• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - १५४

७७ अंकारा
२ एप्रील, १९७६

सकाळी ९॥ वाजता बाहेर पडलो. ९॥ ते १२ करारावर सह्या आणि उभयपक्षी चर्चा झाल्या.

चर्चेला बसण्यापूर्वी श्री. चलियांजिलशी मी खाजगी भेटून पाकिस्तानला टर्कीकडून होणाऱ्या शस्त्र-सहाय्याबाबत तपशीलवार बोलून मैत्री वाढविण्याच्या इच्छेची कसोटी, ही गोष्ट ठरविणार आहे हे स्पष्ट केले.

त्यांनी आपली शस्त्रे आपण त्यांना देत नाही असे सांगितले. पण भविष्याबाबत आपल्या पंतप्रधानांशी, आमची भावना व हितसंबंध काय आहेत ते चर्चा करून स्पष्ट करू असे आश्वासन दिले.

फ्लेनरीमध्ये झालेल्या चर्चेत पूर्वी उल्लेख केलेले मुद्दे तपशीलाने मांडले. मी आमची धोरणे मागचा विचाराचा धागा धरून पुढे आणखीन तासाभराच्या बोलण्यात स्पष्ट केली. दुपारनंतर म्युझियम पाहिले. अनातोलियाने अनेक संस्कृतींचा उदय - अंत पाहिला आहे. त्याचे अवशेष या म्युझियममध्ये आहेत. तास-दीडतास यामध्ये गेला.

संध्याकाळी श्री. एन्. बी. मेननच्या घरी रिसेप्शन होते. अंकारातील प्रसिध्द पत्रकार, संपादक, लेखक आणि विश्वविद्यालयांतील आचार्य मंडळी आणि विदेशमंत्रि व त्यांचे अधिकारी एवढेच बोलाविले होते. नेहमी दिसणारा 'डिप्लोमॅटिक-क्राऊड' बोलाविलाच नव्हता. त्यामुळे औपचारिकता कमी होती. स्थानिक मंडळींना भेटता-बोलता आले.

श्री. चलियांजिलनी आज पुन्हा रात्री जेवण दिले. हे अनौपचारिक होते. आमच्या डेलिगेशनचे लोक आणि त्यांचे निवडक अधिकारी असे फक्त १५-२० जण असू. जेवणाला पार्श्वभूमी - पियानो, व्हायोलिनच्या वादनाची होती. प्रसिध्द वादक निमंत्रिले होते. जेवणानंतर अंकारातील प्रसिध्द गायिकेने काही गाणी म्हटली. पश्चिमी संगीताचीही पकड तुर्कस्तानवर आहे. याची जाणीव झाली.

त्यानंतर मात्र ऐन तुर्कस्तानी लोकनृत्याचा जो कार्यक्रम झाला तो अगदी संस्मरणीय झाला. चार तरुण मुले व मुली यांचा हा संच कुठेही गेला तरी नाव कमवील. त्यांच्या नृत्यात ग्रेस होती. कल्चर, व्हिगर, ऱ्हिदम सर्व काही होते.

त्यांच्या नृत्यातला माझ्यावर परिणाम करून गेला एक तीन-चार मिनिटांचा अॅटम् - शेख सलामची प्रार्थना असे काहीतरी नाव होते. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणे!

शेख सलाम हा त्यांचा आवडता योध्दा होता. तो रशियाशी (झारच्या) अनेकवार धैर्याने लढला, पण शेवटी हरला. लढाईत कामी आला.

त्यानंतर तुर्क जनतेने त्याच्यासाठी अखेरची प्रार्थना केली. हे नृत्य त्याचे प्रतिकात्मक आहे. चार मुली एका पाठोपाठ फार ग्रेसफुली येऊन प्रार्थनेसाठी (नमाजीसाठी) येऊन ज्या तऱ्हेने बसतात ते आणि त्याच वेळी त्यांची वाद्ये जे सूर साथीला देत होते त्यांतील आर्तता, मी क्वचितच अनुभवली होती.

या आर्ततेच्या मूडमध्येच मी निरोप घेतला. तुर्की अगत्य आणि अतिथ्य यांचा आज खरा अनुभव आला. मोठे षोकी लोक! त्यात शालीनता होती आणि दर्जेदारपणाही. सकाळी ७ वाजता काम सुरू करावयाचे असल्यामुळे ११ वाजताच दिवस संपविला. लिहिणे बरेच लांबले. पुढचे इस्तंबूलहून.