ऋणानुबंध (109)

बरीच परंपरागत सरदार घराणी बादशहाच्या दरबारी होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे निर्माते मात्र सामान्य जनतेतून आलेले त्यांचे सैनिक होते. त्यांना आधार होता सामान्य माणसांचा. त्यांतून सैनिक तयार केले. झुंजार सेनापती निर्माण केले. दर्यासारंग त्यांतून आले. स्वराज्य हीच त्यांची दौलत होती. सैन्याची ठेकेदारी नाहीशी झाली. सैनिक समाजातून निर्माण झाले. त्यामुळे सैन्याची सामाजिक बैठक विस्तृत झाली. शूर मानल्या गेलल्या जातीपुरते सैन्य मर्यादित राहिले नाही. त्यांच्या सैन्यात सर्व जातींचे लोक होते, याचे कारण हेच आहे. याचा फायदा पुढे झाला.  शिवाजी महाराज गेल्यानंतर निर्नायकी अवस्थेत हेच सैनिक लढले. आक्रमणाच्या सामूहिक प्रतिकाराचे हे अभूतपूर्व उदाहरण आहे. सर्व समाज प्रतिकारार्थ जेव्हा उभा राहतो, तेव्हा त्याच्या राज्याचे अपहरण कोणी करू शकत नाही. पण तो समाजच जेव्हा मूल्यहीन, निष्ठाशून्य बनतो, तेव्हा कितीही शस्त्रास्त्रे असली, तरी त्याचे रक्षण करता येत नाही. रयतच राज्याचे रक्षण करते. म्हणून शिवाजी महाराजांच्या राजनीतीत रयतेला स्थान आहे. राज्यधोरणात रयतेच्या हिताची जपणूक आहे. 'मुद्रा भद्राय राजते' ही त्यांची प्रतिज्ञा होती.

मराठा सैनिकांच्या लुटीचे विपर्यस्त स्वरूप काही इतिहासकारांनी मांडले आहे. त्या काळी युद्धासाठी पैसा उभारण्यासाठी करयंत्रणा नव्हती. शत्रूची लूट हाच पैसा उभारण्याचा एक मार्ग होता. सुरत, राजापूरसारख्या व्यापारी शहरांवर शिवाजी महाराजांनी धाडी घातल्या. ही लूट करताना सामान्य माणसाच्या मालमत्तेला धक्का बसू नये, अशी ते काळजी घेत. महाराजांच्या अशाच एका आज्ञेत म्हटले आहे: 'कारभार ऐसा करावा, की भाजीच्या देठासही हात न लावणे, नाही तर लोक बोलतील: मोंगल बरे.' मोगल राज्य आणि आपले राज्य यांतील गुणात्मक फरक जनतेला जाणवावा, याचीही काळजी घेत. या सर्व कारणांमुळे शिवाजी महाराजांचे सैनिक व त्यांनी निर्माण केलेले राज्य गुणवत्तेत उजवे ठरले. साहस, पराक्रम, निष्ठा आणि शुद्धाचार यांमुळे त्या सैन्याचा दरारा निर्माण झाला नि स्वराज्याची सुराज्य म्हणून कीर्ती झाली.

महाराजांची राजकीय उद्दिष्टे निश्चित होती. सेना निष्ठावान होती. याच्या जोडीला सर्वंकष व्यूहरचनेची जोड होती. ही व्यूहरचना किमान बळ खर्च करून शत्रूचे जास्त नुकसान करणारी होती. आधुनिक सेनापती ज्या त-हेची व्यूहरचना करतात, तशी व्यूहरचना एकटे महाराज करीत असत. रणनीतीमध्ये गनिमाचा कावा ओळखावा लागतो. तो कावा ओळखून, त्याला नेस्तनाबूत करणे, त्याची प्रहारक्षमता खच्ची करणे, त्याची रसद तोडणे आणि वेळप्रसंगी त्याच्यासमोर उभे राहणे हे आवश्यक असते. महाराजांच्या लष्करी मोहिमांचा या दृष्टीने अभ्यास करण्यासारखा आहे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे जीवन वैयक्तिक साहसाचे आहे. ते पाहून तो भारावून जातो.