तरुण गृहस्थ आहेत.
पुरोगामी विचाराचे विचारवंत असल्याचा लौकिक आहे. हिंदुस्थानबद्दल व विशेषत: टागोर आणि पं. नेहरू यांच्याबद्दल त्यांना फार आदर आहे.
मला, त्यांना भेटण्याची इच्छा आहे हे राजदूतांना कळविले होते. तेथील सरकारी धोरणामुळे अधिकृत सर्व कार्यक्रम संपेपर्यंत ते शक्य झाले नाही. म्हणून निघण्यापूर्वी सकाळी, ब्रेकफास्टसाठी त्यांनी निमंत्रित केले होते.
गावाच्या बाहेर १०-१२ मैलांवर नवीन लहानशी वस्ती बनत आहे. त्यातल्या एका छोटया मध्यमवर्गीय अपार्टमेंट हाउसमध्ये त्यांच्या फ्लॅटवर दोन जिने चढून आम्ही गेलो.
नवरा-बायको दोघेही हसतमुख दाराशी होते. सबंध घर पुस्तकांनी भरून गेले आहे. ते तरुण विद्यार्थी असताना बंगाली शिकून टागोरांच्या गीतांजलीचे (काही गीतांचे) टर्किशमध्ये भाषांतर त्यांनी प्रसिध्द केले होते. त्याची एक प्रत त्यांनी मला दाखविली.
दोन अडीच वर्षांपूर्वी, प्रधानमंत्रि होण्यापूर्वी त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर करणे सुरू केले होते. त्यानंतर कामाच्या बोजामुळे ते बंद ठेवावे लागले होते. आता ते परत सुरू केले आहे असे ते म्हणाले.
मनुष्य मोठा उमदा वाटला. गंभीर स्वभाव - विवेचक बुध्दिवादी. प्रसंगी मनमोकळे हसणारा. एकंदरीत प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
चर्चा सुरू झाली त्यांच्या लिबियाच्या भेटीपासून. तेथून ते नुकतेच परतले आहेत. पंतप्रधान जालोदबद्दल चांगले बोलले. साधनांचा (ऑइलमनी) सामाजिक न्यायाच्या पायावरील समाज, उपयोग करणारा अरब देश असे त्यांनी लिबियाचे आशावादी वर्णन केले वा (इन्फर्मेशन) सांगितले.
नंतर ते बांगलादेशावर आले. फराकाची पार्श्वभूमी व आजचा प्रश्न आणि त्यासंबंधी एकांगी प्रचार कसा चालू आहे त्याचा तपशील मी दिला. आजही त्या देशात मूलभूत अस्थैर्याचे वातावरण का व कसे आहे यासंबंधी मी चर्चा केली.