गाडगीळांमध्ये एक प्रकारची अलिप्तता होती, पण त्या अलिप्ततेत अलगपणाची भावना नव्हती. म्हणून निरक्षर लोकांशी, अडाणी समजल्या गेलेल्या शेतक-यांशी किंवा सर्वसाधारण कार्यकर्त्यांशीही ते समरस होऊन वागत. त्यांनी सहकारी संस्था उभारल्या, चालविल्या व त्यासाठी लागणारे सुजाण नेतृत्व स्वत:च निर्माण केले व आपले आर्थिक विचार व सिद्धान्त यांची एक प्रयोगशाळा महाराष्ट्रात निर्माण केली. म्हणून गाडगीळ हे नुसते आर्थिक तज्ज्ञ नव्हते, तर ते निर्माते होते. कोणतीही निर्मिती करण्यासाठी लागणारे चातुर्य, कौशल्य, दूरदृष्टी व संघटनकौशल्य गाडगीळांनी दाखविले. म्हणून गाडगीळ आधुनिक महाराष्ट्राचे द्रष्टे पुरुष, तत्त्वचिंतक व रचनाकार होते, हे नि:संशय आहे.
गाडगीळांनी आयुष्यभर अनेक समित्यांवर काम केले. त्या सर्वांचे मूल्यमापन तज्ज्ञ करतीलच. ते एक आदर्श अभ्यासक असल्याने कोणत्याही समितीवर काम करताना हाती घेतलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करीत. दोन-तीन उदाहरणे देता येतील.
ग्रामीण अर्थकारण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातील अनेक समस्यांचा विचार व त्यांवर उपाययोजना त्यांनी वेळोवेळी केली. ग्रामीण पतपुरवठा, लहान उद्योगधंदे, सहकारी अर्थव्यवस्था, पाटबंधा-यांचे प्रश्न या सर्व विषयांवर त्यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी सरकारी धोरणात समाविष्ट झाल्या. ग्रामदानाच्या कल्पनेतही त्यांनी असाच सखोल अर्थ पाहिला आणि त्याचा पुरस्कार केला. लहान शेतक-यांचे प्रश्न, भूहीन मजुरांची समस्या यांसंबंधीही त्यांची भूमिका अतिशय जिव्हाळ्याची व सहानुभूतीची होती.
गाडगीळांच्या अर्थकारणाचा संकलित व समग्र विचार कोणत्याही सरकारला अपरिहार्य ठरेल. गाडगीळांची नियोजनाविषयीची मते १९५० पासून त्यांनी सातत्याने, कठोरपणे व निर्भीडपणे मांडली. त्यामागेही त्यांची भारताच्या ग्रामीण अर्थकारणासंबंधीची भूमिका हीच प्रभावी होती. किंबहुना गाडगीळांनी जिल्हा हा घटक मानून नियोजन केले पाहिजे, हा विचार अत्यंत प्रभावीपणे दिल्लीला आल्यावरही मांडला व त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. वर्धा जिल्हा योजना हे त्यांच्या जिल्हा नियोजनाच्या कल्पनेचे मूर्त रूप होते. अखिल भारतीय आर्थिक समस्यांची उकलही केवळ सैद्धान्तिक नसे. प्रत्यक्ष व्यवहाराच्या मर्यादा, आपली सामाजिक, राजकीय स्थिती यांचा समग्र विचार करून, नियोजन मंडळाचे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यामुळे अत्यंत कठीण काळात भारतीय नियोजनाला त्यांची मदत झाली.