ऋणानुबंध (161)

त्यांचे एक स्वप्न, जे त्यांनी आपल्या एका भाषणात सांगितले होते. ते मला आठवते. ते सांगतात, की मला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात मी मंदिरात गेलो नाही, तर ग्रंथागारात गेलो. ग्रंथागारात मला काही वाचावयाचे होते. माझ्या मनात होते, की भासाचे 'उत्तररामचरित' वाचावे व व्हिक्टर ह्यूगोची 'ला मिझरेबल' वाचावी. हे ग्रंथ शोधण्यासाठी मी चाललो असताना पाठीमागून मला आवाज यायला लागला. पाठीमागे वळून पाहतो, तो राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे अनेक शास्त्रे मला त्यांच्याकडे बोलावू लागली. मागे न फिरता तसाच पुढे गेलो. मला जे ग्रंथ हवे होते, ते शोधले, त्यांनी पुढे सांगितले, की त्यांना फडक्यांचा आवाज ऐकू आला. अत्र्यांचा आवाज ऐकू आला. आचार्य अत्रे व प्रा. फडके बोलले. पुष्कळ हशा व टाळ्या झाल्या. त्यामुळे एकाएकी ते जागे झाले. त्यांनी पुढे विचार मांडला, तो असा, की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र कमी महत्त्वाचे विषय नाहीत, पण राज्यशास्त्र आणि ललित वाङ्मय यांना एकाच तराजूने तोलू नका. प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. मला वाटते, त्यांनी हा एक महत्त्वाचा विचार सांगितला आहे. प्रत्येक शास्त्राचे एक वेगळे महत्त्व आहे. व्यक्तिश: मी असे मानतो, की शेवटी माणुसकीचे शास्त्र समजल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. त्याशिवाय लेखकाला आपल्याच अनुभूतीचा अर्थ समजणार नाही. मन अभिव्यक्ती कसली करणार? समाज-जीवनाच्या आधाराशिवाय सर्व शास्त्रे अधुरी राहतील; आणि म्हणून सामाजिक आशय असल्याशिवाय वाङ्मय परिणामकारक होत नाही, चिरस्थायी होत नाही व अक्षयही होत नाही.

खांडेकरांचा आज इथे सन्मान करण्यात जो आनंद व अभिमान वाटत आहे व ज्या कृतज्ञतेचा उल्लेख केला, ती कृतज्ञता यासाठी. कला ही जीवनाभिमुख असली पाहिजे, हा विचार तीस -पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा थोर पुरुष आपल्यापुढे बोलतो आहे. कधी कुणी त्यांचे ऐकले, कधी ऐकले नाही; आणि आज एका अर्थाने त्या विचारांना मान्यता प्राप्त झाली आहे. ललित लेखकाजवळ भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा असली पाहिजे. ज्याला हा वेध घेणारी दृष्टी नाही, त्याला ललित लेखक कसे म्हणावयाचे? हा खरा प्रश्न आहे.

खांडेकरांच्या रूपाने मराठी साहित्याला ही भविष्यवादी दृष्टी आहे, हे स्पष्ट झाले आहे. जर या प्रतिभावान लेखकाचे विचार तामीळनाडूच्या माणसाला समजतात, काश्मिरी माणसाला समजतात, तर ते जगातील कुठल्याही भाषेतील माणसाला समजणे शक्य आहे. अशा प्रतिभावान लेखकाचे विचार इंग्रजीसारख्या भाषेत मांडले गेले असते, तर कदाचित त्यांना 'नोबेल प्राईज' मिळाले असते; आणि नोबेल प्राईज मिळविणारा फार मोठा लेखक मानण्याची प्रथा आहे. उगीचच बोलावयाचे, म्हणून मी हे बोलत नाही. पण नोबेल प्राईज मिळविणा-या कोणत्याही साहित्यिकापेक्षा खांडेकर योग्यतेने एक तसूभरही कमी नाहीत, असे मला वाटते. आम्हाला अतिशय अभिमान व आनंद आहे, की मराठीत एवढ्या तोलामोलाचा हा थोर प्रतिभावान लेखक निर्माण झाला आणि आज तो आमच्यात हजर आहे. आज त्यांचा सत्कार आम्ही आमच्या हातून करीत आहोत. डोळ्यांनी पाहत आहोत. यापेक्षा आणखी आनंदाचे क्षण काय असू शकतील?
छत्रपती प्रतापगडावरील संकटावर मात करून जेव्हा परत आले, तेव्हा जर आपण त्यांना भेटलो असतो, तर तेव्हा आपणांस कसे वाटले असते? कर्तृत्ववान माणसाचे पोवाडे ऐकण्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष पाहण्यात एक वेगळा आनंद असतो. आजचा प्रसंग तसाच आहे. 'ययाति'च्या रूपाने मराठी प्रतिभेने उच्चारलेला विचार भारताने सन्मानला; आणि ती प्रतिभा मूर्तिमंत आज आमच्यासमोर बसली आहे. हा प्रसंग अनुभवायला मिळतो आहे, याच्यापेक्षा आणखी आनंदाचा दुसरा क्षण कोणता?