९. कोकणची शेती कसेल त्याला द्यावी
राजाभाऊ मिराशी
माजी आमदार आणि कोकणातील शेती प्रश्नाचे जाणकार
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाण्यात पिण्याचे, वापराचे व शेतीचे हे भेद अपेक्षित आहेत. कोकणातही शेती खार्या पाण्यावरही करण्याचे प्रयत्न व्हावेत. सर्वकाळ शेती होईल हे पाहावे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
''या ठिकाणी 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा' या विषयावर चर्चा सुरू आहे. ह्या प्रश्नाशी संबंधित जो भाग आतापर्यंत चर्चेमध्ये आलेला नाही, तो मी या ठिकाणी उपस्थित करतो आहे.
सध्या हे जग एक निराळ्या दृष्टिकोनांतून विविध प्रश्नांकडे बघू लागलेले आहे. शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन, प्रयोग करून त्यांची विश्वासार्हता विचारात घेऊन विविध नवे मार्ग मान्य होत आहेत. परंतु हे अजून समजू शकले नाही की चर्चा फक्त गोड्या पाण्याची का होत आहे ? आकाशातून पाणी पडते धरतीवर, व धरतीवरून ते समुद्रात जाऊन मिळते, त्याचीही चर्चा का होत नाही ? ज्या ठिकाणी पाणी साठवले जात नाही, तिथे ते वायाच गेले आहे !
येथे कुणी तरी सांगितले की एका देशामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवताना त्यांनी पिण्याचे पाणी, स्वच्छतेचे पाणी आणि इतर वाया जाणारे सांड पाणी असे तीन प्रकारचे, पाणी प्रकल्प तयार केलेले होते. आणि त्या तिन्ही प्रकारचे प्रकल्प तयार करून त्यांनी शहरी भागांचा प्रश्न कौशल्याने सोडवला.
झोपड्यांचा व गरिबांच्या प्रश्नांचे स्वरुप येथे मांडण्यात आले आहे.
योग्य माणसे योग्य वेळी बोलतील तर विकासाच्या कामाची गती कोणत्याही परिस्थितीत वाढल्याशिवाय राहणार नाही.
दलाली निपटून काढायला पाहिजे
मी यशवंतरावजींच्या प्रत्यक्ष विचारांची आठवण येथे करून देऊ इच्छितो. कोल्हापूरच्या शेतकर्यांचा मेळावा होता. शेतकर्यांची दिंडी आली होती. यशवंतरावजी त्या शेतकर्यांच्या मेळाव्यापुढे आले. ते सत्तेवर होते. त्यावेळी काही शेतकर्यांनी त्यांच्यापुढे प्रश्न उपस्थित केले. तेव्हा यशवंतरावजी म्हणाले की, जागतिक बँकेकडून शेतकर्यांच्या मदतीसाठी व उद्धाराच्या कार्यक्रमासाठी ४ टक्के दराने कर्ज दिले जाते. परंतु ते माझ्या शेतकर्यांच्या हाती पडेपर्यंत १२-१३ टक्क्यांपर्यंत वाढवले जाते. ८-९ टक्के ही मधली दलाली असते ! ही दलाली केव्हातरी निपटून काढली पाहिजे. आणि नष्ट केली पाहिजे. संपवली पाहिजे. असे त्यावेळेला यशवंतराव म्हणाले होते.
दलाली नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. ती झाली नाही. ही प्रक्रिया कुणी तरी सुरू करायला पाहिजे. नियोजन मंडळे ठेवून किंवा चर्चा करून ही दलाली नष्ट होत नाही ! सत्ताधार्यांनी जर या दलालीचा विचार केला तर तो प्रश्न सहज सुटू शकेल. परंतु सत्ताधारी केवळ स्वतःला सोयीस्कर गोष्टी अमलात आणतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनांतून मिळणारा इशारा सत्ताधारी लक्षात घेणार नाहीत. गरजवंतांच्या समस्या उकलण्यासाठी संशोधनाचा आधार घेतलेला नसतो. त्यामुळे गरजवंत आणि गरीब मात्र उपाशी राहातो ! गरज भागविणारी निर्मिती व्हायला पाहिजे, ती पण होऊ शकत नाही. धरणे बंधारे होत नाहीत. आणि काही प्रश्न असोत, इतर कुठल्याही योजना असोत, त्या कार्यान्वित होऊ शकत नाहीत. परिणामी, आजची अवघड परिस्थिती उद्भवलेली आहे. तुम्ही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तुम्ही सत्ताधारी म्हणून घेणार आहात की लोकांसाठी तो भाग उपयोगी बनवण्यासाठी व त्यांची गरज भागवण्यासाठी म्हणून निर्णय घेणार आहात ?