खेड्यापाड्यामध्ये अलीकडे एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळते. समजा दोन शेतकर्यांचा शेजारी शेजारी विहिरी आहेत. कुणीतरी पाणी कमी पडले की तो त्या ठिकाणी बोअरिंग करून पन्नास फूट खोल होल घेतो. पन्नास फूट खोल होल घेतल्यानंतर त्याला चांगलं पाणी लागले की तो आणखी चांगली बागायत करण्याच्या मागे लागतो. त्यावेळी शेजार्याच्या लक्षात येत असते की त्याचे पाणी कमी झाले. माझे पाणी कमी झालेले आहे ह्याचे महत्वाचे कारण असे की शेजारी कुणीतरी ५० फूट बोअरिंग केलेले आहे. वरताण म्हणून पहिला शेतकरी दुसर्या बोअरिंगवाल्याला पकडतो. त्याच्याकडून ५० फुटाच्या ऐवजी ७० फुटावर बोअरिंग घेतो. परिणामी ज्यांनी ५० फुटावर बोअरिंग घेतलेले असते त्याला जाणवते की आपल्या विहिरीचे पाणी कमी झालेले आहे. अशाप्रकारची एक भयानक जीवघेणी स्पर्धा खेड्यापाड्यामध्ये चालू झाली आहे.
चुकीची भांडवली गुंतवणूक
भांडवली गुंतवणूकही चुकीच्या पद्धतीने केली जात असल्यामुळे आणि हा उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत आलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नावर उत्तर शोधायचे असेल तर ते हे की परिसरामध्ये पडणारे पावसाचे थेंब न थेंब पाणी जमिनीत कसे साठवले जाईल याची खबरदारी घेणारा कार्यक्रम राबवणे. ह्यासाठी फार प्रभावी उत्तर पूर्वीच्या काळी झाडे, झुडपे निवडुंगाची बेटे अशा गोष्टीमधून आपल्याला शेतामध्ये बघायला मिळत असत. डोंगरावरून उतारावरून झाडे असायची, गवताची बेटे असायची. आता आपल्या सगळ्यांच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी जमिनीपासून मोकळ्या झालेल्या आहेत.
पावसाचे एकदा पाणी सुरू झाले की ते पाणी उतारावर येते, ते सरळ जमिनीचा पापुद्र्यामधून वरून खाली उतारामध्ये जाते. तेथून ओघळीतून, ओढ्यातून, नदीतून ते वाहत राहते. सध्या आपण सगळीकडे नदीची पात्रे. पावसाच्या गढूळ पाण्याने भरून चालली आहेत. पाणी तर खाली निघून जाते आहे. त्या पाण्याबरोबर अतिशय कष्टाने जोपासलेला जमिनीवरचा मातीचा थरसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाहून जातो आहे. डिसेटींग सारखे काही प्रश्न अनेक ठिकाणच्या धरणांच्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना सोसावे लागतात. आणि म्हणून अधिक गतीने पाणी वाहून जाण्यासंबंधीचे, मातीसह जे काम आहे ते वेळीच कुठेतरी आपण थांबवले नाही तर त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर भोगावे लागल्याशिवाय राहणार नाहीत.
या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करावयाचा आहे आणि तो म्हणजे रोजगार हमी आणि साक्षरता यांचा संबंध आपल्याला कुठे जोडता येईल काय ? आज महाराष्ट्रामध्ये ५६ टक्के लोकांना लिहिता वाचता येत नाही. देशातले प्रगत राज्य असे आपण स्वतःला म्हणवितो, तथापि फक्त ४३ टक्के लोक आपल्या राज्यात साक्षर आहेत ! हे चित्र चांगले नाही. त्यातही साक्षरतेचे प्रमाण स्त्रियांमध्ये अतिशय कमी आहे. त्यामुळे हे जर चित्र बदलायचे असेल तर या रोजगार हमीमध्ये एकत्रित झालेल्या वर्गाला साक्षर करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासाठी आपण त्यांना जवळून एखादा कार्यक्रम देऊ शकतो काय, याचाही विचार करावा लागेल. ज्या समाजातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर लिहितावाचता येत नाही आणि विशेषतः ज्या समाजातील स्त्री ही ज्ञानापासून शिक्षणापासून पूर्णपणे बाजूला राहिलेली आहे. किंवा ती आपण ठेवलेली आहे त्या समाजामध्ये कितीही भांडवली गुंतवणूक आपण केली तर त्या समाजाचा चेहरा आणि त्या समाजातले घर कधी बदलणार नाही. म्हणून त्यासाठी ह्याही प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल.
राज्याच्या विविध परिसरातल्या ह्या प्रश्नांसंबंधी आस्था असलेले आपण सर्व सभासद पाणी वापर प्रश्नामध्ये सहभागी असल्यामुळे या सगळ्या कामाला एक प्रकारचा उठाव येईल आणि या योजनेमागची आपणा सर्वांची आणि समाजाची अपेक्षा आहे त्याची पूर्तता सुरू झालेली प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या विचार विनिमय शिबिराचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संपवितो.
महाराष्ट्र राज्य - अवर्षणप्रवण विभाग (पीकबुडीचे प्रमाण) तालुकानिहाय
नकाशा नं ३ - (नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा)