महाराष्ट्रातील दुष्काळ - ७४

१०.  'रोहयो'तून पाणी जिरवा कार्यक्रम घ्यावा

श्री. चिं. भो. डोसे
प्रागतिक शेतकरी, जस्तगाव
(जि. बुलढाणा)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेती उत्पादन वाढीसाठी उपाय म्हणजे झाडे लावणे, जगवणे, ह्यांमुळे भूगर्भात पाणी साचेल.  आकाशातूनही पाणी पडेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्यात दुष्काळाने अतिशय थैमान घातले आहे.  त्या थैमानात खेड्यातील जनता अस्मानी सुलतानीच्या तडाख्यात सापडली आहे.  त्यामुळे शेतीवर उपजीविका करणार्‍यांचे मनोधैर्य खचून जाऊन कार्यशक्ती नष्ट होऊ पाहत आहे.  आज महाराष्ट्रात जो शेती व्यवसाय कर्जापोटी पोसला जात आहे.  शेतीधारकाची क्षमता कर्ज फेडण्याची नसल्यामुळे आता शेतीत अधिक उत्पादन तो कसे काढील हा प्रश्न उभा आहे.  सतत दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍याने स्वकष्टने ओलिताखाली आणलेले ६.५ टक्के क्षेत्र संपुष्टात येत आहे.  हे वाचविण्यासाठी रोजगार हमी योजनेमार्फत पाणी अडवा आणि जिरवा ह्या कार्यक्रमाला अग्रक्रम देणे जरूरीचे आहे.  पाणी अडविले आणि ते पाणी जिरविले तर त्यांचे परिणाम खालीलप्रमाणे दिसतील असे मला वाटते.

१)  अडविलेले पाणी पावसाळा संपल्यावर चार महिने जर जिरत राहिले तर विहिरीमध्ये पाण्याचा साठा वाढेल.
२)  नैसर्गिक झाडांची उगवण होऊन पूर्वीच्या उगवलेल्या झाडांची वाढ होईल.
३)  झाडांची अतिशय दाटी झाली की भूगर्भातील पाण्याचा साठा वर येऊ लागेल.
४)  ही झाडे पावसांच्या ढगांना अडवून पाणी पाडतील.
५)  मजुरांना पांच किलोमिटरच्या आत काम मिळेल.  रोजगार हमीचे काम करीत असताना यंत्रणेकडून असे व्हावयास नको की अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही.  तसेच आज महाराष्ट्र सरकारचा झाडे लावण्याचा सारखा सपाटा चालू आहे.  पण झाडांची तोड ही त्याच प्रमाणात चालू आहे असा भास होत आहे की महाराष्ट्र सरकारचे झाडे आणि जंगल रक्षणाचे जे कायदे आहेत त्यांची पाने फाटून उडून गेली आहेत.

दुसरे असे की, मी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात राहत आहे.  संग्रामपूर तालुक्याच्या दखिण बाजूने पूर्णा नदी वाहात आहे.  जळगाव तालुक्यातील भेंडवडपासून पूर्वेकडे पंचगव्हाण २५ मैल अंतरावर आहे.  तर पूर्णा नदीचे पात्र उत्तरेस चार मैल रुंद आणि दक्षिण भेंडवड ते पंचगव्हाण २५ मैल लांब ह्या पट्ट्यात १९८० पासून फार पाणी कमी पडत आहे.  त्याचे कारण लक्षात येत नाही.  ह्या पट्ट्यात पूर्वी २५ ते ३० इंच पाऊस पडत होता.  तो आता पडत नाही.  ढग येतात नि जातात.  ह्या भागात झाडे ही आहेत.  ह्या पट्ट्यातील जमिनीची पाऊस पाडण्याची कुवत कमी झाली किंवा काय ?  शास्त्रज्ञाकडून अशा पट्ट्याची पाहाणी करणे अतिशय जरूरीचे आहे.