ऋणानुबंध (113)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अस्पृश्यांच्या एका सभेत भाषण करताना शाहू महाराजांनी अस्पृश्यता-निवारणाचे महत्त्व प्रतिपादन केले होते. ते म्हणाले,

'कित्येक म्हणतात, की राजकारणाचा व स्पृश्यास्पृश्यतेचा काय संबंध आहे? काही संबंध असल्यास, तसेही करू. पण मी म्हणतो, अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवाय राजकारण कसे होणार? ज्यांना राजकारण करणे आहे, त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशांत वागवितात, त्याप्रमाणे वागविले पाहिजे आणि तसे वागविल्याशिवाय देशकार्य कसे होणार?...

परंतु सामाजिक दृष्ट्याच दलित नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही दलितांबद्दल शाहू महाराजांना कळवळा होता आणि अशांना मदत करण्याचे प्रयत्न ते करीत. कामगार व शेतकरी यांनी संघटित व्हावे, असे ते वारंवार सांगत. गवताच्या काडीला महत्त्व नाही, पण पेंडीला आहे, म्हणून संघटित व्हा; तिकडे इंग्लंडात मजूर संघटित झाले व त्यांचे प्रतिनिधी पार्लमेंटात बसू लागले, मजुरांची स्थिती सुधारू लागली, हे लक्षात घेऊन संघटनेचे महत्त्व ओळखा, असा त्यांचा उपदेश असे.

दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व बहुसंख्य समाजाला फायदा करून देणा-या कार्याला महाराज महत्त्व देत, हे जसे शिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आले, त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रांत दिसून आले. या शतकाच्या अगदी प्रारंभी ते युरोपच्या दौ-यावर गेले असता त्यांनी काही धरणे पाहिली. यातून त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली. राधानगरी ही महाराजांची कोल्हापूरला मिळालेली अमोल देणगी आहे. त्यांनी पुण्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामी इतर मराठा संस्थानिक, सरदार व प्रमुख व्यक्तींच्या बरोबरीने पुढाकार घेतला. पण पुतळ्याच्या बरोबरच शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल स्थापन करून या स्मारकाला उपयुक्त व कायमचे स्वरूप दिले.

कोल्हापुरात सहकारी चळवळीचा आणि शेतक-यांच्या संघटनेचा उपक्रम फार पूर्वी सुरू झाला आणि त्याची प्रेरणा शाहू महाराजांची होती. या सहकारी चळवळीने शेतक-यांना संरक्षण मिळाले. शेतकरी संघ स्थापन करण्यास प्रेरणा देऊन, दलालांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यास महाराजांनी हातभार लावला. कोल्हापूर संस्थानातील सामान्य जनतेला महाराजांनी आधार देऊन तिचा पुरुषार्थ जागा केला व त्यामुळे कोल्हापूरचे जीवन अधिक रगेल झाले.