त्यांची वाणी आणि लेखणी या दोन्ही माध्यमांतून त्यांनी हे कार्य पहिल्यापासून अखेरपर्यंत अखंडपणे केले. काकासाहेबांची ग्रंथसंपत्ती विपुल आहे. काही शास्त्रीय विषयांवर पहिल्या प्रथम ग्रंथलेखन करण्याचे काम काकांनी केले. ग्यानबाचे अर्थशास्त्र, सभाशास्त्र वगैरे ग्रंथ हे त्याचाच पुरावा आहेत. वक्तृत्वाच्या बाबतीतही हीच गोष्ट होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र म्हणून वाणी वापरली. परंतु ते करीत असताना त्यांनी लोकशिक्षणही केले आणि हीच प्रथा मंत्रिमंडळात असताना व नसतानाही त्यांनी कायम ठेवली होती. पंजाबचे राज्यपाल म्हणून काही वर्षे कार्य केल्यानंतर परत ते जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात गावोगाव जाऊन निर्भीडपणे आपले विचार मांडण्याची प्रथा सुरू केली. या वेळपर्यंत मी दिल्लीत पोचलो होतो आणि त्यांची व माझी एकदा दिल्लीस भेट झाली, तेव्हा त्यांना मी त्यांचे हे प्रचाराचे कार्य कसे चालले आहे, असे सहज विचारले. त्यांनी त्या वेळी वापरलेला एक शब्द माझ्या कानांत अजूनही घुमतो आहे, ते म्हणाले,
'आता प्रचारकार्याची भूमिका राहिली नाही, तर आता माझी वाणी-यात्रा चालू आहे.'
लोकशिक्षणावर श्रद्धा असणारा काकासाहेबांसारखा माणूसच अशी 'वाणी-यात्रा' करू शकतो.
ते मंत्रिमंडळात असताना अनेक राजकीय घडामोडी होत होत्या; आणि काकासाहेब त्यांतील आपला योग्य हिस्सा हुशारीने पार पाडीत होते. त्यांच्याशी त्या काळात झालेल्या संभाषणावरून त्या वेळच्या परिस्थितीत त्यांच्या मनाचा व वैयक्तिक संबंधांचा झुकता कल सरदार पटेलांकडे होता. परंतु पं. जवाहरलाल नेहरूंचे व त्यांचे संबंध आपुलकीचे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात घडलेल्या रामायणात काकासाहेबांचा म्हणून काही एक अध्याय आहेच. दिल्लीतील नेतृत्वापासून मानसिक अंतर होते आणि संघटनात्मक दृष्ट्या ते काहीसे एकाकी होते. तरी त्यांनी आपले विचार पार्लमेंटमध्ये व बाहेर अत्यंत स्वच्छपणे मांडण्यात कुचराई केली नाही. १९६० सालच्या संयुक्त महाराष्ट्राच्या रचनेच्या काळात काकासाहेबांशी झालेली मसलत माझ्या उपयोगी पडली, ही गोष्ट मी नमूद केली पाहिजे.