त्यांना माझ्याशी दिल्लीतच बोलावयाचे होते, पण ते अशक्य होते.
नंतर महासमितीचे अधिवेशन हैदराबादला भरले. त्या वेळी पाकिस्तानात इस्कंदर मिर्झा यांनी सत्ता ताब्यात घेतली होती. त्याविषयी ते माझ्याशी बोलत होते. तेवढ्यातच मध्येच त्यांनी विषय बदलला व मला ते म्हणाले,
'मी तुझ्याशी काही गोष्टींबाबत चर्चा करीन, असे म्हणालो होतो. मग तुला मी कधी भेटावयास हवे?'
मी सांगितले,
'तुम्ही सांगाल, तेव्हा.'
यावर, दुस-या दिवशी दुपारच्या भोजनाच्या थोडे अगोदर आपण महासमितीतून बाहेर पडू व भोजनानंतर विश्रांती घेऊ, असे सांगून त्यानंतर, म्हणजे अडीच वाजता मी यावे, अशी सूचना नेहरूंनी केली.
ठरल्याप्रमाणे मी अडीच वाजता गेलो. नेहरूंनी मला लगेच त्यांची विश्रांतीची जी खोली होती, तीत नेले आणि महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माझे मत काय, म्हणून विचारले. तसेच, गुजरात व विदर्भाच्या मंत्र्याशी माझे कसे संबंध आहेत, अनेक प्रमुख व्यक्तींची नावे घेऊन त्यांच्याशी कसे संबंध आहेत, कारभारयंत्रणा कशा प्रकारे चालू आहे, अधिका-यांचा प्रतिसाद कसा आहे, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मी प्रत्येकाची उत्तरे दिली.
'कारभार-यंत्रणा चांगली चालली आहे. विकासाची कामे होत आहेत, परंतु....'
नेहरूंनी विचारले,
'हे परंतु काय?'
मी म्हणालो,
'परंतु लोक समाधानी नाहीत !'
'का नाहीत?'
या प्रश्नाला मी उत्तर दिले, की -
'विकासाची कामे करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे व सरकार ते करील. पण यासाठी द्वैभाषिकाची गरज नाही, अशी लोकभावना आहे व म्हणून ते संतुष्ट नाहीत. तुम्ही इतर मंत्र्यांशी बोलून त्यांचे काय मत आहे, हेही पाहावे. माझ्या बरोबर काम करावयाचे असल्याने ते मला एक सांगत असतील; पण त्यांच्या काही इतरही कल्पना असण्याचा संभव आहे.'
नेहरू यावर हसले आणि आपण अगोदरच यांपैकी काही जणांशी बोललो असून, माझे विश्लेषण प्राय: बरोबर आहे, असेही ते म्हणाले.