१५. काळ्या तांबड मातीचा, तिळा दगड धोंड्याला, आम्ही भरला मरठ, हिरव्या बिलोली झाडांना
कवी ना. धों. महानोर
ख्यातनाम कवी आणि शेतीप्रबोधनातील क्रियाशील कार्यकर्ते,
मु. पो. पळसखेडा (अजिंठा)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाणी प्रश्नाला अग्रक्रम दिल्याशिवाय भारताच्या भूमीवर चांदणे जोंधळ्यावर येणार नाही. आणि आर्थिक व सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या परिस्थितीमध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न ज्या पद्धतीने बदलत गेले आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे आजच्या बदलत्या परिस्थितीत पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर त्यातील सात वर्षे दुष्काळाची गेली. ही एकीकडे असलेली दुर्दैवाची परिस्थिती आणि दुसरीकडे तालुक्यांची आणि जिल्ह्यांची वाढणारी संख्या. या सर्वांचा विचार केला, तर जे पाणी आहे, त्याचा वापर कसा करायचा याचा विचार आपण केला पाहिजे.
गेल्या काही वर्षांची परिस्थिती आपण विचारात घेतली तर, विशेषतः १९६४, १९७०, १९७१ आणि गेल्या वर्षी म्हणजे १९८३-८४ या काळामध्येही, पाण्यासाठी हाकाट्या माराव्या लागल्या. माणसे, जनावरे आणि एकूण संबंध जीवनच पाल्यापाचोळ्यासारखे झाले. अशा अवस्थेमुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून खेड्यातल्या एखाद्या गावापर्यंत सर्वजण व्याकुळ झाले होते. सार्या देशात थोड्या फार फरकाने हीच परिस्थिती होती.
यंदा महाराष्ट्रात १९८६ साली आतापर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे ६० टक्के पेरण्या अजून पर्ण व्हावयाच्या आहेत. पावसाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली तीन नक्षत्रे निघून गेली. मृग, रोहिणी आणि आद्र्रा या पावसाच्या महत्वाच्या नक्षत्रांमध्ये पावसाला थोडा जरी उशीर झाला, तरी लगेच एकरी उत्पादन कमी येते. कोठेतरी नाशिक, नगर, अमरावतीला थोडाफार पाऊस पडला हा भाग वेगळा, तेव्हा लहरी दारूड्यासारखे हे पावसाचे रूप झाले आहे. तीन पावसाची नक्षत्रे कमी झाल्यामुळे शासन, शेतकरी आणि ज्यांना ज्यांना या विषयाची आच आहे त्यांच्या दृष्टीने हा पाण्याचा प्रश्न अतिशय चिंतेचा बनलेला आहे.
दुष्काळाच्या निमित्ताने आपण 'पाणी अडवा-पाणी जिरवा' मोहीम हाती घेतली. यामागे एक चांगला दृष्टिकोन आहे हे तर मान्यच केले पाहिजे. पण महात्मा फुले यांनी आपल्या शेतकर्याचा असूड लेखामध्ये १८८३ साली महाराष्ट्राला ह्या मोहिमेचा मंत्र दिला होता. म्हणजे आज त्या गोष्टीला १०० वर्षे होऊन गेली. एवढे आपण मागासलेले राहिलो. पाणी अडविण्याचे तंत्र त्याच वेळी त्यांनी सांगितले होते. तरीही आज इतक्या वर्षांनी का होईना आपण त्याचा विचार करावयाला पुढे आलो आहोत, ही गोष्टही कमी नाही.